पनवेलची खाडी, ठाण्याच्या खाडीला जिथे मिळते त्या मोक्याच्या जागी बेलापूर गाव वसलेल आहे. मुख्यत्वे कोळ्यांची वस्ती असलेल्या गावात पोर्तुगिजांनी किल्ला बांधला, तो म्हणजे बेलापूरचा किल्ला. वसईनंतर साष्टी बेट पोर्तुगिजांच्या ताब्यात आल्यावर खाडीतून होणार्या वाहातूकीवर नजर ठेवण्यासाठी व खाडी पलिकडील मराठ्यांकडून होणार्या संभाव्य हल्ल्यापासून संरक्षण मिळण्यासाठी पोर्तुगिजांनी बेलापूरचा किल्ला बांधला.
Belapur Fort, Belapur Fort Trek, Belapur Fort Trekking, Thane
अनेक रोमहर्षक घडामोडी पाहीलेला किल्ला आज कसाबसा तग धरुन उभा आहे. बेलापूरच्या झपाटयाने होणार्या विकासामुळे किल्ल्याचे उरलेले मोजकेच अवशेष इमारतींच्या गराड्यात हरवले आहेत व नष्ट होणाच्या मार्गावर आहेत.
इतिहास
पोर्तुगिजांनी हा किल्ला बांधला त्यावेळी किल्ल्याला ५ बुरुज व भक्कम तटबंदी होती. गडाचा बालेकिल्ला ७५ फूट उंचीवर होता. गडावर २० तोफा होत्या. ३१ मार्च १७३७ रोजी नारायण जोशी यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी किल्ल्याला वेढा घातला व २२ एप्रिल १९३७ रोजी हा गड मराठ्यांच्या ताब्यात आला. पानिपत युध्दानंतर सदाशिवभाऊच्या तोतयाला मानाजी आंग्रेनी बेलापूरच्या किल्ल्यात पकडले. इंग्रज कर्नल के याने २३ नोव्हेंबर १७७८ रोजी बेलापूर किल्ला जिंकून घेतला. १७७९ मध्ये वडगावच्या तहानुसार इंग्रजांना किल्ल्याचा ताबा मराठ्यांना परत द्यावा लागला. १२ एप्रिल १७८० रोजी कॅप्टन कॅम्बेलने बेलापूरचा किल्ला परत जिंकला; पण १७८२ च्या तहानुसार इंग्रजांना परत हा गड मराठ्यांना द्यावा लागला. २३ जून १८१७ रोजी कॅप्टन चार्ल्स ग्रे याने हा किल्ला जिंकून इंग्रज साम्राज्यात समाविष्ट केला.
गडावरील पहाण्याची ठिकाणे
बेलापूरचा किल्ला ज्या खाडीकाठी उभा होता त्यात भराव टाकून इमारती बांधल्यामुळे किल्ल्याचे थोडेच अवशेष शिल्लक राहीले आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या बागेच्या मागे किल्ल्याचा एकूलता एक बुरुज उभा आहे. बुरुजाच्यावर जाण्यासाठी आतल्या बाजूने गोलाकार जिना आहे. किल्ल्याची तटबंदी अस्तित्वात नाही, पण बालेकिल्ल्यावर इमारतीचे अवशेष व दुमजली गोल मनोरा दिसतो. किल्ल्याची देवी गोवर्धनी मातेचे जिर्णोध्दार केलेल मंदिर सध्या इमारतींच्या गराड्यात आहे. या शिवाय रेतीबंदर जवळ दोन चौकोनी विहीरी व पोर्तुगिजकालीन तलाव आहे.
गडावर पोहोचण्याच्या वाटा
डोंबिवली, ठाणे, कल्याण, मुंबई येथून बेलापूरला बससेवा आहे. या बसने बेलापूर किल्ला या थांब्यावर उतरुन बागे जवळील बुरुजाकडे जाता येते डांबरी रस्त्याने तसेच पुढे गेल्यास दक्षिणेकडील टेकडीवर बालेकिल्ल्यात जाण्यासाठी पायर्या आहेत याच रस्त्याने पुढे गेल्यास रेतीबंदरकडे जाता येते.


Welcome to the Best Fort Trekkers Group in Maharashtra.



