अंजठा सातमाळ रांग म्हणजे नाशिक आणि गुजराथच्या सीमेवरील तटबंदीच होय. याच रांगेत आडवाटेवर एक किल्ला आहे. त्याचे नावं कण्हेरगड. इतिहास प्रसिद्ध असा हा कण्हेरगड आजमितिस बराच दुर्लक्षित आहे.

Kanhergad Fort, Kanhergad Fort Trek, Kanhergad Fort Trekking, Nashik

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

गडावर पोहचल्यावर खडकात खोदलेला बुरुज दिसतो. येथून थोडे पुढे गेल्यावर एक नेढं दिसते. नेढ्याच्या समोरून जाणारी वाट थेट गडमाथ्यावर घेऊन जाते. गडमाथा बराच प्रशसत आहे. संपूर्ण गडमाथा फिरण्यास १ तास लागतो. गडमाथ्यावर पाण्याची ६ ते ७ टाकी आहेत. महादेवाची पिंड आहे. धोडप किल्ल्याच्या समोर तोंड येईल अशी गुहा एका कड्यात खोदलेली आहे. गडावर वाड्यांचे काही अवशेष आढळतात. गडाचे दुसरे तोक हे धोडपच्या माची सारखेच आहे. गडावरून पश्चिमेला सप्तश्रुंगी, मार्कंड्या, रवळ्या जवळ्या, धोडप कंचना, हंड्या अशी संपूर्ण सातमाळ दिसते.

गडावर जाण्याच्या वाटा

कण्हेरगडावर जाण्याचे दोन मार्ग आहेत. हे दोनही मार्ग कण्हेरगड आणि समोरचा डोंगर यांच्या खिंडीत एकत्र येऊन तिथूनच वर जातात.

१. नाशिक-नांदुरी मार्गे: नाशिकवरून नांदुरी गाव गाठावे. नांदुरीतून कळवणला जाणाऱ्या रस्त्यावरच नांदुरी गाव आहे. नांदुरी पासून ६ कि.मी. अंतरावर आठंबा गाव आहे. या गावातून २ कि.मी. अंतरावर असणाऱ्या ‘सादडविहिर’ या गावात यावे. सादडविहीर गावातून किल्ल्यावर जाण्यास ठळक वाट आहे. या गावातून खिंड गाठण्यास अर्धा तास लागतो.

२. नाशिक कळवण मार्गे: नाशिक कळवण मार्गे ओतूर गाठावे. ओतूर मधून अर्ध्या तासाच्या अंतरावर असणारे कण्हेरवाडी गावात यावे. कण्हेरवाडी गावातून वर सांगितलेली खिंड गाठण्यास १ तास लागतो. या दोन्ही वाटा वर सांगितलेल्या खिंडीत येऊन मिळतात. गडावरून येणारी एक सोंड सुद्धा याच खिंडीत उतरते. ती सोंड पकडून एक तासाच्या खड्या चढणी नंतर आपण गडमाथ्यावर पोहचतो. वाट निसरडी आहे. त्यामुळे जरा जपूनच चढावे लागते.

किल्ल्यावर राहण्यासाठी गुहा आहे. यात ५ लोकांची राहण्याची सोय होते.जेवणाची सोय आपण करावी लागते. किल्ल्यावर बारामही पिण्याचे पाण्याचे टाके आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी सादडविहिर गावातून दीड तास कण्हेरीवाडीतून २ तास. किल्ल्यावर सर्व ऋतुंमध्ये जाऊ शकतो.