कोकणात जाणार्‍या घाटवाटा म्हणजे त्या काळच्या दळणवळण, व्यापाराचा एक उत्तम मार्ग असे. मग तो कावल्या घाट असो वा सिंगापुर नाळ, बोरोट्याची नाळ, बोचेघोळ नाळ, अगदी आग्या किंवा निसणीची वाट असो प्रत्येक घाटवाट आपलं एक स्वतःच वैशिष्ट्य जपणारी असते. त्यामधलीच एक महत्वाची घाटवाट म्हणजे वरंधा घाट. कोकणातल्या महाडहुन घाट माथ्यावरच भोर गाठण्यासाठी एक मोक्याची वाट.

पायथ्याच्या दुर्गाडी गावच्या नावावरून "दुर्गाडी किल्ला" असे नाव पडले. किल्ल्यावरील जननी मातेच्या मंदिरामुळे "जननीचा डोंगर" या नावानेही हा किल्ला ओळखला जातो.

पहाण्याची ठिकाणे

किल्ल्यावर तटबंदी, बुरूज किंवा अजुन काही बांधकाम नजरेस पडत नाही. एक पक्के बांधकाम केलेले जननी मातेचे मंदिर अन थोड़े पुढे गेल्यावर वाड्याचे अवशेष नजरेस पडतात. किल्ल्यावर पाण्याची तीन टाके आहेत. त्यामधील एका टाक्यातील पाणी पिण्यास योग्य असे आहे.

आकाश निरभ्र असेल तर मोहनगडावरुन राजगड, तोरणा, रायगड, प्रतापगड, कावळा किल्ला हे किल्ले दिसतात.

पोहोचण्याच्या वाटा

१) मुंबई - गोवा महामार्गावरील महाड गाठावे. महाडच्या पुढे महाड - भोर रस्तावर वरंधा घाट चढायला सुरुवात करावी. वरंधा घाटाने १० किलोमीटर गेल्यावर पुढे उजव्या बाजूला शिरगाव/दुर्गाडी फाटा लागतो. शिरगावातून उजव्या बाजूची वाट किल्ल्यावर जाते. (शिरगावात शेवटी एक मंदिर लागेल इथूनच वाट किल्ल्यावर जाते).

२) मुंबई-> पुणे-> भोर मार्गे वरंधा घाटाने महाडला जातांना भोर पासून ३० किलोमीटरवर डाव्या बाजूला शिरगाव/दुर्गाडी फाटा लागतो. या फ़ाट्यावर वळुन २ ते ३ किमी पुढे गेल्यावर डाव्या बाजूला एक मंदिर लागते. तेथूनच मोहनगडावर जाण्याची वाट आहे.

किल्ल्यावर जाण्यासाठी तीन वाटा आहेत. त्यापैकी दोन वाटा शिरगावातून, तर एक वाट दुर्गाडी गावातून आहे. शिरगावात शेवटी एक मंदिर आहे. मंदिरा समोरुन जाणारी उजव्या बाजूची वाट गावकर्‍यांची नेहमीची किल्ल्यावर ये जा करण्याची वाट आहे, त्यामुळे ती मळलेली आहे. पण जर किल्ल्याच्या पायथ्याच घनदाट जंगल अनुभवायचे असेल तर डाव्या बाजूची वाट पकडावी. ही वाट पुढे दुर्गाडी गावातून वर येणार्‍या वाटेलाच मिळते. याच वाटेवर एक मुर्ती उभी करून ठेवलेली आहे. पुढे गेल्यावर अजून एक मंदिर आणि त्यापुढे कातळात कोरलेल्या पायर्‍या आपणास गड माथ्यावर नेउन सोडतात.

राहाण्याची सोय

किल्ल्यावरील मंदिरात ३ ते ४ जण राहू शकतात

जेवणाची सोय

किल्ल्यावर जेवणाची सोय नाही.

पाण्याची सोय

किल्ल्यावरील टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे.

जाण्यासाठी लागणारा वेळ

किल्ल्यावर पोहोचण्यासाठी दिड ते दोन तास लागतात.