नाशिक जिल्ह्यातून पूर्व पश्चिम जाणार्‍या सातमाळ डोंगररांगेत १८ किल्ले आहेत. त्यापैकी अहिवंतगड हा प्रमुख किल्ला होता. किल्ल्याचा प्रचंड आकार, त्यावरील अनेक वाड्यांचे अवशेष, मोठी तळी हे किल्ल्याचे मोठेपण अधोरीखित करतात. अचला, मोहनदर या दोन टेहळणीच्या किल्ल्यांची निर्मिती अहिवंतगडाच्या संरक्षणासाठी करण्यात आली असावी. अहिवंतगडचा आकार प्रचंड मोठा असल्यामुळे अहिवंत आणि त्याच्या बाजूचा बुधल्या (बुध्या) डोंगर पाहाण्यासाठी अर्धा दिवस लागतो.

Ahivant Fort, Ahivant Fort Trek, Ahivant Fort Trekking, Nashik

खाजगी वाहानाने अचला, अहिवंत आणि मोहनदर हे तीन किल्ले दोन दिवसात व्यवस्थित पाहून होतात. पहिल्या दिवशी अचला,अहीवंत पाहून दरेगावातील मारुती मंदिरात किंवा मोहनदरी गावातील आश्रमशाळेच्या व्हरांड्यात मुक्काम करुन दुसर्‍या दिवशी मोहनदर किल्ला पाहाता येईल.

इतिहास

इसवीसन १६३६ मधे अहिवंतगड निजामशाहीच्या ताब्यात होता. मुघल बादशाहा शहाजहानने नाशिक भागातील किल्ले काबिज करण्याची जबाबदारी शाहिस्तेखानावर सोपवली. शाहिस्तखानाचा सरदार अलिवर्दीखानाने अहिवंतगड जिंकून घेतला.इसवीसन १६७० मधे शिवाजी महाराजांनी हा किल्ला मुघलांकडून जिंकून घेतला.सुरत, करंजा सारख्या शहरांची लुट, मुघलांचे किल्ले जिंकून घेणे या शिवाजी महारांजांच्या कारवायांमुळे औरंगजेब बादशहा संतापला होता.त्याने आपल्या दक्षिणेत असलेल्या सरदाराला महाबतखानास अहिवंतगड घेण्याची आज्ञा केली.महाबतखान नाशिकला असलेल्या दिलेरखानाला सोबत घेऊन त्याने अहिवंतगडाला वेढा घातला.महाबतखानाने महादरवाजावर तर दिलेरखानाने पिछाडीला मोर्चे लावले.एक महिना झाला तरी अहिवंतगड दाद देत नव्हता.या दरम्यान दंतकथेत शोभावी अशी घटना घडली.या घटनेची नोंद भिमसेन सक्सेनाच्या तारीखे दिल्कुशा आणि जेधे शकावलीतही सापडते.दिलेरखानाच्या छावणीत एके दिवशी एक ज्योतिषी आला.त्याला दिलेरखाना समोर पेश करण्यात आल.त्याला किल्ला कधी हाती येईल अस विचारल्यावर त्याने साखर मागवली.साखरेने त्याने अहिवंत गडाचा नकाशा काढला.साखरेनेच महाबत खान आणि दिलेरखानाचे मोर्चे दाखवले.त्यानंतर त्याने आपल्या पिशवीतील पेटीतून एक मुंगळा बाहेर काढला आणि त्या साखरेच्या किल्ल्यावर सोडला.त्या मुंगळ्याने महाबत खानाने महादरवाजावर लावलेल्या मोर्च्याकडे गेला त्यानंतर तो दिलेरखानाच्या मोर्च्याकडे गेला.तिकडून किल्ल्यात प्रवेश केला.त्यावरून ज्योतिषाने गणित मांडली आणि सांगितले की, महाबतखानाकडून महादरवाजावर निकराचा हल्ला होईल.पण ६ दिवसांनी किल्ला दिलेरखानाच्या मोर्च्याकडून हस्तगत होईल.

ज्योतिषाने सांगितलेले भविष्य सहा दिवसांनी खरे ठरले.महाबतखानाने महादरवाजावर तिखट मारा केला.किल्ल्यावरील दारूगोळा, धान्य संपत आले होते.त्यामुळे मराठ्यानी किल्ला सोडण्याचा निर्णय घेतला.महाबतखान निकराने किल्ला लढवत असल्यामुळे त्याच्याकडे जाण्यात अर्थ नव्हता म्हणुन मराठ्यानी आपला दुत दिलेरखानकडे पाठवला व किल्ला देण्याची इच्छा व्यक्त केली.दिलेरखानाने मराठ्यांना किल्ल्या बाहेर सुखरुप जाण्याचा मार्ग दिला आणि किल्ला ताब्यात घेतला.

इसवीसन १८१८ मध्ये सर प्रॉथर याने किल्ला मराठ्यांकडून जिंकुन घेतला.

गडावर पहाण्याची ठिकाणे

दरेगावातून अहिवंतगडाचा डोंगर नालेच्या आकारात पसरलेला दिसतो. अहिवंतगडाच्या बाजुला बुध्या डोंगर आहे. त्याच्या बाजुला अजुन एक डोंगर आहे. गावातील मारुती मंदिरापासुन चढायला सुरुवात केल्यावर आपण बुध्या आणि त्याच्या बाजूचा डोंगर या मधिल घळीत पोहोचतो. घळ चढुन बुध्या डोंगराला वळसा घालुन आपण बुध्या आणि अहिवंत गडाच्या मधल्या घळीत येतो. घळ चढुन गेल्यावर डाव्या बाजुला बुध्यावर कोरलेल्या कातळ कोरीव पायर्‍या आणि वरच्या बाजूस बुरुज दिसतो. या पायर्‍यांवर माती पडलेली आहे. त्यामुळे या पायर्‍या काळजीपूर्वक चढुन गेल्यावर आपण बुरुजा पाशी पोहोचतो. बुरुजाच्या पुढे एक सुकलेल टाक आहे. पुढे गेल्यावर दोन खराब टाकी आहेत. बुध्याच्या माथ्याला वळसा घातल्यावर अजुन एक बुरुज पाहायला मिळतो. बुध्याच्या माथ्यावर चार पाण्याची टाकी आहेत. त्यापैकी एक बुजलेल आहे. माथ्यावर एक शेंदुर लावलेला दगड आहे. बुध्याचा माथा छोटा असल्याने अर्ध्या तासात बुध्या पाहुन परत अहिवंतगड आणि बुध्याच्या मधल्या घळीत उतरुन १० मिनिट चढल्यावर आपण अहिवंत गडाच्या माथ्यावर पोहोचतो. माथ्यावर पोहोचल्यावर डाव्या बाजुला एक टेकडी आहे पण त्यावर कुठलेही अवशेष नाहीत. गडावरील महत्वाचे अवशेष गडाच्या मध्यभागी दिसणार्‍या टेकडीच्या आसपास आहेत. त्यामुळे टेकडीच्या दिशेने चालायला सुरुवात करावी. साधारणपणे आपण १० मिनिटात उध्वस्थ वाड्यांच्या अवशेषांपाशी पोहोचतो. इथे भरपूर उध्वस्थ वाड्यांचे अवशेष पसरलेले आहेत. त्यावरुन या ठिकाणी गडावरील मुख्य वस्ती होती याचा अंदाज बांधता येतो. यापैकी एका मोठ्या कोसळलेल्या वाड्याच्या मागच्या बाजुला तलाव आहे. त्या तलवाच्या काठावर मारुती आणि सप्तशृंगी देवीची मुर्ती आहे. तलावाच्या काठी एक उध्वस्थ कोठाराची इमारत आहे.

तलावाच्या आजुबाजूचे हे अवशेष पाहुन गडावरील टेकडीच्या दिशेने चालायला सुरुवात करावी. टेकडीपाशी पोहोचल्यावर टेकडी उजव्या हाताला ठेउन व दरी डाव्या हाताला ठेउन चालायला सुरुवात करावी. इथे डाव्या बाजुला दरीच्या टोकाला कातळात कोरलेली गुहा आहे. ही गुहा खालच्या अंगाला असल्यामुळे वरुन दिसत नाही. गुहेत जाण्यासाठी कातळात कोरलेल्या पायर्‍या होत्या पण आता त्या नष्ट झाल्याने काळजीपूर्वक खाली उतरावर लागत. गुहेत एक सुकलेल पाण्याच टाक आहे. गुहा सध्या राहाण्यायोग्य नाही. गुहेतून दुरवरचा परिसर दिसतो.

गुहा पाहुन वर येउन परत टेकडी उजवेकडे ठेवत पुढे गेल्यावर पाण्याच टाक लागत. यातील पाणी पिण्यायोग्य आहे. टाक्याच्या बाजूला एक दगडाची तुटलेली ढोणी आहे. खंडोबाची एक अश्वारुढ मुर्ती आहे. टाक्यातल पाणी पिउन टेकडी चढुन जावे. टेकडीवर उध्वस्त घरांचे चौथरे आहेत आणि एक बुजलेल टाक आहे. टेकडीवरुन गडाचा पसारा आणि टेकडीच्या टोकाखाली असणारा बांधीव तलाव दिसतो. या तलावाच्या दिशेने खाली उतरावे. तलाव पाहुन पुढे गेल्यावर उजव्या बाजुला कड्याखाली (दरेगावाच्या दिशेला) कातळात कोरलेली गुहा आहे. ती पाहाण्यासाठी जाण्यासाठी अरुंद वाट आहे त्यावर घसारा (स्क्री ) असल्याने जपुन जावे लागते. गडावरील या दोनही गुहा गडाच्या पठाराच्या खालच्या बाजुस खोदलेल्या असल्याने वरुन त्यांचा अंदाज येत नाही. माहितगार बरोबर असल्यास या गुहा पाहाता येतात.

गुहा पाहुन परत पठारावर येउन पुढे चालत गेल्यावर आपण उध्वस्त प्रवेशव्दारापाशी येतो. प्रवेशव्दारातून बाहेर पडल्यावर कातळात कोरुन काढलेला सर्पिलाकार मार्ग आणि पायर्‍या पाहायला मिळतात. हा त्याकाळी किल्ल्यावर येण्याचा राजमार्ग होता. राजमार्ग उतरुन गेल्यावर आपण एका अरुंद पठारावर येतो. येथे एक पाण्याचे मोठे सुकलेले टाक आहे. टाक पाहुन पुढे गेल्यावर वाट खाली उतरते. या वाटेन एक छोटा वळसा मारल्यावर कातळात कोरलेली एक खांब असलेली गुहा दिसते. ही गुहा राहाण्यायोग्य नाही. गुहा पाहुन खाली उतरल्यावर आपण उध्वस्त दरवाजापाशी पोहोचतो. या दरवाजाच्या बाजुचे बुरुज आणि देवड्याही नष्ट झालेल्या आहेत . या दरवाजातून खालचा दरेगाव बेलवाडी रस्ता दिसतो. या दरवाजातून बाहेर पडुन थोड खाली उतरल्यावर दोन वाटा आहेत. एक वाट सरळ खाली उतरत रस्त्यावर गेलेली आहे. बिलवाडीला उतरायचे असल्यास ही वाट पकडावी.

दरेगावला जाण्यासाठी उजव्या बाजुची कड्याखालुन जाणारी वाट पकडावी. कातळकडा उजवीकडे आणि दरी डावीकडे ठेवत ही वाट सरळ कड्याच्या टोकापर्यंत जाते आणि तिथुन खाली खिंडीत उतरते. खिंडीतून दरेगाव बेलवाडी रस्ता बनवल्यामुळे याठिकाणी वाट थोडी कठीण बनलेली आहे. रस्त्यावर उतरल्यावर मधल्या वाटानी दरेगावला पोहोचायला अर्धा तास पुरतो.

या मार्गाने दरेगाव मारुती मंदिरापासुन सुरुवात करुन बुधा आणि अहिवंत गडाच्या दुसर्‍या टोकाला असलेल्या दरेगाव बेलवाडी रस्त्यावरील खिंडीत उतरल्यास किल्ला कमीत कमी वेळात संपूर्ण पाहुन होतो. किल्ला नीट पाहाण्यास किमान 3 तास लागतात.

किल्ल्यावरुन अचला, मोहनदर, सप्तशृंगी, मार्कंड्या, रावळ्या-जावळ्या, धोडप ही रांग पाहायला मिळते.

गडावर पोहोचण्याच्या वाटा

१) नाशिक शहर: देशातल्या सगळ्या शहरांशी रस्त्याने आणि रेल्वेने जोडलेले आहे. नाशिकहुन सप्तशृंगी देवीचे वणी गाठावे. वणीहून नांदुरी, कळवणकडे जाणार्‍या एस.टी.ने दरेगाव फ़ाट्यावर उतरावे. हे अंतर साधारण १२ किमी आहे. फ़ाट्यावर उतरून चालत १० मिनिटात दरेगावातल्या मारुती मंदिरापाशी पोहोचावे. दरेगाव हे अहिवंत किल्ल्याच्या पायथ्याचे गावं आहे. खाजगी वाहानाने थेट दरेगावात जाता येते. दरेगावातून पाहील तर अहिवंतगडाचा डोंगर नालेच्या आकारात पसरलेला दिसतो. अहिवंतगडाच्या बाजुला बुध्या डोंगर आहे. त्याच्या बाजुला अजुन एक डोंगर आहे. गावातील मारुती मंदिरापासुन चढायला सुरुवात केल्यावर आपण बुध्या आणि त्याच्या बाजूचा डोंगर या मधिल घळीत पोहोचतो. घळ चढुन बुध्या डोंगराला वळसा घालुन आपण बुध्या आणि अहिवंत गडाच्या मधल्या घळीत येतो. घळ चढुन गेल्यावर डाव्या बाजुला बुध्यावर कोरलेल्या कातळ कोरीव पायर्‍या दिसतात. उजव्या बाजूच्या वाटेने गडाच्या माथ्यावर जाता येते. दरेगावातून गडमाथा गाठण्यास दीड तास लागतो. दरेगाव मारुती मंदिरापासुन सुरुवात करुन बुधा आणि अहिवंत गडाच्या दुसर्‍या टोकाला असलेल्या दरेगाव बेलवाडी रस्त्यावरील खिंडीत उतरल्यास किल्ला कमीत कमी वेळात संपूर्ण पाहुन होतो. किल्ला नीट पाहाण्यास किमान ३ तास लागतात.

दरेगाव ते बेलवाडी रस्त्याचे काम चालू आहे. हा रस्ता झाल्यावर खिंडी पर्यंत थेट गाडीने जाता येईल आणि तेथुन राजमार्गाने किल्ल्यावर जाता येईल.

२) बेलवाडी मार्गे: अहिवंत किल्ल्यावर जाणारी दुसरी वाट बेलवाडी गावातून किल्ल्यावर येते. वणी बेलवाडी असा ३० किमीचा फ़ेरा मारावा लागतो. बेलवाडीतून २ तासात गडावर पोहोचता येते.

३) अचला मार्गे: मुंबई किंवा पुणे मार्गे नाशिक गाठाव. नाशिकहुन वणी गाठावे. वणीहून एस.टी.ने पिंपरी अचलाकडे जावे. हे अंतर साधारण १२ किमी आहे. अचला गावात उतरून दगड पिंपरी गावाकडे सरळ चालत निघावे. हे अंतर अर्ध्या तासाचे आहे. दगड पिंपरी हे अचला किल्ल्याच्या पायथ्याचे गावं आहे. खाजगी वाहानाने थेट दगड पिंपरी गावात जाता येते. गावातून समोरच्या डोंगरसोंडेवरील खिंडीत छोटेसे सतीचे देऊळ दिसते. त्याच्या दिशेने वर चढत जावे. पाऊलवाट प्रथम शेतातून आणि नंतर वनखात्याने लावलेल्या जंगलातून वर चढत जाते. साधारणपणे अर्ध्या तासात आपण सोंडेवरील सतीच्या देवळापाशी पोहोचतो. देवळापासून डाव्या बाजूला दिसणारा किल्ला अचला, तर उजवीकडे धावत जाणारी सोंड थेट अहिंवत गडाला जाऊन मिळते.

राहाण्याची सोय

किल्ल्यावर राहण्याची सोय नाही. दरेगावातील मारुती मंदिरात ३० जणांची सोय होते.

जेवणाची सोय

जेवणाची व्यवस्था आपण स्वत…: करावी.

पाण्याची सोय

गडावर पाण्याची पाण्याची टाकी आहे. त्यात फेब्रुवारी पर्यंत पाणी मिळू शकते.

जाण्यासाठी लागणारा वेळ

दरेगाव मार्गे दिड तास आणि बेलवाडी मार्गे २ तास लागतात.