छत्रपती शिवाजीराजे भोसले
अधिकारकाळ - जून ६, १६७४ ते एप्रिल ३, १६८०
राज्याभिषेक - जून ६, १६७४
राज्यव्याप्ती - पश्चिम महाराष्ट्र, कोकण, सह्याद्री डॊंगररांगांपासून नागपूरपर्यंत आणि उत्तर महाराष्ट्र, खानदेशापासून दक्षिण भारतात तंजावरपर्यंत
राजधानी - रायगड किल्ला
जन्म - फेब्रुवारी १९, १६३० शिवनेरी किल्ला, पुणे
मृत्यू - एप्रिल ३, १६८० रायगड
उत्तराधिकारी - छत्रपती संभाजीराजे भोसले
वडील - शहाजीराजे भोसले
आई - जिजाबाई
पत्नी - सईबाई निंबाळकर, सोयराबाई मोहिते, पुतळाबाई पालकर, लक्ष्मीबाई विचारे, काशीबाई जाधव, सगणाबाई शिंदे, गुणवंतीबाई इंगळे, सकवारबाई गायकवाड
राजघराणे -भोसले
राजब्रीदवाक्य - 'प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।'
चलन - होन, शिवराई, (सुवर्ण होन, रुप्य होन
छत्रपती शिवाजीराजे भोसले (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०) हे इ.स. १८१८ पर्यंत टिकलेल्या आणि आपल्या परमोत्कर्षाच्या अवस्थेत भारतीय उपखंडाचा बराचसा भाग व्यापणाऱ्या मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. जनता त्यांना शिवराय, शिवाजी महाराज किंवा राजे नावाने संबोधते. भोसले कुळातील या सुपुत्राने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजीने उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला. उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता, प्रजाहितदक्ष कल्याणकारी राजा म्हणून जागतिक आणि विशेषत्वाने मराठी इतिहासात त्यांना अत्युच्च स्थान आहे.
महाराष्ट्रात, छत्रपती शिवाजी हे शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवबाराजे, शिव, शिवराय, शिवा अशा अनेक नावांनी ओळखले जातात. शिवाजीचा जन्मदिवस हा ‘शिवजयंती’ म्हणून साजरा होतो. शिवाजी आणि त्यांचा पुत्र संभाजी यांचा संयुक्त उल्लेख शिवशंभू असा होतो. शिवाजीच्या कारकीर्दीला शिवकाल असेही म्हणतात.
शिस्तबद्ध लष्कर व सुघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवाजीने एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. भूगोल, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या २,००० सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर शिवाजी महाराजांनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले.