सह्याद्रीची उत्तर दक्षिण रांग इगतपूरी परिसरातून थळघाटाच्या पूर्वेकडे जाते. याच रांगेला कळसूबाई रांग म्हणतात. या रांगेचे दोन भाग पडतात. एक म्हणजे अलंग, मदन, कुलंग आणि कळसूबाई, तर पूर्वेकडील औंढा, पट्टा, बितनगड, आड, म्हसोबाचा डोंगर. वृक्षतोडी मुळे हा सर्व परिसर उजाड झालेला आहे. मात्र एसटी ची सोय आणि भरपूर पाऊस यामुळे ग्रामीण जीवन बरेच सुखी झालेले आहे. औंढा किल्ल्यावरचा भाग म्हणजे एक सुळकाच आहे. औंढा किल्ला नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याच्या नैऋत्येस आणि देवळालीच्या दक्षिणेस १० मैलांवर आहे.
Aundha Fort, Aundha Fort Trek, Aundha Fort Trekking, Nashik
इतिहास
इ.स.१६८८ पर्यंत हा किल्ला मराठ्याच्या राज्यात होता. यानंतर तो मोगलांनी जिंकून घेतला. येथे मोगलांचा सरदार श्यामसिंग यांची किल्लेदार म्हणून नेमणूक झाली होती.
गडावर पहाण्याची ठिकाणे
औंढाचा किल्ला म्हणजे एक सुळकाच आहे. यामुळे किल्ल्याचा माथा तसा लहानच आहे. याचा उपयोग टेहळणीसाठी होत असे. गडावर पाण्याच्या चारपाच टाक्या आहेत. एका गुहेत पाणी आहे. खड्कात खोदलेला दरवाजा आहे. गडावरुन समोरच पट्टा किल्ला, बितनगड, अलंग,मदन आणि कुलंग, कळसूबाई असा सर्व परिसर दिसतो. गड पाहण्यास अर्धा तास पुरतो.
गडावर पोहोचण्याच्या वाटा
औंढा किल्ल्याला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत.
१) निनावी मार्गे: मुंबई मार्गे इगतपुरी गाठावी. इगतपुरी बस स्थानका वरून सकाळी ७.०० वाजता भगूर कडे जाणारी एसटी पकडून साधारणत… दीड तासाच्या अंतरावरील कडवा कॉलनी नाक्यावर उतरावे. या कॉलनी पासूनच आपली पायपीट चालू होते. कॉलनीतून पुढे गेल्यावर कडवा धरण लागते. धरणाच्या भिंतीवरून पुढे गेल्यावर (साधारणत: नाक्या पासून ४५ मिनिटांत) आपण निनावी गावात पोहोचतो. निनावी गावातून औंढा किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत.
पहिली वाट गावातून समोरच दिसणाया उभ्या कड्याच्या घळी मधून जाते. ही वाट मात्र मस्त दमछाक करणारी आहे. दुसरी वाट निनावी गावातील दुसया हनुमान मंदिराजवळून जाते. ही वाट कमी दमछाक करणारी, पण पहिल्या वाटेपेक्षा जास्त वेळ लावणारी आहे. या वाटेने किल्ल्याचे पठार गाठण्यास पाऊण तास लागतो. या पठारावरच औंढा किल्ल्याचा सुळका ठेवल्या सारखा दिसतो. येथून किल्ल्याच्या पायर्यांपर्यंत जाण्यास अर्धा तास लागतो. समोरच कातळात कोरलेल्या पायर्या लागतात. पायर्या चढून गेल्यावर कडा उजवीकडे ठेवून पुढे गेल्यावर शेवट्च्या ट्प्प्यात थोडे प्रस्तरारोहण करुन गडमाथा गाठता येतो.
२) पट्टा किल्ला मार्गे: अनेक जण औंढा - पट्टा - बितनगड असा ट्रेक करतात. औंढा किल्ल्याहून पट्टा किल्ल्याला जाण्यासाठी वरील मार्गाने किल्ल्याच्या पायर्या असणार्या पठारावर परतावे. पठारावरून समोरच एक भगवा झेंडा फडकतांना दिसतो, येथून पुढे जाणारी वाट थेट पट्टा किल्ल्यावर जाते.
राहाण्याची सोय
किल्ल्यावर राहण्याची सोय नाही, औंढावाडीत राहता येते. औंढा - पट्टा असा ट्रेक असल्यास, औंढा पाहून पट्टा किल्ल्या वरील गुहेत मुक्कामाला जावे.
जेवणाची सोय
गडावर जेवणाची सोय नाही. आपण स्वत:च करावी.
पाण्याची सोय
गडावरील टाक्यांत पिण्याचे पाणी बारामही उपलब्ध आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ
निनावी मार्गे २ तास आणि पट्टा किल्ला मार्गे २ तास लागतात.
जाण्यासाठी उत्तम कालावधी
जुलै ते फेब्रुवारी
सूचना: पावसाळ्यात प्रस्तरारोहण करणे धोकादायक (अतिकठीण) आहे.