मालवण तालुक्यातील कालावल खाडीच्या अल्याड - पल्याड दोन गड उभे आहेत, ते म्हणजे भगवंतगड आणि भरतगड. दिड एकरवर पसरलेला भगवंतगड गर्द झाडीने आच्छादलेला आहे. मालवणजवळ असलेली ही दुर्गजोडी आणि आजुबाजुला पसरलेले कोकणी निसर्ग सौंदर्य आवर्जून पहाण्यासारखे आहे.

Bhagwantgad Fort, Bhagwantgad Fort Trek, Bhagwantgad Fort Trekking, Sindhudurg

इतिहास

सावंतवाडीकर सावंत व कोल्हापूरकर छत्रपती यांच्यात वरचेवर लढाया होत असत. १७०१मध्ये सावंतांनी कालावल खाडीच्या दक्षिण काठावरील मसुरे गावात भरतगड किल्ला बांधला. त्याला शह देण्यासाठी पंतप्रतिनिधींनी कालावल खाडीच्या उत्तर काठावरील बांदीवडे गावा नजिकच्या टेकडीवर भगवंतगड किल्ला बांधला. पुढे हा किल्ला सावंतवाडीकरांच्या ताब्यात गेला. १७४८ साली तुळाजी आंग्रे यांनी भगवंतगडावर हल्ला केला, परंतु किल्लेदाराने तो दिडवर्ष चिकाटीने लढवला. २९ मार्च १८१८ रोजी कॅप्टन ग्रे आणि पिअरसन यांच्या नेतृत्वाखालील ४ थ्या रायफलने किल्ल्यावर हल्ला करुन जिंकला.

गडावरील पहाण्याची ठिकाणे

भगवंतगडावर जाण्यासाठी कावा मसुरे गावातून होडी मिळते. माणशी ५ रुपयात होडीने खाडीच्या पलिकडील भगवंतगड गावात उतरल्यावर डाव्या हाताच्या रस्त्याने ५ मिनीटे चालल्यावर आपण शाळेजवळ पोहचतो. शाळेच्या मागून मळलेली वाट १० मिनीटात गडावर घेऊन जातो. गडाचे प्रवेशद्वार अस्तित्वात नाही. त्याच्या बाजूचे बुरुज व तटबंदी ढासळलेली आहे. गडावरील एकमेव शाबूत वास्तू म्हणजे सिध्देश्वराचे मंदिर. चिरेबंदी बांधणीच्या या मंदिरात ओबडधोबड दगड आहे. या अमूर्त दगडालाच ‘‘सिध्देश्वर‘‘ म्हणतात. मंदीराच्या बाजुला ४ फूटी चिरेबंदी तुळशीवृंदावन आहे. गडावर लोकांचा वावर नसल्यामुळे दाट झाडी माजलेली आहे. त्यामुळे गडावरील अवशेष पाहाता येत नाहीत. तटबंदीचे तुरळक अवशेष आणि काही जोती गडभर पसरलेली आहेत. गडावरुन कालावल खाडी व भरतगडाचे विहंगम दृश्य दिसते. मालवणहून भरतगड/भरवंतगडला जाताना रस्त्यात आंगणेवाडी, आचर्‍याचे रामेश्वर ही मंदिरे पाहता येतात.

गडावर पोहोचण्याच्या वाटा

भरतगड व भगवंतगड हे दोन्ही छोटे किल्ले एकत्र पहाणे सोयिस्कर पडते. मालवणहून कालावल खाडीच्या अलिकडे असलेल्या भरतगडावर जाण्यासाठी मसूरे गावात उतरावे लागते. भरतगड पाहून झाल्यावर, भगवंतगड पहाण्यासाठी मसुरे गावातील मुख्य चौकातून १ किमी अंतरावर कावावाडी किंवा कावामसुरे नावाची वाडी लागते. तेथे खाडीपलिकडील भगवंतगड गावात जाण्यासाठी होडी मिळते. भगवंतगड गावात उतरल्यावर डाव्या हाताच्या रस्त्याने ५ मिनीटे चालल्यावर आपण शाळेजवळ पोहचतो. तेथून मळलेली वाट गडावर जाते. मालवणहून एसटी किंवा रिक्षाने थेट भगवंतगड गावात जाता येते.

राहाण्याची सोय

गडावर रहाण्याची सोय नाही, पण मालवणमध्ये राहण्याची सोय होऊ शकते.

जेवणाची सोय

गडावर जेवणाची सोय नाही, जेवणाची सोय मसूरे गावात व मालवणमध्ये होऊ शकते.

पाण्याची सोय

गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.

सूचना:
मालवणहून सकाळी निघून भरतगड, भगवंतगड, सर्जेकोट हे किल्ले पाहून संध्याकाळी सिंधुदूर्ग व राजकोट हे किल्ले स्वत:च्या / खाजगी वहानाने (एस टी ने नव्हे) एका दिवसात पाहाता येतात.