हरीश्चंद्रगडावर जाण्यासाठी जे अनेक मार्ग आहेत त्यापैकी मुख्य मार्ग हा टोलारखिंडीतून जातो. पुणे जिल्ह्यातील खिरेश्वर आणि नगर जिल्ह्यातील कोथळे गावातून टोलारखिंडीत जाण्याचा मार्ग आहे. या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी भैरवगडाची निर्मिती करण्यात आली असावी. गडाचा आकार आणि रचना पाहाता या किल्ल्याची निर्मिती हरिश्चंद्रगडाच्या काळातच झाली असावी.

Bhairavgad-Kothale Fort, Bhairavgad-Kothale Fort Trek, Bhairavgad-Kothale Fort Trekking, Ahamadnagar

कोथळे या पायथ्याच्या गावाजवळ डोंगररांग चालु होते. यात सर्वात प्रथम एक पिंडीच्या आकाराचा डोंगर आहे. या डोंगराला "कोळथा" नावाने ओळखतात. त्यापुढे अजुन एक शिखर आहे. या शिखरापुढे थोडी सपाटी असलेला "भैरवगड" आणि त्यापुढे उंच "गाढवाचा डोंगर" अशी शिखरांची सुंदर माळ कोळथे गावातून दिसते.

भैरवगडावरील भैरोबा हे स्थानिक लोकांचे दैवत आहे. स्थानिक लोक गडावर जाणार्‍या दुसर्‍या शिडी खाली आपली पादत्राणे काढुन अनवाणी पायाने गडमाथ्यावर जातात. दरवर्षी चैत्रात भैरोबाची यात्रा भरते. कोळथेचा भैरवगड पाहुन टोलारखिंड मार्गे ५ ते ६ तासात हरिश्चंद्रगडावर जाता येते.

गडावरील पहाण्याची ठिकाणे

कोतुळ गावातून कोळथे गावाकडे जाताना गावाच्या अर्धा किमी अलिकडे (राजुरच्या बाजुने येताना कोळथे गावाच्या पुढे ) एक कच्चा रस्ता टोलार खिंडीकडे जातो. इथे हरिश्चंद्रगड कळसुबाई अभयारण्य असा मोठा फलक लावलेला आहे. तसच टोलारखिंडीकडे असा बाण दाखवलेला फलकही बसवलेला आहे. या रस्त्याने २ मिनिटे चालल्यावर डाव्या बाजुला एक पायवाट शेतांकडे जाते. या वाटेने आत वळल्यावर डाव्या बाजुला झुडुपाखाली "गवळ देवाची" मुर्ती आहे. ती पाहुन मळलेल्या वाटेने शेतां मधुन जात पुढे गेल्यावर वाट जंगलात शिरते. जंगलात शिरल्यावर खडा चढ चालु होतो. साधारण २० मिनिटात आपण गडाच्या कातळकोरीव पायर्‍यांपाशी पोहोचतो. या पायर्‍यांच्या पुढे डाव्या बाजूला कातळकड्या खाली एक पाण्याच टाक आहे. ते पाहुन परत पायवाटेवर येऊन एक वळसा मारल्यावर वनखात्याने बसवलेली पहीली शिडी आहे. शिडी चढुन वर गेल्यावर एक वळसा मारल्यावर पायवाटेच्या डाव्या बाजुला कातळाखाली खोदलेल पाण्याच टाक आहे. ते पाहुन पायवाटेने ५ मिनिट चढुन गेल्यावर कातळात खोदलेल खांब टाक दिसत. त्याच्या बाजुला एक बुजलेल टाक आहे. वनखात्याने त्यावर बसण्यासाठी दोन लोखंडी बाकडी ठेवलेली आहेत. टाक्या जवळच दुसरी मोठी शिडी आहे. ४० पायर्‍यांची शिडी चढुन गेल्यावर एक छोटी आडवी शिडी आहे. ती शिडी चढुन गेल्यावर आपण गडमाथ्यावर पोहोचतो.

गडमाथ्याचा विस्तार छोटा आहे. गडमाथ्यावर प्रवेश केल्यावर उजव्या बाजुला (उत्तरेला) भैरवाच ठाण आहे. त्याच्या बाजुला काही मुर्ती आणि वीरगळी ठेवलेल्या आहेत. समोरच्या बाजुला कातळात कोरलेली पाण्याची २ टाक आहेत. टाक्यांच्या मागे दोन दिपमाळा आहेत. भैरवाच्या मागच्या बाजुला कड्यावर रेलिंग लावलेले आहे. तिथुन समोर पसरलेला हरिश्चंद्रगड, त्यावरील तारमाती शिखर आणि हरीश्चंद्रगडाची "वेताळधार" स्पष्टपणे दिसते.

भैरवाच दर्शन घेउन विरुध्द दिशेला ( दक्षिणेला ) चालायला सुरुवात केल्यावर समोर भैरवगडापेक्षा उंच डोंगर दिसतो. त्याला "गाढवाचा डोंगर" म्हणतात. भैरवगड म्हणजे देवाचा रथ आणि त्याच्या पुढचा डोंगर म्हणजे रथ ओढणार गाढव अशी कल्पना करुन स्थानिक लोकानी या डोंगराला गाढव नाव दिलेल आहे. या डोंगराच्या दिशेने जाताना ५ टाक्यांचा एक समुह पाहायला मिळतो. पुढे गाढवाचा डोंगर आणि भैरवगड यांच्या मधिल गडाच्या टोकावर तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात. हे अवशेष पाहुन परत आल्यावर आपली गड प्रदक्षिणा पूर्ण होते. गड पाहायला अर्धा तास लागतो. भैरवगडावरुन पश्चिमेला हरिश्चंद्रगड, उत्तरेला शिरपुंज्याचा भैरवगड, पूर्वेला कुंजरगड दिसतात.

गडावर पोहोचण्याच्या वाटा

मुंबईहुन दोन मार्गाने कोळथे या भैरवगडाच्या पायथ्याच्या गावी जाता येते.
१) मुंबई - कल्याण - मुरबाड - माळशेज घाट मार्गे ओतुर गाठावे (अंतर १५९ किमी). ओतुर एसटी स्टॅंडच्या बाजूने एक रस्ता बामणवाडा - कोतुळ (अंतर ३० किमी) - विहिर (कुंजरगडाच्या पायथ्याचे गाव) मार्गे कोळथे (अंतर २५ किमी) या भैरवगडाच्या पायथ्याच्या गावात पोहोचतो. ( एकुण अंतर २१४ किमी )

२) मुंबई - इगतपुरी - घोटी - भंडारदरा - मार्गे राजुर ( अंतर १५५ किमी ) गाठावे. राजुरहुन कोतुळला जाणार्‍या रस्त्यावर राजुरपासुन ४१ किमीवर कोथळे हे भैरवगडाच्या पायथ्याचे गाव आहे.एकुण अंतर १९६ किमी

राहाण्याची सोय

कोथळे गावातील मंदिरात १० जणांची राहाण्याची सोय होते. किंवा १० किमी वरील पाचनई गावात राहाण्याची व्यवस्था आहे.

जेवणाची सोय

आपण स्वत: करावी. किंवा १० किमी वरील पाचनई गावात जेवणाची सोय होते.

पाण्याची सोय

गडावरील टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे.