महाराष्ट्रात एकुण ६ भैरवगड आहेत. त्यापैकी २ भैरवगड हरिश्चंद्रगडाच्या प्रभावळीत आहेत. हरिश्चंद्रगडावर टोलारखिंडी मार्गे येणार्‍या वाटेवर लक्ष ठेवण्यासाठी कोथळ्याचा भैरवगड आहे . तर राजुर मार्गे येणार्‍या वाटेवर लक्ष ठेवण्यासाठी शिरपुंज्याचा भैरवगड आहे. शिरपुंजे गावाच्या मागे असलेल्या भैरवगडावरील भैरोबा हे पंचक्रोशीतल्या लोकांचे दैवत आहे. दरवर्षी अश्विन महिन्यात या भैरोबाची यात्रा भरते.

Bhairavgad-Shirpunje Fort, Bhairavgad-Shirpunje Fort Trek, Bhairavgad-Shirpunje Fort Trekking, Ahamadnagar

गडावरील पहाण्याची ठिकाणे

भैरोबा हे पंचक्रोशीतल्या लोकांचे दैवत असल्यामुळे भैरववगडावर जाण्याची वाट व्यवस्थित मळलेली आहे..या वाटेवर अनेक ठिकाणी कातळकोरीव पायर्‍या आणि काही ठिकाणी रेलिंग्ज लावलेले आहेत. या वाटेने १ तासात आपण भैरवगड आणि त्याच्या बाजुचा डोंगर यामधील खिंडीत येउन पोहोचतो. येथे वरच्या अंगाला एक टाक आहे. पुढे कातळात कोरलेल्या सुंदर पायर्‍या आहेत. या पायर्‍या चढुन वर आल्यावर गडाची तटबंदी आणि उत्तराभिमुख उध्वस्त प्रवेशव्दार दिसते. प्रवेशव्दारातून गडावर प्रवेश केल्यावर उजव्या बाजुला कातळात कोरलेली ४ टाकी आहेत. त्याच्या पुढे एक कोरड टाक आहे. ते पाहुन गुहेकडे (दक्षिणेकडे) जाण्यार्‍या पायवाटेने चालायला सुरुवात केल्यावर डाव्या बाजुला मोठ खांब टाक आहे. टाक्यापर्यंत जाण्यासाठी असलेला मार्गही कातळ कोरुन बनवलेला आहे. या टाक्याच्या बाजुला एक रांजण खळगा कोरलेला आहे. तर टाक्याच्या वरच्या बाजूला तीन रांजण खळगे खोदलेले आहेत.टाक आणि त्यावरील रांजण खळगे पाहुन परत पायवाटेवर येउन गुहेच्या दिशेने जाताना उजव्या बाजुला कातळात कोरलेली ४ टाकी आहेत. त्याच्या वरच्या बाजुला अजुन ४ पाण्याची टाकी आहेत. टाक्याच्या बाजूला कातळात कोरलेली गुहा आहे. या गुहेला कमान असलेल प्रवेशव्दारही आहे.

टाक आणि गुहा पाहुन परत पायवाटेवर येउन उत्तरेला भैरोबाच्या गुहेकडे जातांना उजव्या बाजुला एक साडेचार फुट उंच वीरगळ आहे. पुढे डाव्या बाजुला, गुहेच्या वरच्या बाजूला एक वीरगळ. या वीरगळीच्या चारही बाजू कोरलेल्या आहेत. विरगळी जवळ गणपतीच्या झिजलेल्या मुर्ती शेंदुर फासुन ठेवलेल्या आहेत. त्या पाहुन कातळात खोदलेल्या पायर्‍या उतरुन कड्याच्या टोकावर कोरलेल्या भैरोबाच्या गुहेत जाताना बाहेरच्या बाजुला एक वीरगळ ठेवलेली आहे. गुहेत भैरोबाची अश्वारुढ मुर्ती आहे. भैरोबाच्या गुहेच्या बाजुला अस्लेल्या गुहेत १० जण राहु शकतात. गुहेच्या कड्याकडील बाजुला रेलिंग लावलेले आहे. येथुन शिरपुंजे गाव आणि आजुबाजूचा परीसर दिसतो. या रेलिंगच्या एका बाजुला फाटक बसवलेले आहे. तेथुन खाली उतरण्याचा मार्ग आहे. खालच्या बाजुस एक गुहा आहे. तिचा उपयोग टेहळणीसाठी होत असावा.

भैरोबाचे दर्शन धेउन गुहेच्या वरच्या बाजुला येउन डाव्या बाजुला वर चढायला सुरुवात केल्यावर कातळात कोरलेल एक टाक पाहायला मिळत. हे टाक पाहुन गडाच्या सर्वोच्च माथ्याकडे चालायला सुरुवात केल्यावर उजव्या बाजूला कातळात कोरलेल्या दोन गुहा आहेत. दोन खांबावर तोललेल्या मोठ्या गुहेत आता मात्र पाणी साठल्यामुळे ती एखाद्या टाक्यासारखी दिसते. मोठ्या गुहेच्या उजव्या बाजुला छोटी गुहा आहे. ती सुध्दा पाण्याने भरलेली आहे. गुहा पाहुन किल्ल्याच्या माथ्यावर जाणार्‍या पायवाटेने ५ मिनिटात आपण गड माथ्यावर पोहोचतो. इथे कातळात कोरलेली पाण्याची ३ टाकी आहेत. गडमाथ्यावरुन दक्षिणेला हरीश्चंद्रगड, पाबरगड हे किल्ले दिसतात.

गडावर पोहोचण्याच्या वाटा

मुंबईहुन दोन मार्गाने शिरपुंजे या भैरवगडाच्या पायथ्याच्या गावी जाता येते.

१) मुंबई नगर महामार्गावर कल्याण, मुरबाड, माळशेज घाट मार्गे १५९ किमी वरील ओतुर गाठावे. ओतुर बस स्थानकाच्या बाजूने एक रस्ता बामणवाडा मार्गे ३० किमी वरील कोतुळ गावात जातो. कोतुळहुन कोतुळ राजुर रस्त्यावर विहिर (कुंजरगडाच्या पायथ्याचे गाव) मार्गे कोळथे (कोळथेच्या भैरवगडाच्या पायथ्याचे गाव अंतर २५ किमी) गाठावे. कोथळेच्या पुढे खडकी गाव आहे. (खडकीतून एक रस्ता आंबित मार्गे शिरपुंज्याला जातो.हा जवळचा रस्ता आहे पण खराब आहे.) खडकी पासुन १० किमी अंतरावर माणिकओझर गाव आहे. (इथुन ४ किमीवर राजुर आहे.) माणिक ओझर गावातुन डावीकडे आंबितला जाणार्‍या रस्त्याने १६ किमी गेल्यावर शिरपुंजे खुर्द गाव लागते. या गावाच्या आधी नदीवरील पुल लागतो. पुल ओलांडल्यावर लगेच डाव्या बाजुस एक रस्ता वर चढताना दिसतो. येथे "कळसुबाई हरीशचंद्र अभायारण्य" अशी पाटीही लावली आहे. हा रस्ता थेट भैरवगडाच्या पायथ्या पर्यंत जातो. जीप सारखे वाहान पायथ्यापर्यंत जाते.

२) मुंबई नाशिक महामार्गावर घोटी पर्यंत जावे. घोटीहुन भंडारदरा मार्गे राजुर ( अंतर १५५ किमी ) गाठावे. राजुरहुन कोतुळला जाणार्‍या रस्त्यावर राजुरपासुन ४ किमीवर माणिक ओझर हे गाव आहे.माणिक ओझर गावातुन डावीकडे आंबितला जाणार्‍या रस्त्याने १६ किमी गेल्यावर शिरपुंजे खुर्द गाव लागते. या गावाच्या आधी नदीवरील पुल लागतो. पुल ओलांडल्यावर लगेच डाव्या बाजुस एक रस्ता वर चढताना दिसतो. येथे "कळसुबाई हरीशचंद्र अभायारण्य" अशी पाटीही लावली आहे. हा रस्ता थेट भैरवगडाच्या पायथ्या पर्यंत जातो. जीप सारखे वाहान पायथ्यापर्यंत जाते.

३) कोथळेचा भैरवगड किल्ला पाहून किंवा पाचनई वरुन भैरवगड शिरपुंजेला जाणार असल्यास कोतुळ - राजुरला रस्त्यावर कोथळेच्या पुढे खडकी गाव आहे. (खडकीतून एक रस्ता आंबित मार्गे शिरपुंज्याला जातो. हा जवळचा रस्ता आहे पण खराब आहे.) खडकी पासुन १० किमी अंतरावर माणिकओझर गाव आहे . (इथुन ४ किमीवर राजुर आहे.) माणिक ओझर गावातुन डावीकडे आंबितला जाणार्‍या रस्त्याने १६ किमी गेल्यावर शिरपुंजे खुर्द गाव लागते. या गावाच्या आधी नदीवरील पुल लागतो. पुल ओलांडल्यावर लगेच डाव्या बाजुस एक रस्ता वर चढताना दिसतो. येथे "कळसुबाई हरीशचंद्र अभायारण्य" अशी पाटीही लावली आहे. हा रस्ता थेट भैरवगडाच्या पायथ्या पर्यंत जातो. जीप सारखे वाहान पायथ्यापर्यंत जाते.

राजुरहुन आंबितला जाण्यासाठी एसटी बस आणि जीपची सोय आहे. त्याने शिरपुंजेच्या फ़ाट्यावर उतरुन चालत गडपायथा गाठण्यास पाउण तास लागतो.

राहाण्याची सोय

२७ किमी वरील पाचनई गावात राहाण्याची व्यवस्था आहे.

जेवणाची सोय

आपण स्वत: करावी.

पाण्याची सोय

गडावरील टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे.

जाण्यासाठी लागणारा वेळ

शिरपुंजे गावातून १ तासात गडावर जाता येते.