पश्चिम रेल्वेवर असलेल्या केळवेचा समुद्रकिनारा मुंबईकरांमध्ये प्रसिध्द आहे. या केळवे गावापासून ३ किमी अंतरावर भवानगड हा छोटेखानी किल्ला आहे. वसई मोहिमेदरम्यान पोर्तुगिजांवर वचक बसविण्यासाठी मराठ्यांनी या किल्ल्याची निर्मिती केली होती. दरवर्षी शिवरात्रीला या गडावर भवानगडेश्वराची यात्रा भरते.
Bhavangad Fort, Bhavangad Fort Trek, Bhavangad Fort Trekking, Thane
इतिहास
इ.स. १५२६ साली पोर्तुगिजांनी वसई किल्ल्याची उभारणी सुरु केली. त्याच बरोबर या भागावर वर्चस्व ठेवण्यासाठी शिरगाव, माहीम, केळवे या परिसरात किल्ल्यांची साखळीच तयार केली. पोर्तुगिजांनी स्थानिक जनतेवर धर्मांतरासाठी अत्याचार केले. या जुलमाच्या तक्रारी पेशव्यांकडे गेल्यावर, इ.स १७३७ मध्ये नरवीर चिमाजी आप्पांच्या नेतृत्वाखाली गंगाजी नाइक, शंकराजी फडके, बाजी रेठरेकर इ मातब्बर सरदार पोर्तुगिजांचे समूळ उच्चाटण करण्यासाठी पुढे सरसावले.
वसई मोहिमेत १७३७ च्या ऐन पावसाळ्यात २००० मजूरांकडून भवानगडाची उभारणी करण्यात आली. दांडाखाडीच्या रक्षणासाठी हा किल्ला बांधण्यात आला होता. वसई मोहिमेत या किल्ल्याने महत्त्वाची भूमिका बजावली
गडावरील पहाण्याची ठिकाणे
भवानगड छोट्या झाडीभरल्या टेकडीवर उभा आहे. पायथ्यापासून १० मिनिटात आपण भवानगडाच्या भग्न प्रवेशद्वारातून माचीवर प्रवेश करतो. माचीची तटबंदी मोठ मोठे दगड एकमेकांवर रचुन केलेली आहे.किल्ल्याची ऊभारणी युध्द पातळीवर केल्यामुळे या बांधकामात चून्याचा वापर केलेला आढळत नाही. गडाच्या माचीवर भवानगडेश्वराचे जिर्णोध्दारीत मंदिर आहे.
गडाच्या बालेकिल्ल्याचे पश्चिमाभिमूख प्रवेशद्वार गोमुखी पध्दतीचे आहे. याची कमान ढासळलेली आहे. परंतू बाजूचे बुरुज व तटबंदी शाबूत आहेत. बालेकिल्ल्याच्या प्रवेशव्दाराच्या बांधकामात चुन्याचा वापर केलेला आढळतो. प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूस पहारेकर्यांसाठी देवड्या आहेत. तेथून पुढे गेल्यावर दुसर्या उध्वस्त प्रवेशद्वारातून आपला बालेकिल्ल्यात प्रवेश होतो. समोरच पाण्याचे चौकोनी आकाराचे खडकात बांधलेले टाक दिसते. त्याच्या बाजूने गावकर्यांनी सिमेंटचा कट्टा बांधलेला आहे. टाक्यात भरपूर पाणी साठा आहे.
बालेकिल्ल्यांचा परिसर दाट झाडीत लपलेला आहे. टाक्याच्या उजव्या बाजूस असलेल्या तटबंदीवरुन गडफेरी चालू करावी. तटबंदीच्या उत्तर- पूर्व बाजूने एक पायवाट खाली उतरते. या वाटेवर डाव्या बाजूस दगडात खोदलेल्या दोन गुहा दिसतात. त्यांचा उपयोग धान्य साठविण्यासाठी केला जात असावा, ही पायवाट पूढे दांडपाड्यात जाते. आपण आल्या वाटेने परत तटबंदीवर जाऊन गडफेरी पूर्ण करावी. भवानगडावरुन दांडा खाडी व आजुबाजूचा विस्तृत प्रदेश दिसतो.
गडावर पोहोचण्याच्या वाटा
१) पश्चिम रेल्वेवरील केळवे व सफाळे या स्थानकांवरुन भवानगड सारख्याच अंतरावर आहे. सफाळे स्थानकात उतरुन दातिवरे गावात जाणार्या बसने किंवा ६ आसनी रिक्षाने मधुकरनगर स्टॉपवर उतरावे येथून दिड किमी वर भवानगड आहे.
२) केळवे स्थानकात उतरुन ६ आसनी रिक्षाने केळवे गावात यावे. गावातील चौकातून डाव्या हाताचा रस्ता दांडा खाडी ओलांडून दांडा गाव, खटाली गाव या मार्गे भवानगडाला जातो. हे अंतर ३ किमी आहे. या मार्गाने केळवे पाणकोट, फुटका बुरुज, कस्टम किल्ला, दांडा किल्ला पहात भवानगडाला जाता येते.
राहाण्याची सोय
गडावरील भवानगडेश्वर मंदिरात रहाण्याची व्यवस्था होऊ शकते.
जेवणाची सोय
गडावर जेवणाची व्यवस्था नाही, पण केळवे गावात आहे.
पाण्याची सोय
गडावर पाण्याची बारामाही व्यवस्था आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ
१) भवानगड(१५ किमी), दांडा किल्ला, फुटका बुरुज, कस्टम किल्ला (१५किमी), केळवे पाणकोट (१५ किमी) केळवे भुईकोट (३ किमी) माहिमचा किल्ला व (५ किमी) शिरगावचा किल्ला हे सर्व किल्ले एका दिवसात पाहून होतात. परंतु यासाठी समुद्राच्या भरती ओहोटीची वेळ माहित असणे फार महत्वाचे आहे. कारण केळवे पाणकोट केवळ ओहोटीच्या वेळी पाहाता येतो. ओहोटीची वेळ पाहून व्यवस्थित नियोजन केल्यास सर्व किल्ले एका दिवसात आरामात पाहाता येतात. पालघर किंवा केळवेहून दिवसभरासाठी ६ आसनी रिक्षा मिळू शकते.
२) केळवे माहिम परिसरातील ६ किल्ले स्वत:च्या वाहनाने किंवा रिक्षाने एका दिवसात पाहाता येतात. त्यासाठी प्रथम भरती ओहोटीचे वेळापत्रक पहावे, कारण केळवे पाणकोट केवळ ओहोटीच्या वेळी पाहाता येतो. जर ओहोटी सकाळी असेल तर प्रथम केळवे पाणकोट पहावा. नंतर दांडा किल्ला, भवानगड पाहून परत केळवेत यावे. जेवण करुन केळवे भुईकोट, माहिमचा किल्ला, शिरगावचा किल्ला पाहून पालघरला जावे. ओहोटी संध्याकाळी असल्यास पालघर स्थानकात उतरुन रिक्षा करुन ५ किमी वरील शिरगाव (५ किमी) वरील माहिमचा किल्ला, महकावती देवीचे मंदीर (४ किमी वरील) केळवे भुईकोट,(३ कि मी) वरील भवानगड पाहून शेवटी परत केळवे गावात येऊन ओहोटीला केळवे पाणकोट पहावा व ८ किमी वरील केळवे स्थानक गाठावे.
३) दांडा किल्ला, केळवे पाणकोट, केळवे भुईकोट, माहिमचा किल्ला, शिरगावचा किल्ला यांची माहिती साईटवर दिलेली आहे.