भोरगिरी - भिमाशंकर - खांडस हा प्राचिन व्यापारी मार्ग होता. त्याकाळी कल्याण बंदरात उतरणारा माल घाटावर ह्या मार्गाने जात असे. भिमाशंकर पायथ्याचा खांडस बाजुचा पदरगड आणि राजगुरुनगर बाजुचा भोरगिरी हे दोन प्राचीन किल्ले ह्या मार्गाचे रक्षण करण्यासाठी बांधलेले होते. तसच भिमाशंकर आणि भोरगिरीच कोटेश्वर मंदिर ही विश्रांती स्थान होती.

Bhorgiri Fort, Bhorgiri Fort Trek, Bhorgiri Fort Trekking, Pune

भोरगिरी गावातील भिमा नदीच्या काठी असलेल प्राचीन कोटेश्वर मंदिर झंझ राजाने बांधलेल होत अस म्हणतात. आता त्याजागी नविन मंदिर उभ असल तरी पुरातन मंदिराचे अवशेष आजुबाजूला विखुरलेले पाहायला मिळतात. त्यावरुन मंदिराची कल्पना करता येते.

राजगुरुनगर-भोरगिरी रस्त्यावर असलेल्या चास गावातील गढी आणि दिपमाळ, भोरगिरी गावातील कोटेश्वर मंदिर, भोरगिरीचा किल्ला आणि भोरगिरी - भिमाशंकर हा ट्रेक अशी सर्व ठिकाण भोरगिरी किल्ल्या बरोबर पाहाता (करता) येतात.

भिमाशंकर ते भोरगिरी अंतर ८ किमी आहे. हा ३ तासाचा सोपा ट्रेक आहे. या ट्रेक बद्दल सविस्तर माहिती साईट वरील डिस्कशन फ़ोरम मधील "रेंज ट्रेकस इन सह्याद्री" (Range treks in Sahyadri) मधे दिलेली आहे.

पहाण्याची ठिकाणे

भोरगिरी गावातून गावा मागील डोंगरावर असलेल्या किल्ल्याच्या अर्ध्या उंचीवर कातळात खोदलेल्या दोन गुहा आणि त्यांच्या बाहेर फ़डकत असलेला भगवा झेंडा दिसतात. एक छोटा ओढा ओलांडुन आपण पाच मिनिटात किल्ल्याच्या पायथ्याषी पोहोचतो. पायथ्यापासून गुहेकडे जातांना शेवटच्या टप्प्यात कातळात कोरलेल्या पायर्‍या दिसतात. पायथ्यापासून ५ मिनिटात आपण पहिल्या गुहेपाशी पोहोचतो. पहिल्या गुहेचे ओसरी आणि मुख्य गुहा (गर्भगृह) असे दोन भाग आहेत. ओसरीच्या दोनही बाजुला पाण्याची टाक आहेत. गुहा चार खांबांवर तोललेली असुन आत देवीची मुर्ती बसवलेली आहे. गुहेच्या डाव्या बाजूच्या पाण्याच्या टाक्या शेजारी पिंडी व नंदी आहे. पहिल्या गुहेच्या पुढे दुसरी गुहा आहे. दुसरी गुहा प्रशस्त आहे. या गुहेचेही ओसरी आणि गर्भगृह असे दोन भाग आहेत. ओसरी चार खांबांवर तोललेली आहे. ओस्ररीत दोन पिंडी आणि नंदी आहेत. गर्भगृहात शंकराची पिंड आहे. या गुहा पाहुन झाल्यावर पुन्हा आलेल्या वाटेने परत जाऊन गुहेच्या विरुध्द दिशेला असलेल्या पायवाटेने (डोंगर डाव्या बाजूला आणि दरी उजव्या बाजूला ठेउन) डोंगर चढायला सुरुवात करावी. पाच मिनिटात आपण कोसळलेल्या तटबंदीतून गडमाथावर प्रवेश करतो. समोरच एक सातवाहानकालिन पाण्याचे टाक आहे. या टाक्याचे तीन भाग असून दोन भागात पाणी आहे. तर तिसरा भाग कोरडा आहे. या कोरड्या टाक्यात एक वीरगळ ठेवलेली आहे. हे टाक पाहूम डाव्या बाजूने गड प्रदक्षिणेला सुरुवात केल्यावर एक पाण्याच कातळात खोदलेल पण बुजलेल टाक दिसत. या टाक्याच वैशिष्य़ म्हणजे त्याच्यावर एक शंकराचे छोटी पिंड कोरलेली आहे. पुढे गेल्यावर काही अंतरावर पाण्याच जोड टाक आहे. डोंगराला वळसा घालून पुढे गेल्यावर पाण्याच एक टाक आहे. या टाक्याच्या बाजूला एक पूर्ण झिजलेली मुर्ती शेंदुर फ़ासून ठेवलेली आहे. किल्ल्याच्या डोंगरावर गर्द झाडीत काही पिंडी आणि वीरभद्राची भंगलेली मुर्ती उघड्यावर ठेवलेली आहे. या पिंडींच्या अलिकडेच एक वाट खाली उतरतांना दिसते. या पायवाटेने खाली उतरल्यावर उजवीकडे गेल्यावर कातळात खोदलेल्या पायर्‍या व एक बुजलेली गुहा पाहायला मिळते.ती पाहुन परत पायवाटेवर आल्यावर डाव्या बाजूला पायवाट खाली उतरते तिथे उध्वस्त प्रवेशव्दाराचे अवशेष पाहायला मिळतात. या प्रवेशव्दारातून जाणारी पायवाट भिमाशंकरला जाते.

पोहोचण्याच्या वाटा

भोरगिरीला जाण्यासाठी मुंबई आणि पुण्याहुन तळेगाव मार्गे -चाकण- राजगुरुनगर गाठावे. राजगुरुनगर - चास - वाडा - डेहेणे - शिरगाव ( येथुन भिमाशंकरला जाणारा फाटा आहे. अंतर २१ किमी) - भोरगिरी असा रस्ता आहे. (राजगुरु नगर ते भोरगिरी अंतर ५५ किमी आहे). राजगुरु नगरहुन वाडाला जाण्यासाठी बसेस आणि जीपची सोय आहे. वाडा ते भोरगिरी स्पेशल जीप करुन जावे लागते. राजगुरु नगर ते भोरगिरी स्पेशल जीप करुनही जाता येते.

मुंबईहुन बोरीवली - भोरगिरी ही बस भोरगिरीला सकाळी १०.०० वाजता पोहोचते. कल्याण - भोरगिरी ही बस भोरगिरीला दुपारी २.०० वाजता पोहोचते. दोनही बस १५ मिनिटे थांबुन परत जातात. या दोनही बस राजगुरुनगर मार्गे भोरगिरीला जातात.

भोरगिरीला येण्याचा दुसरा मार्ग म्हणजे मुंबई आणि पुण्याहुन बसने भिमाशंकर गाठावे. भिमाशंकर ते भोरगिरी अंतर ८ किमी आहे. हा ३ तासाचा सोपा ट्रेक आहे.

राहाण्याची सोय

कोटेश्वर मंदिरात आणि किल्ल्यावरील गुहेत १० जणांची रहाण्याची सोय होऊ शकेल.

जेवणाची सोय

जेवणाची सोय स्वत: करावी.

पाण्याची सोय

गडावरील टाक्यात पिण्याच्या पाणी आहे.