जव्हार हे ठाणे जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. याच जव्हारच्या जवळ, एका दिवसात जाऊन पाहून येण्यासारखा किल्ला आहे. त्याचे नाव भूपतगड. या आदिवासी परिसरात उन्हाळ्यामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष मोठ्या प्रमाणावर जाणवते. प्राचिनकाळी डहाणू, (नाला) सोपारा बंदरांमध्ये उतरलेला माल जव्हार मार्गे गोंडा गाट, थळ घाटाने त्र्यंबकेश्वर डोंगररांग ओलांडून नाशिकच्या बाजारपेठेत जात असे. या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी समुद्र किनार्‍यावर डहाणूचा किल्ला, घाटाखाली भूपतगड व त्र्यंबकेश्वर डोंगररांगेत बसगड (भास्करगड), हरिहर, त्र्यंबक, त्रिंगलवाडी हे गड बांधण्यात आले.

Bhupatgad Fort, Bhupatgad Fort Trek, Bhupatgad Fort Trekking, Thane

गडावरील पहाण्याची ठिकाणे

भूपतगडावर आपला प्रवेश नष्ट झालेल्या दरवाज्याच्या अवशेषामधून होतो. गडाला उत्तरेकडे व दक्षिणेकडे असे एकूण दोन दरवाजे होते. आज हे दोन्ही दरवाजे नष्ट झालेले आढळतात. प्रवेशव्दारापाशी असणारे बुरुज कसेबसे तग धरुन उभे आहेत. प्रवेशव्दारापाशी एक म्हसोबाची मूर्ती आहे. आत शिरल्यावर समोर हनुमानाची मूर्ती दिसते. गडमाथा बराच विस्तीर्ण आहे. माथ्यावर एका मोठ्या पडक्या वाड्याचे अवशेष आहेत. या वाड्याच्या भिंती अजूनही काही ठिकाणी शिल्लक आहेत. वाड्याच्या मागच्या बाजूला पाण्याचा मोठा हौद आहे. गडाच्या ४ पाण्याची खोदीव टाकी दिसतात. या टाक्यांजवळच एक कोरडा तलाव आहे. संपूर्ण गडमाथा फिरण्यास अर्धा तास लागतो. गडावरुन त्रिंगलवाडी, हरिहर, त्र्यंबकेश्वर, जव्हार, मोखाडा असा सर्व परिसर दिसतो.

गडावर पोहोचण्याच्या वाटा

१) मुंबईहुन - भिवंडी - वाडामार्गे अथवा कसारा - खोडाळामार्गे जव्हार (दोन्ही मार्गांनी अंतर अंदाजे १३० कि.मी.) गाठावे. जव्हारपासून १७ कि.मी अंतरावर झाप नावाचे गाव आहे. येथे २ फाटे फुटतात. या ठिकाणी उजव्या बाजूचा रस्ता झाप गावात जातो आणि सरळ जाणारा रस्ता १ किमी अंतरावर चिंचवाडी गावात जातो. या फाट्यापासून १० मिनिटांवर चिंचवाडी आहे. चिंचवाडीतून कच्च्या रस्त्याने एक टेकाड पार केल्यावर आपण भूपतगडाच्या पायथ्याशी पोहोचतो.गडाचा चिंचवाडीतून गडाचा पायथा गाठण्यास अर्धा तास पुरतो. गडाच्या पायथ्यापासून गड डावीकडे ठेवत वाट तिरपी तिरपी वर जाते. पायथ्यापासून गडमाथा गाठण्यास सुमारे अर्धा तास लागतो.

२) मुंबईहुन पश्चिम द्रुतगती मार्गाने बोरीवली -मनोर -विक्रमगड - जव्हार (अंतर अंदाजे १४८ कि.मी.) गाठावे. जव्हारपासून १७ कि.मी अंतरावर झाप नावाचे गाव आहे. येथे २ फाटे फुटतात ऊजवी कडचा रस्ता झाप गावात जातो आणि सरळ जाणारा रस्ता १ किमी अंतरावर चिंचवाडी गावात जातो. या फाट्यापासून १० मिनिटांवर चिंचवाडी आहे. चिंचवाडीतून कच्च्या रस्त्याने एक टेकाड पार केल्यावर आपण भूपतगडाच्या पायथ्याशी पोहोचतो.गडाचा चिंचवाडीतून गडाचा पायथा गाठण्यास अर्धा तास पुरतो. गडाच्या पायथ्यापासून गड डावीकडे ठेवत वाट तिरपी वर जाते. पायथ्यापासून गडमाथा गाठण्यास सुमारे अर्धा तास लागतो.

राहाण्याची सोय

गडावर रहाण्याची सोय नाही.

जेवणाची सोय

जव्हार मध्ये जेवणाची सोय होऊ शकते

पाण्याची सोय

गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.

जाण्यासाठी लागणारा वेळ

गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.