नाशिक जिल्ह्यातील बागलाण भागात सालोटा, साल्हेर, मुल्हेर, डेरमाळ, पिसोळ सारखे मोठे किल्ले आहेत. तसेच बिष्टा, कर्‍हा, दुंधा, अजमेरा सारखे अपरिचित किल्ले आहेत. सटाणा तालुक्यातून जाणार्‍या दुंधेश्वर डोंगररांगेवर असलेल्या या चार किल्ल्यांचा वापर चौकीचे किल्ले म्हणून केला गेला. बिष्टा किल्ल्याला बिजोट्याचा किल्ला या नावानेही ओळखले जाते. बिष्टा किल्ला ज्या कोडबेल/कोटबेल गावापासून जवळ आहे त्या गावाजवळ फ़ोपिरा नावाचा डोंगर आहे. त्याच्या उंचीमुळे आणि टोपी घातल्यासारख्या आकारामुळे तो बिष्टा आणि कर्‍हा किल्ल्यावरुन स्पष्ट दिसतो.

Bishta Fort, Bishta Fort Trek, Bishta Fort Trekking, Nashik

खाजगी वहानाने दोन दिवसात हे चारही किल्ले आणि देवळाणे गावातील जोगेश्वर मंदिर व्यवस्थित पाहाता येते. पहिल्या दिवशी सकाळी कोट्बारी या बिष्टा किल्ल्याच्या पायथ्याच्या गावात पोहोचावे. गावातून गाईड घेऊन बिष्टा किल्ला पाहावा. बिष्टा किल्ल्याला जाऊन परत गावात येण्यास ४ ते ५ तास लागतात. बिष्टा पाहून झाल्यावर जेवण करुन कर्‍हा किल्ला गाईड घेऊन पाहावा. पायथ्यापासून कर्‍हा किल्ला पाहून परत येण्यास ३ तास लागतात. कर्‍हा किल्ला पाहून झाल्यावर देवळणेचे जोगेश्वर मंदिर पाहावे. महादेवाचे दर्शन घेऊन दुंधा किला गाठावा. तो पाहाण्यास एक तास लागतो. दुंधा किल्ल्याच्या पायथ्याशी मुक्काम करावा किंवा पहाडेशवर येथे जाऊन अजमेरा किल्ल्याच्या पायथ्याशी मुक्काम करावा. यापैकी कुठल्याही ठिकाणी जेवणाची सोय होत नाही. आपला शिधा बरोबर बाळगावा. कर्‍हा, अजमेरा आणि दुंधा किल्ल्याची माहिती साईटवर दिलेली आहे.

गडावरील पहाण्याची ठिकाणे

कोडबेल हे बिष्टा किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. नामापूर पासून १० किमी आणि सटाण्यापासून १७ किलोमीटर आहे. कोडबेल गावातील बस स्थानकाच्या चौकातून बिष्टा किल्ल्याकडे जाताना चौकातच डावीकडे ४ वीरगळी आणि १ वीर-सतीगळ आहे. गावातून वाटाड्या घेउन किल्ल्याच्या दिशेने चालायला सुरुवात केल्यावर कच्चा रस्ता चालू होतो. या रस्त्यावर डाव्या बाजूला सागाचे वन आणि बंगला आहे. येथून आडवे चालत गेल्यावर २ घरांची वस्ती आहे. येथे शेताच्या बांधावर एक वीरगळ आहे. स्थानिक लोक तीला चिरा म्हणतात. वीरगळ पाहून पुढे गेल्यावर ओढा आडवा येतो. सुकलेला ओढा ओलांडल्यावर समोर एक डोंगर येतो तो चढून गेल्यावर दोन घरांची वस्ती आहे. तेथून डाव्या बाजूला नदीच / ओढ्याच्या पात्रात बांधलेले धरण दिसते. धरणाच्या भिंतीवरुन पलीकडे जाउन शेतातून पुढे चालत गेल्यावर एक घर लागते. त्या घराजवळ नदीपात्रात उतरुन ५ मिनिटे चालल्यावर बिष्टा किल्ल्या समोरचा एक डोंगर आडवा येतो. तो चढून गेल्यावर आपण बिष्टा किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो. बिष्टा किल्ला दक्षिण-उत्तर पसरलेला आहे. आपण किल्ल्याच्या दक्षिण टोकाकडून (किल्ल्याकडे तोंड करुन उभे राहील्यावर डाव्या बाजूने) चढायला सुरुवात करावी. किल्ल्याला वळसा घालून वाट किल्ला आणि त्याच्या मागील बाजूचा डोंगर यांच्या मधल्या घळीतून वर चढत जाते. घळीतून चढतांना उजव्या बाजूला किल्ल्याच्या पाउण उंचीवर गुहा दिसतात. तेथे जाण्याचा मार्ग मात्र थोडा कठीण आहे. प्रस्तरारोहणाचे तंत्र वापरुन या गुहा पाहाता येतात. या ठिकाणी दोन मोठी पाण्याची टाक आणि गुहा आहेत. किल्ल्यावर येणार्‍या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी ही उत्तम जागा आहे. गुहा पाहून परत पायवाटेवर येउन ५ मिनिटात आपला गडावर प्रवेश होतो. गडावर आल्यावर उजव्या बाजूला पाण्याचे एक कोरडे टाक आहे. टाक्यापासून वर चढून गेल्यावर आपण गडमाथ्यावर पोहोचतो. गडमाथा लांबवर पसरलेला आहे. माथ्यावर ६ उध्वस्त वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात. ते पाहून परत टाक्यापाशी आल्यावर आपली गडफ़ेरी पूर्ण होते. गड माथ्यावरुन कर्‍हा किल्ला, फ़ोपिरा डोंगर आणि अजमेरा किल्ला दिसतात.

कोडबेल गावातून किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत पोहोचण्यास एक ते दिड तास लागतो. किल्ला चढण्यास अर्धा ते पाऊण तास आणि किल्ला पाहाण्यास अर्धा तास लागतो. अशाप्रकारे कोडबेल गावातून किल्ला पाहून परत येण्यास चार ते पाच तास लागतात.

किल्ल्यावर फ़ारसा वावर नाही, किल्ल्याला जाणारी मळलेली वाटही नाही त्यामुळे किल्ला पाहाण्यासाठी गावातून गाईड घ्यावा.

गडावर पोहोचण्याच्या वाटा

मुंबईहून नाशिक मार्गे सटाणा गाठावे. सटाणा पासून १७ किमीवर किल्ल्याच्या पायथ्याचे कोडबेल/कोटबेल हे गाव आहे. सटाणाहून दिवसातून ५ एसटी बसेस कोडबेलला जातात. सकाळी ७.३० सटाणा-भिलपुरी, सटाणा-चिंचवा दुपारी ११.३०, संध्याकाळी ५.०० वाजता सटाणा-चिंचवा. साक्री-सटाणा सकाळी ७. ०० वाजता गावात येते. गावातून ६ आसनी रिक्षा नामापूरला जातात.

राहाण्याची सोय

गडावर राहाण्याची सोय नाही.

जेवणाची सोय

जेवणाची सोय सटाणा येथे आहे.

पाण्याची सोय

गडावर आणि रस्त्यात पिण्याचे पाणी नाही.

जाण्यासाठी लागणारा वेळ

कोडबेल गावापासून २ ते २.५ तास.