पुणे-नाशिक मार्गावर असलेला चाकणचा भुईकोट किल्ला ऊर्फ संग्रामगड हा फिरंगोजी नरसाळा या किल्लेदाराने बलाढ्य मोगली सेनेसमोर सलग ५५ दिवस लढवल्यामुळे शिवचरीत्रात प्रसिद्ध आहे. प्राचीनकाळी चाकण हे घाटमाथ्यावरील व्यापारी केंद्र होते. त्याच्या रक्षणासाठी चाकणचा भुइकोट बांधण्यात आला. या किल्ल्यावरुन घोटण, पौड या मावळांवर आणि घोडनेर, भीमनेर या नेरांवर नजर ठेवता येत असे.

Chakan Fort, Chakan Fort Trek, Chakan Fort Trekking,, Pune

इतिहास

चाकणचा भुईकोट किल्ला हा प्राचीन किल्ला आहे. अनेक ऐतिहासिक प्रसंगांना साक्षी असलेल्या या किल्ल्यांचा ताबा देवगिरीच्या यादवांचा पाडाव झाल्यावर अल्लाउद्दीन खिलजीकडे गेला. त्यानंतर अल्लाउद्दीनशहा बहामनीने घाटमाथा व कोकणपट्टीवर कब्जा करण्याचे निश्चित केले. ही कामगिरी मलिक उत्तुजारवर सोपवण्यात आली. त्याने चाकण येथे आपले प्रमुख ठाणे केले (१४५३). या मोहिमेत विशालगडावर स्वारी करण्यासाठी निघालेल्या मलिक उत्तुजारच्या सेनेला शिर्के व मोरे यांनी फसवून त्यांच्यावर या मोक्याच्या जागी अचानक हल्ला करुन मलिक उत्तुजार सह २५०० जणांची कत्तल केली.

शिवाजी राजांचे पणजोबांचे (बाबाजी), वडील मालोजी व खेळोजी यांना दौलताबादचा सुभेदार अमिरशा याने चाकण चौऱ्यांशी परगण्याची जहागिरी दिली होती. पुढे चाकण प्रांत शहाजीराजांच्या जहांगिरीत होता. शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला, त्यावेळी फिरंगोजी नरसाळा किल्लेदार होता. त्याने राजांशी निष्ठा व्यक्त केली व राजांनी त्याचीच किल्लेदार म्हणून नेमणून केली.

२१ जून १६६० रोजी शाहिस्तेखानाच्या २० हजार फौजेने चाकणच्या भुइकोटला वेढा घातला. त्यावेळी किल्ल्यात ६०० ते ७०० मराठे होते, धनधान्य व दारुसाठा पुष्कळ होता. मराठ्यांनी तोफा, बंदुकी व रात्रीचे मोगल सैन्यावर छापे घालून किल्ला भांडता ठेवला. दिवसामागून दिवस उलटले तरी किल्ला पडत नाही हे पाहून शाहिस्तेखानाने ईशान्येकडील बुरुजापर्यंत भुयार खोदले. वेढ्याचा ५५ वा दिवस १४ ऑगस्ट १६६०, या दिवशी भुयारात दारु भरुन बत्ती देण्यात आली. १५ ऑगस्ट १६६० रोजी मोगलांनी निकराचा हल्ला केला. मराठे बालेकिल्ल्याच्या आश्रयाने लढले, पण मराठ्यांचे बळ व सामग्री संपत आली होती. त्यामुळे त्यांनी किल्ला मोगलांच्या ताब्यात दिला.

पाहण्‍याची ठिकाणे

चाकणचा किल्ला भुईकोट प्रकारात येत असून कालौघात किल्ल्याची पडझड झाली असून फारसे अवशेष बघायला मिळत नाहीत. चाकणचा किल्ला पूर्व पश्चिम असा असून पूर्वेकडून आपण किल्ल्यात प्रवेश करतो. प्रवेश करतांना खंदक आणि तटबंदी पाहायला मिळते त्यावरून किल्ल्याची सुरक्षा चोख असावी असे कळते. किल्ल्याची तटबंदी उंच असून दगड आणि विटांचे बांधकाम आढळून येतं. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला देवडी आहे. प्रवेशद्वार पाहून सरळ किल्ल्यात गेल्यास श्री दामोदर विष्णू मंदिर बांधलेले दिसते आणि मंदिराच्या दोन्ही बाजूला तोफा ठेवलेल्या असून बाजूला कातळात कोरलेली ३ शिल्पे पाहायला मिळतात आणि मंदिराच्या विरुद्ध दिशेला एक तोफ ठेवलेली दिसते त्याच्याच बाजूला मशिद आहे. मंदिर आणि मशिद अलिकडच्या काळातील बांधणीचे असावे. तिथूनच किल्ल्याच्या बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. किल्ल्याच्या तटबंदीवरून किल्ल्याचा संपूर्ण परिसर न्ह्याहाळता येतो. किल्ल्याची दुरुस्ती सिमेंट वापरून करण्याचा प्रयत्न केला असावा असा तटबंदीवरील कामावरून अंदाज लावता येतो. तटबंदीवर बंदुका डागण्यासाठी आजूबाजूला सलग ५ ते ६ खोबण्या केलेल्या दिसतात. तटबंदीवरून ३ बुरुज स्पष्टपणे पाहता येतात. अतिक्रमणामुळे आणि अनधिकृत बांधकामामुळे किल्ल्यातून जाण्या येण्याचा सिमेंटचा रस्ता बांधण्यात आला आहे.

पोहोचण्याच्या वाटा

मुंबई - तळेगाव - चाकण या मार्गाने चाकणला जाता येते. चाकण बस स्थानकापासून उजव्या हाताला गेल्यास मराठी प्रशाले समोरून प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यास किल्ल्याच्या मागच्या बाजूने आपला प्रवेश होतो. इंदुरीचा किल्ल्यापासून चाकणचा किल्ला १५ किलोमीटर अंतरावर आहे.