पश्चिम रेल्वेवर असलेल्या केळवेचा समुद्रकिनारा मुंबईकरांना सुपरिचित आहे. पश्चिम रेल्वेवरील केळवे स्थानकापासून ९ कि.मी व केळवे गावातून १ कि.मीवर दांडा खाडी आहे. या खाडीचे रक्षण करण्यासाठी पोर्तुगिजांनी दांडा किल्ल्याची निर्मिती केली होती.

Danda Fort, Danda Fort Trek, Danda Fort Trekking, Thane

गडावरील पहाण्याची ठिकाणे

दांडा किल्ल्याचे फारच थोडे अवशेष उरलेले आहेत. ते अवशेषही गावभर विखुरलेले आहेत. केळवे गावातून दांडाखाडी ओलांडून दांडा गावात शिरल्यावर डाव्या हाताला दांडा किल्ल्याचे काही अवशेष दिसतात. या ठिकाणी वाढलेल्या वडाच्या झाडांनी हे अवशेष धरुन ठेवलेले आहेत. गावकर्‍यांनी या जागी सार्वजनिक संडास बांधला आहे. अवशेषावरुन येथे किल्ल्याचे प्रवेशद्वार असावे असे वाटते. प्रवेशद्वाराच्या बाजूच्या देवडी प्रमाणे दिसणारा भाग ओळखता येतो. या ठिकाणी एक चौकोनी विहिर आहे. गडाचे इतर अवशेष गावात विखुरलेले आहेत. दांडा फुटका बुरुज:- दांडा किल्ल्याच्या संरक्षणासाठी पोर्तुगिजांनी दांडा फुटका बुरुजाची उभारणी केली. सदर फुटका बुरुज दांडा पुलाजवळ उध्वस्त अवस्थेत आहे.

गडावर पोहोचण्याच्या वाटा

१) भवानगड(१.५ किमी), दांडा किल्ला, फुटका बुरुज, कस्टम किल्ला (१.५किमी), केळवे पाणकोट (१.५ किमी) केळवे भुईकोट (३ किमी) माहिमचा किल्ला व (५ किमी) शिरगावचा किल्ला हे सर्व किल्ले एका दिवसात पाहून होतात. परंतु यासाठी समुद्राच्या भरती ओहोटीची वेळ माहित असणे फार महत्वाचे आहे. कारण केळवे पाणकोट केवळ ओहोटीच्या वेळी पाहाता येतो. ओहोटीची वेळ पाहून व्यवस्थित नियोजन केल्यास सर्व किल्ले एका दिवसात आरामात पाहाता येतात. पालघर किंवा केळवेहून दिवसभरासाठी ६ आसनी रिक्षा मिळू शकते.

२) भवानगड, केळवे पाणकोट, केळवे भुईकोट, माहिमचा किल्ला व शिरगावचा किल्ला या किल्ल्यांची माहीती साईटवर दिलेली आहे.