नाशिक जिल्ह्यातील गाळणा टेकड्यांच्या रांगेतील सर्वात दुर्गम किल्ला म्हणजे डेरमाळचा किल्ला. या किल्ल्यावर असलेली पाण्यची टाकी आणि डेरमाळला लाभलेला हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यासारखा अर्धगोलाकार आकार असलेला रौद्रभिषण भैरवकडा हे या किल्ल्याचे वैशिष्ट्य आहे. नीट नियोजन केल्यास खाजगी वहानाने डेरमाळ किल्ल्याला आणि पिसोळ किल्ल्याला एका दिवसात भेट देता येत.
Dermal Fort, Dermal Fort Trek, Dermal Fort Trekking, Nashik
गडावरील पहाण्याची ठिकाणे
टिंघरी गावातून डेरमाळ किल्ल्यावर जाण्यासाठी प्रथम टिंघरी गावासमोर असलेला डोंगर चढत डाव्या बाजूची खिंड गाठावी लागते. हि खिंड पार केल्यावर आपण पठारावर पोहोचतो. याठिकाणाहून आपल्याला डेरमाळ किल्ल्याचे पहिल दर्शन होते. हे पठार पार केल्यावर थोडेसे खाली उतरुन आपण दुसर्या पठारावर पोहोचतो. हे पठार थेट डेरमाळ किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत पोहोचलेले आहे. या पठारावरुन चालत किल्ल्याच्या जवळ आल्यावर झाडीत एक विरगळ आहे. एका ३ फ़ुट उंच दगडावर गोड्यावर बसलेला योध्दा कोरलेला आहे. या विरगळीच्या मागे एक सुकलेला तलाव आहे. या विरगळी पासून किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा फ़ुटतात. सरळ जाणारी वाट ही किल्ल्याची मुख्यवाट आहे. हि वाट आपल्याला किल्ल्याच्या दक्षिण दरवाजात घेऊन जाते. तर उजव्या बाजूने (तलावाच्या बाजूने) जाणारी वाट फ़ारशी मळलेली नाही, पण ही वाट आपल्याला थेट उत्तर दरवाजात घेऊन जाते.
विरगळापासून किल्ल्यावर जाणारी वाट प्रशस्त आणि मळलेली आहे. या वाटेने अर्ध्या तासात आपण उध्वस्त दरवाजातून गडावर प्रवेश करतो. गडावर प्रवेशकेल्यावर डाव्या बाजूला भैरवकडा आणि उजव्य बाजूल गडाचा विस्तार दिसतो. गड प्रशस्त आहे. यावर फ़ारसा वावर नसल्याने वाटा मोशलेल्या आहेत त्यामुळे गडावरील अवशेष शोधावे लागतात. भैरवकडा डावीकडे ठेवत किल्ल्याच्या टोकावर एक वास्तू दिसते त्या दिशेने चालत जावे. जातांना उजव्या बाजूला दोन पाण्याची टाकी दिसतात. इमारतीची दरवाजाची कमान आणि दर्शनी भिंत फ़क्त शाबूत आहे. दरवाजातून आत शिरल्यावर आपण थेट कड्यावर पोहोचतो. येथून हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यासारखा अर्धगोलाकार आकार असलेला भैरवकड्याचे रौद्रभिषण रुप आणि आजूबाजूच्या डोंगरदर्या फ़ार सुंदर दिसतात. याठिकाणी कड्यावर कातळात दोन पावल कोरलेली आहेत त्यांना आदिवासींच्या बहिरव देवाची (भैरव) पावलं म्हणतात.
इमारतीतून बाहेर पडून आता डाव्या बाजूला जावे. थोड्याच अंतरावर कातळात खोदलेल्या सात टाक्यांचा समूह आहे. यातील पाण्यावर शेवाळे साचलेले आहे. या टाक्यांच्या वरच्या बाजूला दोन टाकी आहेत. या टाक्यांपासून थोडे पुढे गेल्यावर वाट झाडीत शिरते. याठिकाणी तटबंदीचे अवशेष आहेत. त्यावर चढून गेल्यावर कातळात खोदलेली दोन मोठी पाण्याची टाकी आहेत. ती पाहून परत सात टाक्यांपाशी येउन वर दिसणार्या टेकाडावर चढायचे, इथे एके ठिकाणी उघड्यावर हनुमानाची आणि गणेशाची मूर्ती आहे. या मूर्तीच्या बरोबर डावीकडून एक वाट खाली उतरते. इथेच एक भूमीगत गुहा खोदलेली आहे. ही गुहा ७ ते ८ लोकांच्या मुक्कामा करीता योग्य आहे. गुहेच्या समोरुनच एक वाट खाली माचीवर जाते. इथेच वाटेत एक भलेमोठे टाके लागते. याचे नाव आहे ‘समुद्री’ टाके. या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. किल्ल्याच्या दक्षिण भागातले हे अवशेष पाहून झाल्यावर दक्षिणेकडे आपला मोर्चा वळवावा. किल्ल्याच्या मध्ये असलेल्या उंचवट्याला वळसा घलून खाली उतरल्यावर द्क्षिणेकडील उध्वस्त दरवाजाचे अवशेष पाहायला मिळतात. याठिकाणाहून वाट खाली उतरते पण घसार्याची आहे. यावाटेन आपण तलावापाशी येतो. डेरमाळ वरुन पिसोळ किल्ला दिसतो. संपूर्ण गड फिरण्यास २ तास लागतात. किल्ल्यावरील वाटा मोडलेल्या असल्याने किल्ला पाहाण्यासाठी गावातून वाटाड्या घेऊन जावा.
गडावर पोहोचण्याच्या वाटा
१) टिंघरी गावातून: नाशिक - सटाणा - नामपूर हे अंतर ११० किलोमीटर आहे. नामापूर मार्गे टिंघरी हे १२ किलोमीटरचे अंतर आहे. टिंघरी मधून डेरमाळ किल्ला दिसत नाही. टिंघरी गावासमोर एक डोंगर आहे. या डोंगराच्या डाव्या बाजूला असलेल्या खिंडीत जावे लागते. प्रथम टिंघरी गावासमोर असलेला डोंगर चढत डाव्या बाजूची खिंड गाठावी लागते. हे अंतर पार करण्यास पाऊण तास लागतो. हि खिंड पार केल्यावर आपण पठारावर पोहोचतो. याठिकाणाहून आपल्याला डेरमाळ किल्ल्याचे पहिल दर्शन होते. हे पठार पार केल्यावर थोडेसे खाली उतरुन आपण दुसर्या पठारावर पोहोचतो. हे पठार थेट डेरमाळ किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत पोहोचलेले आहे. या पठारा वरुन चालत किल्ल्याच्या जवळ आल्यावर झाडीत एक विरगळ आहे. एका ३ फ़ुट उंच दगडावर गोड्यावर बसलेला योध्दा कोरलेला आहे. गावापासून या वीरगळी पर्यंत पोहोचण्यास दिड तास लागतो. या विरगळीच्या मागे एक सुकलेला तलाव आहे. या विरगळीच्या इथुन किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा फ़ुटतात. सरळ जाणारी वाट ही किल्ल्याची मुख्यवाट आहे. हि वाट आपल्याला किल्ल्याच्या दक्षिण दरवाजात घेऊन जाते. तर उजव्या बाजूने (तलावाच्या बाजूने) जाणारी वाट फ़ारशी मळलेली नाही पण ही वाट आपल्याला थेट उत्तर दरवाजात घेऊन जाते. वीरगळ ते किल्ल्याचा दरवाजा हे अंतर कापण्यास अर्धा तास लागतो. टिंघरी गावातून किल्ल्यावर पोहोचण्यास २ ते २.३० तास लागतात. किल्ला बघायला २ तास आणि परतीच्या प्रवासाला १.३० लागतो. हे सर्व ध्यानात घेतल्यास रात्री किंवा पहाटे टिंघरीला पोहोचुन सकाळी लवकर डेरमाळ पाहून दुपारी जेवणाच्या वेळी टिंघरी गावात पोहोचता येते.
२) बिलपूरी मार्गे: नाशिक - सटाणा - नामपूर मार्गे बिलपूरी गावात पोहचता येते नामपूर पासून बिलपूर हे गाव साधारणपणे १५ किमी वर आहे. गावात सटाण्याहून नामपूर मार्गे मुक्कामाची एसटी सुध्दा येते. जर एसटी नाही मिळाली तर नामपूर साक्री मार्गावर ‘चिराई’ नावाचे गाव आहे, तिथून ८ किमी वर चालत बिलपूरीला जाता येते किंवा नामपूर तळवडे अशा सहा आसनी गाड्या चालू असतात. तळवडे ते बिलपूरी अंतर ३ किमी पायी गाठता येते. बिलपूरी गावातून डेरमाळ दिसतो, पण तिथपर्यंत जाण्यासाठी सरळ वाट नाही. वाट जरा वाकडी करुनच जावे लागते. डेरमाळच्या समोर असणार्या डोंगराची सोंड बिलपूरी मध्ये उतरलेली आहे. ही डोंगरसोंड चढून गेल्यावर आपण पठारावर पोहचतो. आता डेरमाळचा किल्ला आपल्या डाव्या हाताला असतो. किल्ला आणि आपण चालत असणारे पठार यात एक दरी असते. पठारावरुन अर्धा तास चालत गेल्यावर आपण दरी जिथे संपते त्या ठिकाणी इंग्रजी ‘यू’ आकाराचे वळण घ्यायचे आणि समोरच्या पठारावरच्या जंगलात शिरावे. आता डेरमाळचा डोंगर आणि समोरचा डोंगर यांना जोडणारी खिंड आपल्या मागे रहाते. आता डेरमाळची तटबंदी आपल्या डोक्यावर उजवीकडच्या कड्यावर असते. आता वाट चढणीला लागते, वाटेत किल्ल्याच्या तीन पडझड झालेल्या दरवाज्यांचे अवशेष दिसतात. शेवटच्या दरवाज्या जवळून वाट पून्हा ‘यू’ आकाराचे वळण घेऊन डेरमाळच्या माचीवर जाते.
राहाण्याची सोय
डेरमाळ वरील गुहेत ८ लोकांना रहाता येते. डेरमाळ गावातील समाज मंदिरात २५ जण राहू शकतात.
जेवणाची सोय
गडावर जेवणाची सोय नाही.
पाण्याची सोय
डेरमाळवर पिण्यायोग्य पाणी नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ
टिंघरी मार्गे २ तास आणि बिलपूरी मार्गे २ तास लागतात.