लोणावळ्याच्या उत्तर दिशेला दहा मैल अंतरावर राजमाची आहे. त्याभोवती असलेल्या निबिड अरण्यात बहिरी डोंगरावर ढाकचा किल्ला उभा आहे. तो किल्ला म्हणजे दक्षिणोत्तर पसरलेला अजस्त्र डोंगर आहे. तो किल्ला फारसा परिचित नाही. ढाकचा बहिरी याचा अर्थ ढाकचा किल्ला. त्या डोंगरात वसलेला आदिवासींचा देव बहिरी. त्याच्या नावावरून तो किल्ला 'ढाकचा बहिरी' या नावाने ओळखला जाऊ लागला. त्या किल्ल्याला 'गडदचा बहिरी' असेही म्हणतात. गडद या शब्दाचा अर्थ गुहा. त्या किल्ल्यावर कातळाच्या पोटात खोदलेल्या पश्चिमाभिमुख गुहा आढळतात.
Dhak Bahiri Fort, Dhak Bahiri Fort Trek, Dhak Bahiri Fort Trekking, Raigad
राजमाची किल्ल्याच्या मागे ढाक बहिरीचा उंच सुळका दिसतो. तो 'कळकरायचा सुळका' या नावाने ओळखला जातो. ढाक बहिरी किल्ला दोन हजार सातशे फूट उंच आहे. कर्जत डोंगररांगेत येणारा तो किल्ला ट्रेकर्सच्या दृष्टीने कठीण समजला जातो. दुर्गप्रेमी लेखक गो. नी. दांडेकर यांच्यामुळे तो किल्ला प्रकाशात आला. ढाक बहिरी मोक्याच्या ठिकाणी उभा आहे. पूर्वीच्या काळी त्याचा उपयोग टेहळणीसाठी केला जात असावा.
ढाक बहिरीला पोचण्यासाठी पुणे – कामशेत – जांभिवली या मार्गाने जांभिवली गावापर्यंत जाता येते. तेथून पुढे अर्धा ते पाऊण तास चालल्यानंतर कोंडेश्वर मंदिर लागते. तेथून जंगलवाट सुरू होते. त्या वाटेने पुढे गेल्यानंतर एक चिंचोळी खिंड लागते. ती खिंड ढाकचा किल्ला आणि सरळसोट उभा कळकरायचा सुळका यांच्या मधोमध आहे. खिंड आठ ते दहा मीटर लांब आहे. खिंड पार केल्यावर पुढे कातळकडा लागतो. तो चढत असताना दोरखंडाचा वापर करावा. तो कडा पार करणे अवघड आहे. तेथे अनेकांना प्राण गमवावे लागले आहे.
कातळकड्यात खोबण्या आहेत. त्यांच्या आधारे वर दहा मीटर अंतर चढून गेल्यानंतर बहिरीच्या गुहेजवळ पोचता येते. गुहा प्रशस्त आहे. तेथे चार व्यक्तींना झोपण्यापुरती जागा आहे. आत बहिरीचा शेंदूर फासलेला दगड आढळतो. बहिरी म्हणजे ठाकरांचा अनगड देव. तो रागीट असून त्याला त्या गुहेत स्त्री आलेली चालत नाही असे मानले जाते. बहिरी नवसाला पावतो अशी तेथील गावक-यांची श्रद्धा आहे. दगडाशेजारी नवस फेडण्यासाठी वाहिलेले त्रिशूळ दिसतात. गुहेत पाण्याचे दोन टाके आहेत. तेथे गावक-यांनी जेवणासाठी ठेवलेली भांडी आहेत. गिर्यारोहक त्या भांड्यांचा वापर करून ती धुवून जागच्या जागी ठेऊन देतात. गडावर किंवा वाटेमध्ये पाण्याची अथवा जेवणाची सोय नाही. त्यामुळे खाद्यपदार्थ आणि पाण्याचा साठा सोबत घेऊन जावा लागतो.
ढाक बहिरीला नैसर्गिक तटबंदी लाभलेली आहे. गुहेच्या वर दोन-अडीच हजार फूटांची कातळभिंत आहे. गुहेच्या समोर राजमाचीचे श्रीवर्धन आणि मनरंजन हे दोन बालेकिल्ले दिसतात. तेथून नागफणीचे टोक, प्रबळगड, कर्नाळा, माथेरान असा विस्तीर्ण परिसर दिसतो. गडाच्या पश्चिमेला पळसदरी तलाव, पूर्वेला उल्हास नदीचे खोरे आहे.
‘कळकरायचा सुळका’ आणि बहिरीचा डोंगर यामधील खिंडीत चढतांना एक वाट डावीकडे जाते. या वाटेने तीस मिनीटात गड माथ्यावर पोहोचता येते. किल्ल्याचा माथा फार लहान आहे. गड फिरण्यास तीस मिनिटे पुरतात. वाटेने किल्ल्यावर येताना दरवाजा लागतो. दरवाजा ढासळलेल्या अवस्थेत आहे. दरवाज्यातून आत शिरल्यावर समोर भवानी मातेचे मंदिर व एक मोठा वाडा आहे. वाडा ढासळलेल्या अवस्थेत आहे. वाड्याच्या समोर शंकराची पिंड आहे. त्याव्यतिरिक्त किल्ल्यावर पाहण्यासारखे काही नाही. त्या परिसरातील कर्नाळा किल्ला, पक्षी अभयारण्य हे सर्व एका दिवसात पाहून येण्यासारखे आहे.
राहाण्याची सोय
येथील राहण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे बहिरीची गुहा हेच होय.
जेवणाची सोय
जेवणाची सोय आपण स्वत:च करावी.
पाण्याची सोय
गुहेतच पिण्याच्या पाण्याचे एक मोठे टाके आहे. वाटेत कुठेही पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने उन्हाळ्यात पाण्याचा भरपूर साठा असणे आवश्यक आहे.