प्राचीन काळापासून कल्याण हे आंतरराष्ट्रीय बंदर म्हणून प्रसिध्द होते. ह्या शहराला संरक्षणासाठी तटबंदी, ११ बुरुज व अनेक दरवाजे होते. कल्याणच्या ह्या भूइकोटा शेजारी खाडीवर शिवाजी महाराजांनी दुर्गाडी किल्ला बांधला व मराठ्यांच्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवली.

Durgadi Fort, Durgadi Fort Trek, Durgadi Fort Trekking, Thane

इतिहास

२४ ऑक्टोबर १६५४ रोजी शिवाजी महाराजांनी कल्याण व भिवंडी ही ठाणी आदीलशहाकडून जिंकून घेतली. त्यानंतर कल्याणच्या भुईकोटाशेजारी खाडी किनारी शिवाजी महाराजांनी किल्ला बांधायला घेतला. किल्ल्याचा पाया खोदताना अमाप संपत्ती सापडली. ही सर्व दुर्गा देवीची कृपा म्हणून ह्या किल्ल्याचे नाव दुर्गाडी असे ठेवले. किल्ल्याबरोबर शिवरायांनी आरमारी गोदी बांधून लढाऊ जहाजांची निर्मिती सुरु केली. त्यासाठी ३४० पोर्तुगिज कारागीर राबत होते.

इ.स. १६८२ साली मोगल सरदार हसनअली खानने कल्याण जिंकले, पण संभाजीराजांनी हल्ला करुन कल्याण परत ताब्यात घेतले. त्यानंतर १६८९ मध्ये मोगलांनी परत कल्याण जिंकले. इ.स १७२८ मध्ये पोर्तुगिजांनी दुर्गाडी किल्ल्यावर हल्ला केला .पण पेशव्यांचे किल्लेदार शंकरजी केशव व त्याच्या साथीदारांनी यशस्वीपणे परतवून लावला.

गडावरील पहाण्याची ठिकाणे

कल्याणच्या खाडी किनारी लहानशा टेकडीवर दुर्गाडी किल्ला आहे. गडाचे प्रवेशद्वार नष्ट झालेले आहे, पण त्याला लागुन असलेले बुरुज शाबूत आहेत. ह्या प्रवेशद्वाराचे नाव गणेश दरवाजा असून समोरच गणरायाची मूर्ती आहे. किल्ल्यात दुर्गादेवीचे मंदिर आहे. त्याचा जिर्णोध्दार पेशवे काळातील कल्याणचे सुभेदार रामजी महादेव बिवलकर यांनी केला. याखेरीज खाडीच्या बाजूला दोन मोठे भग्न बुरुज व थोडी तटबंदी आहे.

गडावर पोहोचण्याच्या वाटा

कल्याण स्थानकात उतरुन बसने अथवा खाजगी वाहनाने १० ते १५ मिनीटात किल्ल्यात जाता येते.