नाशिक जिल्ह्यातील मालेगाव पासून ३२ किलोमीटर अंतरावर गाळणा गावात गाळणा किल्ला आहे. ८ दरवाजे, अनेक बुरुज, तटबंदी, पाण्याची टाकी आणि अनेक वास्तूंनी हा किल्ला सजलेला आहे. पूरातत्व खात्याने २०१७-१८ मध्ये या किल्ल्याची दुरुस्ती केल्यामुळे हा किल्ला परत जून्या दिमाखात उभा राहिलेला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला नाथपंथियांचा आश्रम यामुळे गाळणा गावाला आध्यात्मिक आणि ऐतिहासिक महत्व प्राप्त झालेले आहे. त्यामुळे याठिकाणी भरपूर वर्दळ असते.

Galna Fort, Galna Fort Trek, Galna Fort Trekking, Nashik

खाजगी वहानाने गाळणा किल्ला आणि कंक्राळा किल्ला एका दिवसात पाहाता येतात. गाळणा किल्ल्या खालील आश्रमात राहाण्याची सोय होते.

इतिहास

गाळणा किल्ल्यावरील गुहा आणि टाक्यांची रचना पाहाता हा किल्ला प्राचीन काळा पासून अस्तित्वात असावा परंतु याचा लिखित इतिहास १३ व्या शतकापासून सापडतो. १३ व्या शतकात गाळणा किल्ल्यावर राठोड वंशीय बागुल यांचे राज्य होते. याच बागुल राहांमुळे या भागाला बागलाण असे नाव मिळाले होते. सोळव्या शतकात (इसवीसन १५१० ते १५२६) गाळाणा किल्ला निजामशाहीच्या ताब्यात होता. इसवीसन १५२६ मध्ये बागलाणचा राजा बहिरजी याने निजामाकडून हा किल्ला जिंकून घेतला. इसवीसन १५५५ मध्ये निजामशहाने गाळणा पुन्हा जिंकून घेतला. पुढे मोगलांनी निजामशाही गिळंकृत केल्यावर गाळणा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. इसवीसन १७५२ मध्ये भालकीचा तह झाला त्यावेळी हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. त्यानंतर हा किल्ला होळकरांच्या ताब्यात होता. इसवीसन १८१८ मध्ये इंग्रजांनी गाळणा किल्ला जिंकून घेतला.

गडावरील पहाण्याची ठिकाणे

गाळणा गावाजवळ जस जसे आपण पोहोचतो तसतशी किल्ल्याची तटबंदी, बुरुज आणि किल्ल्यावरील वास्तू आपले लक्ष वेधून घेतात. किल्ल्याच्या पायथ्याशी आश्रम आहे. या आश्रमापर्यंत गाडीने जाता येते. आश्रमाच्या बाजूने पायर्‍यांचा मार्ग किल्ल्यावर जातो. काही पायर्‍या चढल्यावर डाव्या बाजूला कातळात कोरलेली दोन मोठी टाकी दिसतात. पुढे १० मिनिटातच आपण किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशव्दाराशी पोहोचतो." परकोट " या नावाने हे प्रवेशव्दार ओळखले जाते. प्रवेशव्दाराच्या बाजूला पडक्या तटबंदीचे अवशेष दिसतात. या दरवाजाच्या आतील बाजूस पहारेकर्‍यांच्या देवड्या आहेत. प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर थोड्या पायर्‍या चढून गेल्यावर आपण गडाच्या दुसर्‍या प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. या प्रवेशव्दाराला "लोखंडी दरवाजा" या नावाने ओळखले जाते. या प्रवेशव्दाराच्या उजव्या बाजूला असलेल्या भव्य बुरुजावर दोन शरभ शिल्प आहेत. प्रवेशव्दाराच्या कमानीवर फ़ारशी शिलालेख कोरलेला आहे. कमानीच्या दोन्ही बाजूला कमळ पुष्प कोरलेली आहेत. प्रवेशव्दारातून आत गेल्यावर पहारेकर्‍यांच्या देवड्या आहेत. प्रवेशव्दाराच्या आतील बाजूने कमानीवर जाण्यासाठी जीना आहे. या दरवाजातून थोडे पूढे गेल्यावर दोन वाटा फुटतात, यातील पायर्‍यांची वाट तिसर्‍या दरवाजाकडे जाते, तर डाव्या बाजूची वाट दिंडी दरवाजाकडे जाते. या वाटेवर उजव्या बाजूला तटबंदीत एक शरभ शिल्प बसवलेले आहे. खरतर याठिकाणी हे शिल्प असण्याची कोणतीही शक्यता नाही. किल्ल्याची दुरुस्ती करतांना शरभ शिल्प याठिकाणी लावले गेले असावे. शिल्प पाहून पुढे गेल्यावर डाव्या बाजूला एक बुरुज आहे. बुरुजाच्या भिंतीवर एक मोठा फ़ारसी शिलालेख आहे. पुढे गेल्यावर छोटा दिंडी दरवाजा आहे. येथून एक वाट खाली गावात उतरते, पण ही वाट बरीच गैरसोयीची आहे. परकोटात येण्यासाठी या दरवाजाची निर्मिती करण्यात आली असावी.

दिंडी दरवाजा पाहून आल्या वाटेने परत पायर्‍यांपाशी यावे. थोडे चढून गेल्यावर आपण किल्ल्याच्या तिसर्‍या प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. याला " कोतवाल पीर " या नावाने ओळखतात. तिसर्‍या दरवाज्यातून आत शिरल्यावर पुढची वाट काटकोनात वळते. या ठिकाणी एका बाजूला कातळभिंत तर दुसर्‍या बाजुला किल्ल्याची तटबंदी यामधील चिंचोळ्या भागातून आपण पुढे जातो. थोड्याच अंतरावर किल्ल्याचा चौथा दरवाजा, "लाखा" दरवाजा" लागतो. या प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर तीन वाटा लागतात. समोर जाणारी पायर्‍यांची वाट ही किल्ल्याच्या माथ्यावर जाते. डावीकडे जाणारी वाट किल्ल्याच्या दुसर्‍या बाजूला असलेल्या चार दरवाजापाशी जाते. आपण आधी डावीकडची वाट पकडायची. थोड्याच अंतरावर उजव्या बाजूला कातळात कोरलेले मोठे टाके आहे. पुढे तटबंदीवर जाणार्‍या जीन्याने फ़ांजीवर पोहोचावे. फ़ांजीवरुन चालत असतांना गाळण्याची तटबंदी किती मजबूत आहे, याची कल्पना येते. पुढे गेल्यावर एक भव्य बुरुज आहे. या बुरुजावर मधोमध तोफ़ ठेवण्यासाठी आणि ती फ़िरवण्यासाठी बसवलेला लोखंडाचा मोठा रुळ (रॉड) दिसतो. या ठिकाणी खालच्या बाजूला गाळणा किल्ल्याचा डोंगर आणि बाजूचा डोंगर यामधली खिंड आहे. या खिंडीचे संरक्षण करण्यासाठी हा भव्य बुरुज आणि त्यावर सर्व दिशांना फ़िरवता येणारी तोफ़ बसवलेली होती. आज य ठिकाणी तोफ़ नाही. या बुरुजा वरुन किल्ल्याचा डोंगर आणि बाजूचा डोंगर यातील खिंड दिसते. हि खिंड तटबंदी आणि बुरुजाने संरक्षित केलेली आहे. बुरुजावरून किल्ल्याच्या दिशेला पाहीले असता, समोर वरच्या बाजूला कातळात कोरलेली टाकी पाहायला मिळतात. टाक्यांच्या डाव्या बाजूला एक आणि वरच्या तटबंदीत एक असे दोन दरवाजे दिसतात. हे तिसर्‍या आणि चौथ्या क्रमांकाचे दरवाजे असून पहिल्या आणि दुसर्‍या क्रमांकाचे दरवाजे पाहाण्यासाठी बुरुजावरून खाली उतरुन पुढे जावे लागते. दुसरा दरवाजा उध्वस्त झालेला आहे. या दरवाजाच्या काटकोनात बाहेरच्या तटबंदीत पहिला दरवाजा आहे. या दरवाजातून खिंडीत उतरण्यासाठी वाट होती पण, आता ती मोडली आहे. गाळणा गावाच्या विरुध्द दिशेने किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी या प्रवेशव्दारांची निर्मिती करण्यात आली होती. पहिला दरवाजा पाहून पुढे गेल्यावर एक मोठे पाण्याचे टाके आहे. या टाक्याच्या दोन बाजूने तटबंदी आणि तिसर्‍या बाजूने कातळकडा आहे. तटबंदीत एक मोठी खिडकी आहे. मोक्याच्या जागी टेहळणीसाठी ही खिडकी बनवण्यात आली आहे. हे सर्व पाहून आल्या वाटेने परत चौथ्या दरवाज्यापाशी परतायचे.

आता उजवीकडची वाट धरायची, या ठिकाणी तटबंदीवर एक नक्षीदार कमान आहे. कमान ढासळलेली आहे. पण तिचे सौंदर्य आजही कमी झालेले नाही. तटबंदी वरून थोडे पुढे गेल्यावर आपण सज्जापाशी येऊन पोहचतो. हाच तो सज्जा जो खालून आपले लक्ष वेधून घेत असतो. इथून किल्ल्याचे चारही दरवाजे आणि दूरवरचा प्रदेश व्यवस्थित दिसतो. इथून पुढे गेल्यावर डावीकडच्या कातळात काही गुहा कोरलेल्या दिसतात. ही कोरडी पडलेली पाण्याची टाकी आहेत. यापैकी शेवटच्या गुहेत पिंड, गणपती, हनुमान आणि काही मुर्ती आहेत. गुहेच्या वरच्या बाजूला कातळावर कळसा सारखे कोरीवकाम केलेले आहे. या गुहां समोरील तटबंदीत एक फ़ारसी शिलालेख आणि त्याच्या बाजूला दोन शरभ शिल्प आहेत. या फ़ांजीवरून पुढे चालत गेल्यावर तुटलेला बुरुज आहे. या बुरुजाच्या तळात चोर दरवाजा आहे. बुरुज ढासळल्यामुळे वरूनच चोर दरवाजा पाहावा लागतो. याठिकाणी खालच्या बाजूस एक पाण्याचे टाके दिसते. या टाक्यापासून पुढे गेल्यावर एक वाट कातळातून खाली उतरत जाऊन किल्ल्याच्या दुसर्‍या दरवाजाला येऊन मिळते. पण ही वाट मोडल्यामुळे सध्या जाता येत नाही. या चोर दरवाजा समोर कातळात कोरलेले पण्याचे मोठे टाके आहे. हे सर्व पाहून माघारी फिरुन चौथ्या दरवाज्यापाशी यायचे आणि माथ्याकडची वाट धरायची.

माथ्यावर पोहोचल्यावर समोर एक मशिद दिसते. मशिदीच्या आतील खांबावर कुराणातील आयता कोरलेल्या आहेत. मशिदीवर दोन छोटे मिनार आहेत. मशिदी समोर मोठ्ठे पाण्याचे टाके आहे. या सुकलेल्या टाक्यात उतरण्यासाठी पायर्‍या आहेत. मशिदी समोर वजू करण्यासाठी बांधलेले दोन हौद आहेत. मशिदीच्या बाजूचा जिना चढून गच्चीवर जाता येते. गच्चीवरुन कंक्राळा किल्ला, धुळ्याचा लळींग, भामेर याचे सुंदर दर्शन होते. मशिदीच्या मागच्या बाजूस रंग महाल आहे. या महाला समोर कारंजासाठी बनवलेला नक्षीदार हौद आहे. रंगमहालाच्या भिंतीवर महिरपी असलेले कोनाडे आहेत. या रंगमहालाच्या बाजूला कातळात कोरलेले भव्य टाके आहे. या टाक्याच्या मागे कमानी बांधलेल्या आहेत.

हे सर्व पाहून पुन्हा मशिदीपाशी यावे. मशीदी समोर एक कोठार आहे. त्यात काही कमानी आहेत. त्याच्या माहे एक उध्वस्त वास्तू आहे. पुढे गेल्यावर एका उध्वस्त वाड्याचा चौथरा आहे. या चौथर्‍यावर दोन कमळ शिल्प कोरलेली आहेत. या वाड्याच्या मागच्या बाजूला हमाम्खान्याचे अवशेष आहेत. थोडे पुढे गेल्यावर टोकवर बुरुज आहे. या बुरुजावरुन खालच्या बाजूला तोफ़ फ़िरवण्याचा रॉड असलेला बुरुज आणि समोरचा डोंगर दिसतो. हे पाहून पुन्हा वाड्यापाशी येऊन वाड्याला वळसा घालून किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्याकडे जाणार्‍या पायवाटेने सर्वोच्च माथा गाठायचा. या माथ्यावर काही कबरी आहेत. एक दोन वाड्यांचे अवशेष सुध्दा आहेत. येथून किल्ल्याचा पूर्ण घेरा नजरेस पडतो. संपूर्ण गड फिरण्यास ७ ते ८ तास लागतात. वर उल्लेख केलेले किल्ल्यावरील सर्व भाग पाहण्यासाठी किमान ४ तास लागतात.

गडावर पोहोचण्याच्या वाटा

गाळणा किल्ल्यावर जाण्यासाठी मालेगाव आणि धुळे या दोंन्ही बाजूंनी रस्ते आहेत. आपल्याला मालेगाव - डोंगराळे मार्गे गाळणा गावात पोहचता येते. मालेगावाहून डोंगराळे पर्यंत येण्यास एसटी बसेस आहेत. मालेगाव - डोंगराळे अंतर साधारणत: ३० किमी आहे. धुळ्याहूनही डोंगराळ्याला बसेस आहेत. हे अंतर साधारणपणे ३५ कि.मी आहे. डोंगराळेहून २ किमी अंतरावर असलेल्या गाळणा गावात पोहचता येते. गाळणा हेच किल्ल्याच्या पायथ्याच्या गाव. गाळणा गावात नाथपंथियांचा एक मठ आहे. या मठाच्याच बाजूने किल्ल्यावर जाण्याची वाट आहे.

राहाण्याची सोय

किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या आश्रमात राहण्याची सोय होऊ शकते.

जेवणाची सोय

जेवणाची सोय गाळणा गावात होऊ शकते. किल्ल्यावर राहायचे असल्यास स्वत:चा शिधा असणे उत्तम.

पाण्याची सोय

किल्ल्यावर सध्या तरी पिण्यायोग्य पाणी नाही.

जाण्यासाठी लागणारा वेळ

गाळणा गावातून १० मिनिटे लागतात.