प्राचीनकाळी कल्याण हे महत्वचे बंदर म्हणून प्रसिध्द होते. अरबी समुद्रातून उल्हास खाडी मार्गे कल्याण बंदरात जहाजांची येजा चालत असे. या जलमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी वसईचा किल्ला, धारावी किल्ला, घोडबंदर किल्ला, गायमुख किल्ला, नागलाबंदर किल्ला, दुर्गाडी किल्ला अशी किल्ल्यांची माळच वेगवेगळ्या राज्यकर्त्यांनी बांधली होती.
Ghodbunder Fort, Ghodbunder Fort Trek, Ghodbunder Fort Trekking, Thane
सह्याद्रीची एक सोंड उल्हास खाडीजवळ उतरते, तिचे टोक घोड्यासारखे दिसते. त्यामुळे ह्या बंदराला घोडबंदर असे नाव पडले सह्याद्रीच्या ह्या सोंडेवरच घोडबंदर किल्ला बांधण्यात आला आहे.
इतिहास
इ.स १६७२ मध्ये घोडबंदर किल्ला पोर्तुगिजांच्या ताब्यात होता. शिवाजी महाराजांनी स्वत: ह्या किल्ल्यावर हल्ला केला, पण त्यांना किल्ला जिंकता आला नाही, इ,स १७३७ मध्ये घोडबंदर किल्ला मराठ्यांनी पोर्तुगिजांकडून जिंकून घेतला, त्यावेळी पोर्तुगिजांची २५० माणसे मारल्याची व ७ गलबते ताब्यात घेतल्याची नोंद आहे. वसईच्या मोहीमेचा एक भाग म्हणून नागलाबंदर, घोडबंदर, धारावी किल्ला हे किल्ले जिंकून वसईच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. १८१८ मध्ये हा गड इंग्रजांनी जिंकून घेतला.
गडावरील पहाण्याची ठिकाणे
गडाच्या पायर्या चढून आपण भग्न प्रवेशद्वारातून गडात प्रवेश करतो, समोरच अनेक छोटी दालने असलेली एक कमानींची इमारत दिसते. पुढे गडाच्या सपाटीवर उंच भिंतीचे सभागृह लागते. त्याच्यापुढे थोड्या उंचीवर एक बुरुज दिसतो. बुरुजाला असलेल्या पायर्यांनी वर गेल्यावर कडी, कोयंडे किंवा बिजाग्रींची गरज नसलेला वैशिष्ट्यपूर्ण दरवाजा लागतो. बुरुजाच्या माथ्यापर्यंत असलेल्या खाचांमधून हा दरवाजा वर खाली सरकवून उघड बंद करता येत असे. ह्या बुरुजाच्या माथ्यावरुन उल्हासखाडी व आजूबाजूचा दूरवरचा प्रदेश दृष्टीक्षेपात येतो.
गडावर पोहोचण्याच्या वाटा
ह्या किल्ल्यावर जाण्यासाठी ठाणे बस स्थानकातून बोरीवली, भाइंदर येथे जाणार्या बसने घोडबंदर गावात उतरावे. गावातून टेकडीवर जाणारी पायर्यांची वाट आपल्याला किल्ल्यात घेऊन जाते.
राहाण्याची सोय
किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय
गडावर जेवणाची सोय नाही, आपण स्वत: करावी.
पाण्याची सोय
किल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ
घोडबंदर गावातून पाऊण तास लागतो.