रोहा शहराजवळ, अवचितगड व घोसाळगड हे किल्ले आहेत. घोसाळगड हा किल्ला डोंगरावर वसलेला आहे. शिवपूर्वकाळात अस्तित्वात असलेला हा किल्ला ताम्हण घाटमार्गे होणार्‍या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला असावा. जंजिरा, तळगड, घोसाळगड, ताम्हणघाट, घनगड असा तो व्यापारी मार्ग होता. या मार्गे कोकणातील बंदरावर उतरणारा माल घाटमाथ्यावर नेला जात असे.

Ghosalgad Fort, Ghosalgad Fort Trek, Ghosalgad Fort Trekking, Raigad

छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून घेतल्यावर त्याचे नाव बदलून ‘वीरगड’ असे ठेवले. मिर्झाराजे जयसिंग यांच्याबरोबर केलेल्या तहाप्रमाणे शिवरायांनी जे १२ किल्ले स्वत:कडे ठेवले त्यात ‘ घोसाळगड’ हा किल्ला होता, त्यावरुन या गडाचे तत्कालीन महत्व लक्षात येते.

इतिहास

घोसाळगड हा किल्ला कोणी बांधला हे ज्ञात नाही. १६व्या शतकात हा किल्ला निजामाच्या ताब्यात होता इस १६४८ मध्ये शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी हा किल्ला जिंकून घेतला. ‘‘रघुनाथ बल्लाळ(कोरडे) सबनीस सात पाच हजार मावळे खळक पाइचे घेऊन राजापुरीवर चालिले त्यांनी जाऊन राजापुरी पावेतो तळे, घोसाळे कुल देश मारुन सरद दरियाकिनारा मोकळा केला’’ असा उल्लेख सभासद बखरीत आहे. शिवरायांनी घोसाळगडचे नाव ‘वीरगड’ ठेवले इ.स १६५९ मध्ये सिद्दीने घोसाळगडला वेढा घातला, पण महाराजांनी अफजल खानाचा वध केल्याची बातमी ऐकून सिद्दी वेढा उठवून निघून गेला. त्यानंतर सिद्दी, आंग्रे, मराठे यांच्या ताब्यात हा किल्ला होता. इस १८१८ मध्ये कर्नल प्रॉथरने हा किल्ला जिंकून घेतला.

पहाण्याची ठिकाणे

घोसाळा गावातून गडावर जाताना तटबंदी लागते. तटातून आत गेल्यावर डावीकडे एक पाण्याचे टाकं दिसते. तिथेच खालच्या बाजूस तटातून खाली उतरण्यासाठी ‘‘चोर दरवाजा’’ आहे. तटावरुन किल्ल्यावर प्रवेश करण्यापूर्वी मुख्य दरवाजाचे ढासळलेले चिरे दिसतात. दोन दगडांवर शरभमूर्ती कोरलेल्या दिसतात. वर पोहचल्यावर आपला थेट घोसाळगड माचीवर प्रवेश होतो. उजवीकडे किल्ल्याची माची आहे. माची चांगली तटा बुरुजांनी संरक्षित आहे. काही ठिकाणी तटामधील शौचालये देखील दिसतात. शेवटच्या टोकाला बुरुज आहे, इथून घोसाळगड बालेकिल्ल्याचे भेदक दर्शन होते, माची पाहून पडझड झालेल्या द्वाराच्या अवशेषापाशी परतायचे आणि डावीकडची बालेकिल्ल्याची वाट धरायची.

थोडासा उंचवटा पार केला की आपण बालेकिल्ल्याच्या कड्यापाशी पोहचतो, पण वर जाणारी मुख्य वाट मागच्या बाजूने आहे. तत्पूर्वी डावीकडे काही जमिनीत खोदलेली पाण्याची टाकी दिसतात. त्यातील पाणी पिण्यास योग्य आहे. या बाजूने बालेकिल्ल्याच्या डोंगराला वळसा देखील घेता येतो. उजवीकडच्या वाटेवर देखिल खालच्या बाजूस एक पाण्याचे टाके आहे. आपण मात्र थोडेसे वर जाऊन कडा डाव्या हाताला ठेवून पुढे निघायचे. वाटेत कड्यात खोदलेल्या काही गुहा आढळतात. एके ठिकाणी दरीमध्ये एक खांबटाके खोदलेले आहे. यासाठी थोडे खाली उतरुन जावे लागते. ते पाहून पुन्हा मुख्य वाटेला लागायचे. थोड्याच वेळात आपण बालेकिल्ल्याच्या मागील बाजूस पोहोचतो. इथेच एक तोफ उघड्यावर पडलेली दिसते. या तोफेच्या समोरुन एक वाट बालेकिल्ल्यावर जाते. वाट निसरडी असल्याने जरा जपूनच जावे लागते. बालेकिल्ल्यावरुन संपूर्ण परिसर नजरेस पडतो. बालेकिल्ल्यावर अवशेष नाहीत. बालेकिल्ल्याला घोसाळगड माचीवरुन प्रदक्षिणा देखील मारता येते.

पोहोचण्याच्या वाटा

मुंबईहून रोह्याला जावे. रोहा - भालगाव - मुरुड असा रस्ता आहे. या रस्त्यावर रोह्यापासून १० कि.मीवर घोसाळे हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे.

राहाण्याची सोय

गडावर रहाण्याची सोय नाही.

जेवणाची सोय

गडावर जेवणाची सोय नाही.

पाण्याची सोय

गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.