प्राचिनकाळी वाशिष्ठी नदीतून दाभोळ बंदर (दाल्भेश्वर) पासून चिपळूण पर्यंत व्यापारी गलबतांची ये-जा चालत असे. ह्या व्यापारी मार्गावर नजर ठेवण्यासाठी अंजनवेल गावात वाशिष्ठी नदीच्या (खाडी) किनारी अंजनवेलचा किल्ला (गोपाळगड) बांधण्यात आला. मूळ किल्ल्यात अनेक राज्यकर्त्यांनी भर घालून किल्ला वाढवला, मजबूत केला.

Gopalgad Fort, Gopalgad Fort Trek, Gopalgad Fort Trekking, Ratnagiri

इतिहास

किल्ल्याच्या बांधकामाच्या कालखंडा- विषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही.छत्रपती शिवरायांनी सन १६६० साली आदिलशाहकडून हा किल्ला जिंकून घेतला,त्यानंतर गोपाळगड व गोविंदगड असे त्याचे नामकरण करण्यात आले.छत्रपतींच्या काल- खंडात हा किल्ला जलवाहतुकीचे महत्त्वाचे केंद्र होता.

किल्ल्यावरील तटबंदी आणि बुरुज आजही मजबूत अवस्थेत·उभे आहेत. तटबंदीवरून आजूबाजूच्या समुद्राचे विहंगम दृश्‍य दिसते. किल्ल्यावर धान्यकोठारे, कातळात खोदलेल्या विहिरी आढळतात. तटबंदीवरून वसिष्ठि खाडीचे विहंगम दृश्य दिसते.

सध्या गडावर खाजगी मालकाने आंब्याच्या बागा लावल्या आहेत. किल्ल्याच्या मालकी हक्कावरून न्यायालयात वाद चालू असल्या मुळे किल्ल्याची हेळखांड झाली आहे.यावर इतिहासप्रेमीनी आवाज उठविणे गरजेचे आहे.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

७ एकर क्षेत्रफळ असलेल्या ह्या किल्ल्याची बरीचशी तटबंदी अजून शाबूत आहे. अंजनवेल गावातून किल्ल्याजवळील पठारापर्यंत (सड्या पर्यंत) गाडीने जाता येते. ह्या रस्त्याने आपण किल्ल्याला वळसा घालून पश्चिमेकडच्या तटबंदीतील छोट्या प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. किल्ल्याच्या जमिनीकडील बाजूला खोल खंदक खोदलेला आहे. किल्ल्याच्या तटाला १५ बुरुज आहेत. त्यावर तोफांसाठी जांभ्या दगडाचे गोलाकार भक्कम चौथरे बांधलेले आहेत. (तटावर इ.स १७०७ मध्ये फारसी भाषेत कोरलेला एक शिलालेख होता पण आता तो अत्सित्वात नाही). गडाच्या पूर्वेला एक दरवाजा आहे. गडाचा तट ७ मीटर उंचीचा व २५ मीटर रुंदीचा आहे. हा गड वरचा कोट, बालेकोट व पडकोट ह्यांचा मिळून बनलेला आहे. पडकोटाचा भाग म्हणजे समुद्रकिनार्‍यापर्यंत जाणारी ही दुहेरी तटबंदी, १६९९ मध्ये सिध्दी खैरतखानाने बांधली. तुळाजी आंग्रे ह्यांनी किल्ल्यालगतचा बालेकोट बांधला. परकोटाच्या टोकाला समुद्राकडील बाजूस कमानी आहेत. त्याच्या बाजूस चोर दरवाजा आहे आणि त्याच्या समोरच एक खराब पाण्याचं टाकं आहे. परकोटाला समुद्राच्या बाजूने शिरण्यासाठी दरवाजा आहे. यातून आत शिरल्यावर बालेकोटा पर्यंत तटाबुरूजांचे बांधकाम आज भग्नावस्थेत आहे. या परकोटामध्ये ही चोरदरवाजाच्या जवळ खराब पाण्याचं टाकं आहे. पश्चिमेकडील प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर दोनही बाजूस पहारेकर्‍यांच्या देवड्या आहेत. ह्या व्यतिरीक्त किल्ल्यावर किल्लेदाराच्या वाड्याचे अवशेष, त्याजवळील बांधीव तलाब आणि छोटी-मोठी घरांची जोती असे अवशेष दिसतात. गडाच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडल्यावर कातळात खोदलेली पायर्‍यांची विहीर आहे. या विहीरीचे पाणी पिण्यायोग्य होते. महाराष्ट्र शासनाच्या चुकीमुळे गोपाळगड खाजगी मालमत्ता बनलेला आहे. त्यामुळे गडांचा दरवाजांना कुलुप लावलेली आहेत. पण त्याची पर्वा न करता गड बघावा. या अतिक्रमणाविरूद्ध दूर्गप्रेमींचा कायदेशीर लढा चालू आहे.

जेवणाची सोय

जेवणाची सोय नाही, स्वत: करावी.

पाण्याची सोय

गडावर पाण्याची सोय आहे

कसे जावे

मुंबई ते गुहागर हे अंतर साधारण २७० कि.मी आहे. गुहागरहून १४ कि.मी वर अंजनवेल गावात गोपाळगड उर्फ अंजनवेलचा किल्ला आहे. किल्ल्याजवळील पठारापर्यंत (सड्या पर्यंत) गाडीने जाता येते. गुहागरहून बसने आल्यास अंजनवेल गावातून किल्ल्यावर जाण्यास पाऊण तास लागतो.