नाशिक जिल्ह्यातील मनमाड जवळ अंकाई टंकाई हे दोन प्रसिध्द जोड किल्ले आहेत. त्या किल्ल्यांपासुन ३ किमी अंतरावर आंबेवाडी गावात गोरखनाथाचा डोंगर नावाच एक तिर्थक्षेत्र आहे. गॅझेटर आणि इतर कागदपत्रात याचा किल्ला म्हणुन कुठेही उल्लेख सापडत नसला तरी त्यावर असलेल्या खोदिव गुहा, पाण्याची टाक इत्यादी अवशेष पाहाता हा एकेकाळी टेहळणीचा किल्ला असावा. अंकाई आणि टंकाई वरील ब्राम्हणी लेण्यांचा आणि या किल्ल्याचा निर्मितीचा काळही एकच असण्याची शक्यता आहे. पुढील काळात अंकाई टंकाई किल्ल्याचे महत्व वाढल्यावर या किल्ल्याचा वापर कमी झाला असावा आणि त्याचा त्याचा ताबा नाथसंप्रदायाकडे गेला असण्याची शक्यता आहे. आपण या शक्यतांच्या जंगलात न शिरताही या प्राचीन डोंगर चढाईचा त्यावरील अवशेषांचा आनंद घेउ शकतो.

Gorakhgad-Manmad Fort, Gorakhgad-Manmad Fort Trek, Gorakhgad-Manmad Fort Trekking, Nashik

अंकाई टंकाई हे दोन किल्ले नीट पाहाण्यास पाच ते सहा तास लागतात. जर आदल्या दिवशी मुंबई किंवा पुण्याहुन निघुन पहाटे मनमाडला पोहोचल्यास दुपार पर्यंत अंकाई आणि टंकाई किल्ले पाहुन होतात. त्यानंतर त्याच्या पासुन ६ किमीवर असलेला गोरखगड पाहुन पायथ्याच्या मंदिरात मुक्काम करता येतो किंवा ७ किमीवरील कात्रा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या कातरवाडीतील हनुमान मंदिरात मुक्कामाला जाता येते. दुसर्‍या दिवशी कात्रा किल्ला पाहाता येतो. काटेकोरपणे कार्यक्रम आखल्यास ४ किल्ले दोन दिवसात पाहुन होतात. अर्थात त्यासाठी बरोबर खाजगी वाहान असणे आवश्यक आहे. कारण या आतल्या भागात एसटी आणि रिक्षांची सोय नाही. अंकाई,टंकाई,कात्रा या किल्ल्यांची माहिती साईटवर लिहिलेली आहे.

गडावरील पहाण्याची ठिकाणे

किल्ल्याच्या पायथ्याशी एक मोठा वट वृक्ष आहे. त्याखाली नाथपंथीयांच्या काही समाध्या आहेत. इथुनच गडावर जाण्यासाठी पायर्‍या आहेत. पायर्‍या चढताना उजव्या बाजूला दोन नक्षीदार समाध्या आहेत. किल्ल्याच्या पाव उंचीवर गेल्यावर पायर्‍या संपतात. त्यानंतर ओबडधोबड पायवाटेने अर्धातास चढल्यावर आपण किल्ल्याच्या पहिल्या टप्प्यावर पोहोचतो. इथे उजव्या बाजुला जाणारी पायवाट गोरखनाथांच्या गुहेपाशी जाते. ही गुहा खोलवर कोरलेली असुन त्यात नाथपंथीय साधुंच्या मुर्ती आहेत. ही गुहा पाहुन परत पायवाटेवर येउन कातळात कोरलेल्या पायर्‍यांवरुन पाच मिनिटे चढुन गेल्यावर आपण डोंगराच्या कातळकड्या खाली असलेल्या गुहांपाशी पोहोचतो. इथे एक मोठी गुहा कोरलेली आहे. गुहेच्या उजव्या बाजूला कानिफनाथांची गुहा आहे. ती पाहुन पायर्‍यांपाशी येउन डाव्या बाजुला चालायला सुरुवात केल्यावर पाण्याच टाक पाहायला मिळत. पण त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. पुढे एक मोठी गुहा आहे. त्याच्या पुढे डोंगराच्या पश्चिम टोकावर असणार्‍या नेढ्या पर्य़ण्त जाण्यासाठी कातळकडा उजव्या बाजुला आणि दरी डाव्या बाजुला ठेवत १० मिनिटे चालल्यावर आपण कातळकड्याच्या टोकाला येतो. इथुन १०-१२ फुटाचा कातळटप्पा चढल्यावर आपण किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर जाता येते. इथे कुठलेही अवशेष नाहीत. इथे एक भगवा झेंडा लावलेला आहे. तो दर गुरुपौर्णिमेला बदलला जातो. किल्ल्याच्या माथ्यावरुन अंकाई - टंकाई ,कात्रा आणि मेसणा हे किल्ले दिसतात.कातळ टप्प्यावरुन उतरल्यावर समोरच्या पठारावर दिसणार्‍या नेढ्या पर्यंत चालत जाण्यास १५ मिनिटे लागतात. नेढ जवळुन पाहुन आल्या मार्गाने परत येउन किल्ला उतरावा.

किल्ल्याच्या गुहे पुढचा मार्ग मळलेला नाही आहे. त्यामुळे तो चिंचोळा टप्पा फार जपून पार करावा लागतो. किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर जाण्यासाठी असलेला कातळटप्पा चढण्यासाठी रोप आणि गिर्यारोहणासाठी वापरले जाणारे साहित्य असणे सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक आहे.

गडावर पोहोचण्याच्या वाटा

मनमाड जंक्शन रस्त्याने आणि रेल्वेने सर्व शहरांशी जोडलेल आहे. मनमाड -औरंगाबाद रस्त्यावर मनमाड पासुन १० किमीवर अंकाई गाव आहे. अंकाई गावाच्या अलिकडे एक किमीवर अंकाई किल्ला या रेल्वे स्टेशनला जाणारा फ़ाटा आहे. त्या फ़ाट्या समोरच विसापूर गावात जाणारा फ़ाटा आहे. या विसापूरच्या फ़ाट्यावर "श्री क्षेत्र गोरखनाथ (विसापूर गाव) अशी कमान लावलेली आहे. कमानी खालून जाणार्‍या रस्त्याने जातांना उजव्या बाजूला आपल्याला गोरखनाथाचा डोंगर दिसतो. फ़ाट्यापासून एक किमी अंतरावर उजवीकडे एक कच्चा रस्ता डोंगरा खालील मोठ्या वडाच्या झाडापर्यंत जातो. येथुनच गडावर जाणार्‍या पायर्‍या आहेत. (गडाच्या पायथ्याचे गाव आंबेवाडी आहे.) किल्ल्याच्या पायथ्या पर्यंत खाजगी वाहानाने जाता येते. मनमाडहुन येवला, औरंगाबाद दिशेकडे जाणार्‍या एसटीने विसापूर गावाच्या फाट्यावर उतरुन १.५ किमी चालत किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जाता येते.

अंकाई किल्ला हे रेल्वे स्टेशन आहे. पण इथे केवळ पॅसेंजर थांबतात. हे स्टेशन किल्ल्यापासुन २ किमीवर असल्याने गैरसोईच आहे.

राहाण्याची सोय

किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही.

जेवणाची सोय

मनमाड औरंगाबाद हायवे वर जेवणाची सोय होते.

पाण्याची सोय

किल्ल्यावर पाण्याची सोय नाही.

जाण्यासाठी लागणारा वेळ

किल्ला चढायला पाउण तास लागतो. आणि पूर्ण बघायला १ तास लागतो.