सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात हनुमंतगड हा किल्ला येतो. बांद्यापासून किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या फुकेरी गावापर्यंत जाणारा रस्ता दाट जंगलातून जातो. पायथ्याचे फुकेरी गाव चारही बाजूने डोंगराने वेढलेले आहे. गावापासून किल्ल्याची उंची अंदाजे १५० मीटर आहे. हनुमंतगड ते पारगड असा १ दिवसाचा ट्रेक करता येतो.

Hanumantgad Fort, Hanumantgad Fort Trek, Hanumantgad Fort Trekking, Sindhudurg

इतिहास

सावंतवाडीच्या फोंड सावंतांनी हनुमंतगडाची निर्मिती करवीरकर व पोर्तूगिजांपासून आपल्या संस्थानाचे रक्षण करण्यासाठी केली. इ.स १८३८ मध्ये ब्रिटीशांनी सावंतवाडी संस्थानाचा ताबा घेतल्यावर आत्मो चौकेकर यांनी आपल्या साथिदारांबरोबर बंड करुन हनुमंतगड ताब्यात घेतला. परंतु फितुरीमुळे हे बंड फसले.

गडावरील पहाण्याची ठिकाणे

फुकेरी गावातून एक कच्चा रस्ता उत्तरेकडील डोंगरावर जातो. थोड्याच अंतरावर रस्ता संपून पायवाट सुरु होते व ती हनुमंतगड डावीकडे ठेवत डोंगराला वळसा घालून पठारावर येते. इथून डाव्या हाताला वर हनुमंतगडाचे उध्वस्त प्रवेशद्वार दिसते; पण तेथपर्यंत पोहोचण्यासाठी खडा चढ चढावा लागतो. चढ चढून आल्यावर एक भगवा झेंडा रोवलेला दिसतो. समोरच तटबंदीचे अवशेष दिसतात. त्याच्या बाजूने गेल्यावर आपण दक्षिणमुखी उध्वस्त प्रवेशद्वारातून गडावर प्रवेश करतो. गडावर मोठे पठार असून मधल्या उंचवट्याभोवती तटबंदी बांधून पूर्वी बालेकिल्ला बनविलेला असावा. आता मात्र बालेकिल्ल्याच्या भिंतींची केवळ कल्पनाच करता येते. गडाच्या पठारावर आल्यावर उजव्या बाजूने गडाच्या कडेकडेने गडफेरी मारण्यास सुरुवात केल्यावर मध्ये मध्ये तटबंदीचे अवशेष दिसतात. उत्तरेकडे तटबंदीजवळ एक सुकलेला पाण्याचा बांधीव तलाव आहे. तलावावरुन पुढे पूर्वेकडे गेल्यावर उध्वस्त प्रवेशद्वार लागते. त्याची रचना पाहाता, हाच गडाचा मुख्य दरवाजा असावा याची खात्री पटते. तेथून पुढे चालत पुन्हा दक्षिणमुखी प्रवेशद्वारापाशी आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. याशिवाय फुकेरी गावात २ तोफा उलट्या पुरलेल्या पाहायला मिळतात, त्यावर त्या बनविल्याचे वर्ष (१७८३) कोरलेले आहे.

गडावर पोहोचण्याच्या वाटा

मुंबई - गोवा महामार्गावरील बांदा गावातून एक रस्ता दोडामार्ग गावाकडे जातो. या रस्त्यावर बांद्यापासून ७ किमी अंतरावर, डावीकडे तळकट गावाला जाणारा फाटा लागतो. या फाट्यावरुन तळकट गाव ६ किमीवर आहे. तळकट गावातील पैनगंगा बँकेजवळून दोन फाटे फुटतात. त्यापैकी डाव्या बाजूच्या रस्त्याने ३ किमीवर झोंळाबे गाव आहे. झोळांबे गावानंतर परत दोन रस्ते फुटतात. त्यातील उजव्या हाताचा रस्ता ३ किमी वरील फुकेरी गावात जातो. फुकेरी गावातून एक कच्चा रस्ता उत्तरेकडील डोंगरावर जातो. थोड्याच अंतरावर रस्ता संपून पायवाट सुरु होते व ती हनुमंतगड डावीकडे ठेवत डोंगराला वळसा घालून पठारावर येते. इथून डाव्या हाताला वर हनुमंतगडाचे उध्वस्त प्रवेशद्वार दिसते; पण तेथपर्यंत पोहोचण्यासाठी खडा चढ चढावा लागतो. चढ चढून आल्यावर एक भगवा झेंडा रोवलेला दिसतो. समोरच तटबंदीचे अवशेष दिसतात. त्याच्या बाजूने गेल्यावर आपण दक्षिणमुखी उध्वस्त प्रवेशद्वारातून गडावर प्रवेश करतो.

राहाण्याची सोय

फुकेरी गावातील शाळा, ग्रामपंचायत व देवळात राहण्याची सोय होऊ शकते.

जेवणाची सोय

गावात एकच हॉटेल आहे. तिथे आधी ऑर्डर दिल्यास जेवणाची सोय होऊ शकते.

पाण्याची सोय

गडावर पाणी नाही. गावातूनच पाण्याची सोय करावी.

जाण्यासाठी लागणारा वेळ

गडावर जाण्यासाठी फुकेरी गावातून ३० मिनिटे लागतात.

सूचना: किल्ला पाहाण्यासाठी गावात वाटाड्या मिळू शकतो.