रवळ्या जवळ्या हे दोन जुळे किल्ले सातमाळ रांगेत आहेत. एका मोठ्या पठारावर असलेल्या या दोन डोंगरांना रवळ्या आणि जवळ्या ही नावे देण्यात आली.हे दोन्हीही किल्ले असून यातील रवळ्या किल्ला चढण्यास कठीण आहे. तो प्रथम पाहून नंतर जवळ्या किल्ला पाहावा. मुंबई - नाशिकहुन एका दिवसाच्या मुक्कामात हे दोन्ही किल्ले पाहून होतात.
Hargad Fort, Hargad Fort Trek, Hargad Fort Trekking, Nashik
इतिहास
ऐतिहासिक कागद पत्रात रावळ्या जाबळ्याचा उल्लेख "रोला-जोला" म्हणुन येतो.१६३६ मध्ये हा किल्ला अलवर्दीखानाने बादशहा शहाजहानसाठी जिंकून घेतला.१६७० मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला. १६७१ मध्ये दिलेरखानाने या किल्ल्यांना वेढा घातला होता. तो मराठ्यांनी उधळून लावला. त्यानंतर महाबत खानाने हा किल्ला जिंकून घेतला. पेशवे काळात हा किल्ला पुन्हा स्वराज्यात आला.इसवी सन १८१८ मध्ये हा किल्ला ब्रिटीशांच्या ताब्यात गेला. कॅप्टन ब्रिग्जने १८१९ मध्ये रवळ्या किल्ल्याच्या पायर्या आणि तटबंदी तोफ़ा लावून उध्वस्त केल्या.
पहाण्याची ठिकाणे
जवळ्यावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत. एक वाट, वस्तीपासून समोर सरळ चालत गेल्यावर एक डोंगरसोंड लागते. या डोंगरसोंडेवर चढून गेल्यावर एका ठिकाणी वाट डावीकडे वळते. वाट मळलेली असल्याने चुकायचा संभव नाही. वाटेत जातांना उजवीकडच्या कड्यामध्ये कोरलेल्या काही गुहा आहेत. या गुहा म्हणजे कधीतरी अपूर्ण सोडून दिलेल्या लेण्यांचा भाग आहे. वाटेने तसेच पुढे जायचे, एका डोंगरसोंडेवर येऊन वाट वर चढते. इथेच खालून डोंगरसोंडेवर चढत येणारी दुसरी वाट येऊन मिळते. इथून पुढे जाणारा रस्ता म्हणजे कड्यात कोरलेल्या पायर्या आहेत. पायर्या जरा जपूनच चढाव्या लागतात. थोडे चढून गेल्यावर कातळात कोरलेला किल्ल्याचा दरवाजा लागतो. त्याच्या उजव्या भिंतीवर शिलालेख कोरलेला आहे. पायर्या चढून गेल्यावर आपण दरवाजाच्या दुसर्या टोकाशी पोहोचतो. दरवाज्यातून वर आल्यावर एक वाट वर जाते. दुसरी वाट डावीकडे वळते. इथे कातळात कोरलेल्या गुहा आहेत.
या गुहेत एक पाण्याचे टाके आहे. हे पाहून परत माथ्यावर जायचे. वर चढून गेल्यावर एक वाट समोर टेकाडावर जाते. ही वाट किल्ल्याच्या दुसर्या टोकाशी जाते. या टोकावरुन डावीकडे खाली गेले की कड्यात खोदलेली खांब टाकी आहेत. त्याच्या समोरच पाण्याची दोन कातळात खोदलेली टाकी सुध्दा आहेत. या पैकी कोणत्याही टाक्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. या शिवाय किल्ल्यावर घोड्याच्या पागा आहेत. किल्ल्यावरुन घोडप, इखारा, कण्हेरगड, कंचना इंद्राई किल्ले दिसतात. जवळ्या पाहून पून्हा पठारावर परतायचे. दोन्ही किल्ले पाहून पठारावर यायला ६ ते ७ तास लागतात. या पठारावर जी वस्ती आहे तिचे नाव ‘तिवारी’ वस्ती. तिवारी नामक व्यक्तीने इथे ३ ते ४ घरे बांधली आहेत. सध्या त्यांचा उपयोग गोठा म्हणून होतो. वस्तीच्या समोरच पठारावर एक पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. त्याच्याच पुढे समाधी आहेत. या पठारावरचा मुक्काम म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव ठरतो.
पोहोचण्याच्या वाटा
नाशिक वरुन वणी ४० किमी अंतरावर आहे. वणीहून एक रस्ता बाबापूर - मुळाणे मार्गे कळवणला जातो. या रस्त्यावर बाबापूर सोडले की ३ किमी अंतरावर एक खिंड लागते. या खिंडीत उतरायंच. येथून उजवीकडे जाणारा रस्ता रवळ्या - जवळ्याला घेऊन जातो. तर डावीकडचा रस्ता मार्कंड्यावर जातो. वणीहून खिंडीत एसटीने येण्यास अर्धा तास लागतो. खिंडीत उतरल्यावर उजवीकडच्या डोंगरसोंडेवरची वाट धरायची. वाट चांगली मळलेली असल्याने चुकण्याचा फारसा संभव नाही. अर्धातास चढून गेल्यावर वाट डावीकडे वळते आणि परत उजवीकडे वळून पठारावर जाते. खिंडीपासून पठारावर पोहोचण्यास १ तास लागतो. पठारावर पो्होचल्यावर समोरच रवळ्या किल्ला दिसतो. पण आपल्याला प्रथम रवळ्या आणि जवळ्याच्या खिंडी मध्ये जायचे आहे. पठारावरुन जवळ्याच्या पायथ्याला जाण्यास पाऊण तास लागतो. वाट थोडी पठारावरुन मग जंगलातून अशी जाते. पठारावर अनेक वाटा असल्यामुळे वाटा चुकण्याचा संभव आहे. लक्षात ठेवण्याची खूण म्हणजे रवळ्याचा डोंगर नेहमी आपल्या डाव्या हाताला असतो. मध्ये जंगल लागते ते पार केल्यावर आपण वस्ती पाशी येऊन पोहोचतो. पठारावर खिंडीमध्येच ही वस्ती आहे.
राहाण्याची सोय
पठारावरील वस्तीमधील घरात ४ ते ५ लोकांना रहाता येते किंवा उघड्यावर सुध्दा मुक्काम करता येतो.