अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात जामगावचा भुईकोट किल्ला आहे. या किल्ल्यात असलेल्या महादजी शिंदे यांच्या वाड्यात सध्या रयत शिक्षण संस्थेचे डी.एड कॉलेज भरते त्यामुळे किल्लाही त्यांच्याच ताब्यात आहे. किल्ल्याला एकूण चार दरवाजे असून त्यापैकी एकच चालू ठेवलेला असून बाकीचे दरवाजे बंद केलेले आहेत. किल्ल्यातील वाड्यात कॉलेज असल्याने सुट्टीच्या दिवशी गेल्यास वाडा पाहाता येतो.
Jamgaon Fort, Jamgaon Fort Trek, Jamgaon Fort Trekking, Ahamadnagar
खाजगी वहानाने एका दिवसात जामगावचा किल्ला तेथुन १२ किलोमीटरवर असलेले पारनेर येथील सिध्देश्वर मंदिर आणि तेथील निसर्गरम्य परिसर पाहाता येतो. त्याच बरोबर ३२ किलोमीटर वरील टाळकी ढोकेश्वरची हिंदु (ब्राम्हणी) लेणी आणि तेथुन २५ किमीवर असलेला पळशीचा भुईकोट किल्ला आणि विठ्ठल मंदिर पाहाता येते.
गडावरील पहाण्याची ठिकाणे
जामगावच्या भुईकोटाला एका टेकडीची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे जामगावच्या किल्ल्याची तटबंदी टेकडीच्या दोन बाजूंना भिडवलेली आहे. पण टेकडीच्या संरक्षणाची काही व्यवस्था केलेली आढळत नाही. ८६ एकरावर पसरलेल्या या किल्ल्याच्या तटबंदीत २० बुरुज आणि ४ दरवाजे आहेत. त्यातील ३ दरवाजे बंद केलेले असून एकाच दरवाजातून किल्ल्यात जाता येते. बाकीचे दरवाजे बंद करण्यात आलेले आहेत. जामगाव पारनेर रस्त्यावर मळगंगा मंदिराच्या समोर किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे. सध्या हा दरवाजा बंद केलेला आहे पण त्याच्या बाजूचे दोन भक्कम बुरुज आणि तटबंदी आजही सुस्थितीत आहे. हा दरवाजा पाहून रस्त्याने पुढे गेल्यावर किल्ल्याचा पुर्वाभिमुख दरवाजा दिसतो. या दरवाजाच्या समोरच्या बाजूला रस्त्याच्या पलिकडे हनुमानाचे मंदिर आहे. हनुमानाचे दर्शन घेऊन किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोर दुहेरी तटबंदी दिसते या तटबंदीत महादजी शिंदे यांचा वाडा आहे. या वाड्याकडे न जाता प्रथम डाव्या बाजूला दिसत असलेल्या मंदिराकडे जावे. पेशवेकालिन मंदिर शैलीतले रामाचे मंदिर आणि त्याच्या समोर असलेले हनुमानाचे मंदिर येथे पाहायला मिळते. मंदिरात राम, लक्ष्मण, सीता यांच्या मुर्ती आहेत. मंदिरात गावकर्यांचा वावर नसल्याने मंदिर अस्वच्छ झालेले आहे. रामाचे मंदिर पाहून समोर दिसणार्या दुसर्या मंदिराकडे जावे. हे विठ्ठल रखुमाईचे मंदिर असून त्याचीही निगा राखली जात नाही. या मंदिराच्या मागच्या बाजूला काही अंतरावर किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे (जो बंद केलेला आहे.) . दोन्ही मंदिरे पाहून आल्या वाटेने परत वाड्या कडे जाणार्या रस्त्यावर यावे या रस्त्याने वाड्याकडे जातांना दोन्ही बाजूला अनेक वास्तूंचे चौथरे दिसतात. कारण पूर्वीच्या काळी या किल्ल्यातच जामगाव वसलेले होते. नंतरच्या काळात ते किल्ल्या बाहेर वसवण्यात आले.
वाड्याकडे जातांना उजव्या बाजूला ३ कमानी असलेली मशिदीची इमारत दिसते. तर डाव्या बाजूला एक वीटांनी बांधलेली पडकी इमारत पाहायला मिळते. पुढे गेल्यावर दोन्ही बाजूला मजबूत तटबंदी पाहायला मिळते. वाड्याचे संरक्षण करण्यासाठी त्याला पुढील बाजूने दुहेरी तटबंदी बांधलेली पाहायला मिळते. हि तटबंदी ओलांडल्यावर वाड्याच्या भोवतीची तटबंदी आणि त्यात असलेला छोटा दरवाजा दिसतो. या तटबंदीला एकूण सहा बुरुज आहेत. दरवाजातून आत गेल्यावर डाव्या बाजूला घोड्यांच्या पागा दिसतात. समोरच्या बाजूला आठ पायर्या आहेत त्या चढून गेल्यावर आपण वाड्या समोर येतो. वाड्या समोरच उजव्या बाजूला प्रशस्त विहिर आहे. वाडा दुमजली आहे. वाड्यात अनेक वर्षे रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यात असल्याने त्यात काही बदल केलेले आहेत. वाडा पूर्ण फ़िरुन पाहाता येतो. वाड्यात फ़ारसे कोरीवकाम किंवा नक्षीकाम केलेले नाही. वाड्याच्या गच्ची वरून किल्ल्याचा संपूर्ण परिसर दिसतो. वाड्याच्या भिंतीतही जंग्या आहेत. वाडा पाहून विहिरी जवळ वाड्याच्या तटबंदीत असलेल्या दुसर्या दरवाजाने बाहेर पडावे. तेथून वळसा घालून मुख्य प्रवेशव्दारापाशी आल्यावर आपली गडफ़ेरी पूर्ण होते. किल्ला पाहाण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागतो.
गडावर पोहोचण्याच्या वाटा
कल्याण नगर रस्त्यावर टाकळी ढोकेश्वर गावातून एक रस्ता (अंतर ३३ किमी) पारनेरला जातो. पारनेरहून १२ किलोमीटरवर जामगावचा किल्ला आहे. कल्याण ते जामगावचा किल्ला हे अंतर २०३ किमी आहे. जामगावचा किल्ला पारनेर जामगाव रस्त्याला लागून आहे.
राहाण्याची सोय
किल्ल्यात राहाण्याची व्यवस्था नाही.
जेवणाची सोय
पारनेरला जेवणाची व्यवस्था होते.
पाण्याची सोय
किल्ल्यात पाण्याची व्यवस्था नाही.