पाचनई या हरीशचंद्रगडाच्या पायथ्याच्या गावातून गडावर जाण्यासाठी सर्वात सोपा मार्ग आहे. याच पाचनई गावातून समोर एक सुटा डोंगर दिसतो. तोच कलाडगड.हा किल्ला एका बाजुला असल्यामुळे आणि त्यावर जाण्याच्या मार्ग कठीण असल्यामुळे फारसे ट्रेकर्स या किल्ल्याला भेट देत नाहीत. परंतू एकदा वाट वाकडी करुन पाहावा असा हा किल्ला आहे.

Kaladgad Fort, Kaladgad Fort Trek, Kaladgad Fort Trekking, Ahamadnagar

सुचना
किल्ल्यावर जाताना सुरक्षिततेच्या दृष्टीने ४० फुटी रोप बरोबर बाळगावा. किल्ल्याच्या ज्या धारेवरुन आपण चढाई करतो ती पूर्वेला असल्याने सकाळी लवकर चढाई करावी. त्यावेळी दगड तापलेला नसेल आणि चढता उतरताना त्याचा त्रास होणार नाही. पावसाळ्यात किल्ल्यावर जाणे टाळावे.

गडावरील पहाण्याची ठिकाणे

कलाडगड किल्ल्याच्या पायथ्याचे गाव पेठेवाडी, हे गाव पाचनई पासुन ७ किमीवर आहे. पण किल्ल्यावर जाणारी वाट पाचनई पासुन ५ किमीवर आहे. वनखात्याने इथे सिमेंटचा निवारा बांधल्याने ही जागा शोधणे सोपे झालेले आहे.

पाचनईहुन खाजगी वाहानाने किंवा चालत या निवार्‍यापर्यंत येउन उत्तर - दक्षिण पसरलेल्या कलाडगडाच्या धारेवरुन चढायला सुरुवात करावी. साधारण १० मिनिटे दाट झाडीतून चालल्यावर आपण उघड्या जागी येतो. येथे काही दगडाना शेंदुर फासुन ठेवलेला आहे. त्यामधुनच कातळात कोरलेल्या पायर्‍या आहेत. येथुन साधारण अर्ध्या तासाचा खडा चढ चढल्यावर आपण कातळात खोदलेल्या खोबण्यांच्या टप्प्यापाशी येतो. या जेमतेम पाय मावतील अशा खोबण्या कातळात तिरक्या कोरलेल्या आहेत. या खोबण्यात पाय रोवुन आणि हाताची मजबुत पकड घेउन सावधगिरीने हा टप्पा पार केल्यावर आपण भैरोबाच्या गुहेपाशी येतो. जमिनीच्या पातळीच्या खाली कातळात खोदलेल्या गुहेत भैरोबाचा शेंदुर फासलेला दगड आहे. बाहेरच्या मोकळ्या भागात 2 झिजलेली सर्प शिल्प ठेवलेली आहेत. भैरोबाचे दर्शन घेउन किल्ल्याच्या मधला डोंगर उजव्या बाजूला आणि दरी डाव्या बाजुला ठेवत अरुंद पायवाटेवरुन दक्षिणेकडे चालत जावे. साधारणपणे ५ मिनिटात आपण कातळात खोदलेल्या दोन टाक्यांपाशी पोहोचतो. टाक्यांमधे दगड कोसळुन टाकी बुजलेली आहेत. टाकी पाहुन दक्षिण टोकाकडे चालत गेल्यावर उजव्या बाजुला दोन मोठे गोल दगड आणि एक देवळी आहे. याला वेताळाचा चाळा म्हणतात. हे ठिकाण पाहुन आल्या वाटेने टाक्यापर्यंत यावे. येथुन एक वाट गडाच्या सर्वोच्च माथ्यावर जाते. ५ मिनिटात आपण माथ्यावर पोहोचतो. दक्षिणेकडे अरुंद असलेला गड माथा उत्तरेकडे रुंद आहे. याच भागात काही घरांची जोती आहेत.

गडमाथा फिरुन आल्या मार्गाने टाक्यां जवळ उतरावे आणि तेथुन भैरोबाच्या गुहेपर्यंत यावे. भैरोबाच्या गुहे नंतरचा कातळात कोरलेल्या तिरक्या पायर्‍यांचा टप्पा अतिशय सावधगिरीने उतरुन गेल्यावर किल्ल्याची फेरी पूर्ण होते.किल्ल्यावरुन पूर्वेला हरीश्चंद्रगड दिसतो.किल्ला पाहाण्यासाठी १ तास लागतो.

गडावर पोहोचण्याच्या वाटा

मुंबईहुन दोन मार्गाने गडाच्या पायथ्याच्या गावी जाता येते.
१) मुंबई - कल्याण - मुरबाड - माळशेज घाट मार्गे ओतुर गाठावे (अंतर १५९ किमी). ओतुर एसटी स्टॅंडच्या बाजूने एक रस्ता बामणवाडा - कोतुळ (अंतर ३० किमी) - विहिर ( कुंजरगडाच्या पायथ्याचे गाव) मार्गे कोळथे (कोळथेच्या भैरवगडाच्या पायथ्याचे गाव अंतर २५ किमी) कोथळेच्या पुढे ५ किमीवर पाचनई गावात जाणारा फ़ाटा आहे. फ़ाट्यापासून पाचनई ७ किमी वर आहे.कलाडगड किल्ल्याच्या पायथ्याचे गाव पेठेवाडी, हे गाव पाचनई पासुन ७ किमीवर आहे. पण किल्ल्यावर जाणारी वाट पाचनई पासुन ५ किमीवर आहे. वनखात्याने इथे सिमेंटचा निवारा बांधल्याने ही जागा शोधणे सोपे झालेले आहे.

२) मुंबई - इगतपुरी - घोटी - भंडारदरा - मार्गे राजुर ( अंतर १५५ किमी ) गाठावे. राजुरहुन कोतुळला जाणार्‍या रस्त्यावर राजुरपासुन - माणिक ओझर -खडकी - वाघदरी यामार्गे पाचनई २७ किमीवर आहे. कलाडगड किल्ल्याच्या पायथ्याचे गाव पेठेवाडी, हे गाव पाचनई पासुन ७ किमीवर आहे. पण किल्ल्यावर जाणारी वाट पाचनई पासुन ५ किमीवर आहे. वनखात्याने इथे सिमेंटचा निवारा बांधल्याने ही जागा शोधणे सोपे झालेले आहे.

राहाण्याची सोय

पाचनई गावात राहाण्याची व्यवस्था आहे.

जेवणाची सोय

आपण स्वत: करावी. किंवा १० किमी वरील पाचनई गावात जेवणाची सोय होते.

पाण्याची सोय

किल्ल्यावर पाणी नाही.

जाण्यासाठी लागणारा वेळ

पायथ्यापासुन किल्ला चढायला एक तास लागतो.