ठाणे जिल्ह्यातील उंचीत दुसर्‍या क्रमांकावर असलेला हा किल्ला आपल्या अंगाखांद्यावर प्राचिनत्वाच्या खुणा बाळगत अजूनही उभा आहे. २ ते २.३० तासांचा खडा चढ, दाट जंगल, कड्यात खोदलेल्या पायर्‍या या ट्रेकर्सना आकर्षित करणार्‍या सर्व गोष्टी असूनही फार कमी लोक या किल्ल्यावर जातात.प्राचिनकाळी उल्हासनदीतून चालणार्‍या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी या गडाची निर्मिती करण्यात आली होती. वसईच्या लढ्याच्यावेळी या किल्ल्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. ट्रेक क्षितीज संस्थेने २०१० साली किल्ल्याचा मार्ग दाखवणारे बाण ठिकठिकाणी काढल्यामुळे किल्ल्याची वाट शोधणे सोपे झाले आहे.

Kamandurg Fort, Kamandurg Fort Trek, Kamandurg Fort Trekking, Thane

इतिहास

११व्या शतकात लिहील्या गेलेल्या महिकावतीच्या बखरीत या किल्ल्याचा उल्लेख ‘कामवनदुर्ग’ या नावाने केलेला आढळतो. प्राचिनकाळी व्यापारी जहाजे उल्हासनदी मार्गे कल्याण बंदरात जात या जलमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी कामणदूर्गाची उभारणी करण्यात आली होती. सन १६८३ मध्ये संभाजी महाराजांनी हा गड पोर्तुगिजांकडून जिंकून घेतला. १२ सप्टेंबर १६८५ रोजी कामणदूर्ग पोर्तुगिजांनी मराठ्यांकडून हस्तगत केला. पण पाणी नसल्यामुळे पोर्तुगिजांनी किल्ला सोडून दिला व तो ओस पडला. इ.स १७३७ मध्ये पोर्तुगिज व पेशवे यांच्यामध्ये उत्तर कोकणात युध्द (वसई युध्द) सुरु झाले. त्यावेळी शंकरजी केशव यांनी पेशव्यांना हा किल्ला वसवण्यासाठी पत्र लिहिले, त्यात त्यांनी लिहिले की, किल्ला पोर्तुगिजांच्या परगण्याच्या मधोमध आहे, किल्ल्यावरुन कल्याण-भिवंडी मार्गावर ताबा ठेवता येईल. याच सुमारास कामणदुर्गावरील दोन टाक खोदण्यात आली व जूनी दूरुस्त करुन किल्ला वसविण्यात आला.

गडावरील पहाण्याची ठिकाणे

गडाच्या पायथ्याशी असलेल्या बेलकुंडी गावातून दोन डोंगरांच्या मागून डोकावणारा कामणदुर्गचा माथा दिसतो. हे दोन डोंगरपार करुन आपण कामणदुर्गच्या डोंगराला भिडतो तेव्हा कातळात खोदलेल्या पायर्‍या आपले स्वागत करतात. या पायर्‍या चढून गेल्यावर आपण उध्वस्त प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश करतो. समोर १०० फूट उंचावर कामणदूर्गचा माथा आपले लक्ष वेधून घेतो. किल्ल्यावर बुरुज, तटबंदी यांचे अवशेष नाहीत पण कातळात खोदलेली ५ टाक आहेत जानेवारी महिन्यापर्यंत यात जेमतेम पाणी असते. टाक्यांकडे जाताना वाटेत झाडाखाली एक दगडी मुर्ती ठेवलेली आहे. यात दोन स्त्रिया कोरलेल्या असून त्यांच्या कानावर कवच कुंडलांसारखी आभूषणे घातलेली आहेत. अशा प्रकारच्या मुर्ती किल्ल्याच्या मागच्या बाजूला असल्याचे गावकरी सांगतात. टाक्यांच्या बाजूने एक वाट कामनदुर्गाच्या सर्वोच्च माथ्यावर जाते. वाटेत एक सातवाहनकालीन कोरड टाक लागत. त्याच्या पूढे कातळात खोदलेल्या पायर्‍या लागतात. या पायर्‍या चढून गेल्यावर किल्ल्याचा सर्वोच्च माथा गाठता येतो. किल्ल्यावरुन तुंगारेश्वर, गोतारा(मुमतारा) हे किल्ले दिसतात पश्चिमेला वसईची खाडी ते धारावी पर्यंतचा परीसर दिसतो.

गडावर पोहोचण्याच्या वाटा

१) दिवा - वसई या रेल्वेमार्गावर ‘कामण’ स्थानक आहे. या स्थानकात उतरुन कामणदूर्गला जाता येते. (डोंबिवली (५.२०) कामण (६.०५) )ही पहिली दिवा - वसई गाडी सोयीची आहे.
२) भिवंडी - वसई रस्त्यावर भिवंडीहून २२ किमीवर कामणगाव आहे.
३) पश्चिमरेल्वेवरील नायगाव येथून रिक्षाने चिंचपाडा व तिथून रिक्षाने कामणगावात जाता येते.

कामणगावात सिंडीकेट बँके समोरुन एक रस्ता बेलकुंडी या गावात जातो. "बेलकुंडी १ कि.मी" या पाटीजवळ एक रस्ता उजव्या हाताला जातो. या रस्त्याने आपण बेलकुंडीच्या पाड्यात पोहोचतो. या पाड्यातून पायवाट कामणदूर्गाकडे जाते. पावसाळ्यात दोन ठिकाणी ओढा ओलांडावा लागतो.

देवकुंडी गावातूनही एक रस्ता कामनदुर्गाकडे जातो बेलकुंडी गावातून येणारा रस्ताही ओढ्यापलीकडे या रस्त्याला मिळतो.

राहाण्याची सोय

गडावर रहाण्याची सोय नाही.

जेवणाची सोय

जेवणाची व्यवस्था आपण स्वत…:च करावी.

पाण्याची सोय

गडावरील टाक्यांत जानेवारी महिन्यापर्यंतच पाणी असते.

जाण्यासाठी लागणारा वेळ

बेलकुंडी/देवकुंडीतून गडावर जाण्यासाठी २.३० ते ३ तास लागतात.

सूचना:
१) किल्ल्याचा चढ खडा आहे व किल्ल्याच्या शेवटच्या टप्प्यात झाडे नसल्यामुळे कातळातील पायर्‍या/खोबणी तापतात. हे टाळण्यासाठी किल्ला सकाळी लवकर चढण्यास सुरुवात करावी.

२) किल्ल्यावर जानेवारी महिन्यापर्यंत पाणी असते, पण टाक्यांमध्ये दरड कोसळल्यामुळे पाण्याचे प्रमाण अल्प आहे त्यामुळे पाण्याचा साठा बरोबर असणे आवश्यक आहे.