नाशिक जिल्ह्यातील बागलाण भागात सालोटा, साल्हेर, मुल्हेर, डेरमाळ, पिसोळ सारखे मोठे किल्ले आहेत. तसेच बिष्टा, कर्हा, दुंधा, अजमेरा सारखे अपरिचित किल्ले आहेत. सटाणा तालुक्यातून जाणार्या दुंधेश्वर डोंगररांगेवर असलेल्या या चार किल्ल्यांचा वापर चौकीचे किल्ले म्हणून केला गेला.
Karha Fort, Karha Fort Trek, Karha Fort Trekking, Nashik
खाजगी वहानाने दोन दिवसात हे चारही किल्ले आणि देवळाणे गावातील जोगेश्वर मंदिर व्यवस्थित पाहाता येते.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
सटाणाहून दोधेश्वर गावाकडे जातांना १४ किमीवर एक चौक लागतो. येथून समोर जाणारा रस्ता बिष्टा किल्ल्याच्या पायथ्याच्या कोटबेल गावाकडे जातो. उजव्या बाजूचा रस्ता कोळीपाडा गावात तर डाव्या बाजूचा रस्ता कर्हे गावाकडे जातो. कर्हे गावाकडे जाणार्या रस्त्यावर चौकापासून एक किमीवर डाव्याबाजूला एक कच्चा रस्ता जातो. या रस्त्याने ५ मिनिटे चालत गेल्यावर वाट जंगलात शिरते. या वाटेवर नव्याने बांधलेले सप्तशृंगी मातेचे देऊळ आहे. देवळाच्या पुढे पायवाट एका टेकडावर जाते. या टेकाडावर एक झेंडा लावलेला आहे. या टेकाडा वरून समोर कर्हा किल्ला दिसतो. मळलेली पायवाट किल्ल्यावर चढतांना दिसते. या पायवटेने १० मिनिटे चढल्यावर एका मोठ्या खडकाखाली दोन लाकडी पट्ट्यांवर माकडाची लाल रंगात रंगवलेली चित्र पाहायला मिळतात. स्थानिक लोक त्यांना माकडदेव म्हणतात.
माकड देवाच दर्शन घेऊन २० मिनिटे चढल्यावर आपण एका पठारावर पोहोचतो. यठिकाणी किल्ल्याची माची आणि प्रवेशव्दार असण्याची शक्यता आहे. कारण याठिकाणी कमानीसाठी वापरले जाणारे दोन कोरीव दगड पडलेलेल आहेत. त्याचप्रमाणे इथे एक तुटका कोरीव दगडी स्तंभ पडलेला आहे. हा स्तंभ चारही बाजूंनी कोरलेला आहे. सध्या त्यावरील प्रत्येक बाजूच्या दोन शिल्प चौकटी शाबूत आहेत. पण उन्हा पावसात राहील्यामुळे त्यावरील शिल्प झिजलेली आहेत. या स्तंभाच्या एका बाजूला गणपती कोरलेला आहे. त्याखालच्या चौकटीत ३ वादक बसलेले दाखवले आहेत. एका बाजूला एक घोडेस्वार दाखवलेला आहे. पण इतर बाजूची शिल्प झिजल्यामुळे त्यावरील शिल्प ओळखण्या पलिकडे गेलेली आहेत. माची वरुन १० मिनिटाचा चढ चढल्यावर आपल्याला कातळात कोरलेल्या पायर्या लागतात. याच ठिकाणी एक कातळ कोरीव गुहा आहे. किल्ल्यावर येणार्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी ही गुहा बनवलेली आहे. गुहेच्या पुढे २ मिनिटे चालल्यावर आपला गडावर प्रवेश होतो. गडावर समोरच भवानी मातेचे नव्याने बांधलेले मंदिर आहे. त्याच्या पाठी मागे २ पाण्याची कोरडी टाकी आहेत. या टाक्यांच्या उजव्या बाजूला खाली उतरल्यावर एक पाण्याच प्रचंड मोठे गुहा टाक आहे. हे टाकही कोरडे आहे. टाक पाहून परत वर येऊन विरुध्द बाजूस ख्हाली उतरल्यावर अजून एक पाण्याच टाक आहे. पण त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. हे टाक पाहून त्याच्या पुढेच कड्याच्या दिषेने खाली इतरल्यावर एक कातळ टप्पा लागतो. तो गिर्यारोहणाचे तंत्र वापरून काळजीपूर्व उतरल्यावर आपल्याला एका बाजूला एक असलेली तीन टाकी पाहायला मिळतात. यातील शेवटच्या टाक्यात पिण्यायोग्य पाणी आहे. ही टाकी पाहून परत गड माथ्यावरील मंदिरापाशी आल्यावर आपली गड फ़ेरी पूर्ण होते. गड माथा लहान असल्याने गड पाहाण्यासाठी अर्धा तास लागतो. गड माथ्यावरुन बिष्टा किल्ला, फ़ोपिरा डोंगर आणि अजमेरा किल्ला दिसतात.
गडावर जाण्याच्या वाटा
मुंबईहून नाशिक मार्गे सटाणा गाठावे. सटाणा पासून १६ किमीवर किल्ल्याच्या पायथ्याचे कोळीपडा हे गाव आहे. सटाणाहून दोधेश्वर गावाकडे जातांना १४ किमीवर एक चौक लागतो. येथून समोर जाणारा रस्ता बिष्टा किल्ल्याच्या पायथ्याच्या कोटबेल गावाकडे जातो. उजव्या बाजूचा रस्ता कोळीपाडा गावात तर डाव्या बाजूचा रस्ता कर्हे गावाकडे जातो. कर्हे गावाकडे जाणार्या रस्त्यावर चौकापासून एक किमीवर डाव्याबाजूला एक कच्चा रस्ता जातो. या रस्त्याने ५ मिनिटे चालत गेल्यावर वाट जंगलात शिरते. या वाटेवर नव्याने बांधलेले सप्तशृंगी मातेचे देऊळ आहे. देवळाच्या पुढे पायवाट एका टेकडावर जाते. या टेकाडावर एक झेंडा लावलेला आहे. या टेकाडा वरून समोर कर्हा किल्ला दिसतो. मळलेली पायवाट किल्ल्यावर चढतांना दिसते.
सटाणाहून दिवसातून ५ एसटी बसेस कोडबेलला जातात. सकाळी ७.३० सटाणा-भिलपुरी, सटाणा-चिंचवा दुपारी ११.३०, संध्याकाळी ५.०० वाजता सटाणा-चिंचवा. साक्री-सटाणा सकाळी ७. ०० वाजता गावात येते. गावातून ६ आसनी रिक्षा नामापूरला जातात .
गडावर राहाण्याची सोय
गडावर राहाण्याची सोय नाही.
गडावर पाण्याची सोय
गडावरील कड्या खालच्या टाक्यात पिण्याचे पाणी आहे.