केळवे पाणकोट किंवा केळवे जंजिरा या नावाने ओळखला जाणारा हा किल्ला केळवे गावाच्या दक्षिणेला भर समुद्रात आहे. दांडा खाडी ज्या ठिकाणी समुद्राला मिळते, त्याच मार्गावरील खडकावर या किल्ल्याची उभारणी भर समुद्रात केल्यामुळे दांडा खाडीवर व समुद्रावर एकाचवेळी नियंत्रण ठेवणे पोर्तुगिजांना सहज साध्य झाले.जहाजाच्या आकाराचा हा सुंदर पण अपरिचित पाणकोट आजही सुस्थितीत उभा आहे. ओहोटीच्या वेळी अलिबागच्या कुलाबा किल्ल्याप्रमाणे समुद्राचे पाणी किल्ल्याच्या पाठीमागे जाते त्यामुळे जमिन उघडी पडते व खुष्कीच्या मार्गाने किल्ल्यावर जाता येते.
Kelve Fort, Kelve Fort Trek, Kelve Fort Trekking, Thane
इतिहास
पोर्तुगिजांनी हा पाणकोट बांधला होता. पोर्तुगिज मराठे युध्दाच्या वेळी (फेब्रुवारी १७३९) चिमाजी आप्पांना लिहीलेल्या पत्रात या किल्ल्याची नोंद आढळते.
गडावरील पहाण्याची ठिकाणे
किल्ला बांधतांना स्थापत्यकाराने किल्ल्याचे प्रवेशद्वार जमिनीपासून ८ फूट उंचीवर बांधलेले आहे. त्यामुळे भरतीच्यावेळी समुद्राच्या पाण्याने जेव्हा किल्ला वेढला जातो तेव्हा बोटीने किल्ल्यात प्रवेश करता येतो; तर ओहोटीच्या वेळी किल्ल्याच्या आजूबाजूची जमिन उघडी पडल्यावर ८ फूट भिंत चढून किल्ल्यात प्रवेश करावा लागतो. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस जंग्या आहेत, तसेच तोफा ठेवण्यासाठी झरोके आहेत. प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस दरवाजा मागील अडसर लावण्यासाठी दगडात खाच केलेली आहे.
प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर समोर दुसरे प्रवेशद्वार व त्याच्या बाजुची तटबंदी दिसते. तटबंदीत जंग्या आहेत. पहिला दरवाजा पडल्यावरही किल्ला लढविण्यासाठी ही रचना केलेली आहे. दुसर्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर डाव्या हातास उध्वस्त वास्तूचे अवशेष व कोरडा पाण्याचा तलाव दिसतो. येथून पूढे गेल्यावर तिसरे प्रवेशद्वार लागते किल्ल्याचा हा भाग दोन मजली असून त्याचा आकार अर्धवर्तूळाकार आहे. आतमध्ये पाण्याची बुजलेली विहिर आहे. अर्धवर्तूळाकार तटबंदीमध्ये दोनही मजल्यावर जागोजागी जंग्या व तोफांसाठी झरोके आहेत. तसेच लाकडी वासे लावण्यासाठी तटबंदीत केलेल्या खाचा पहाता येतात. या झरोक्यांचा उपयोग तोफा ठेवण्याबरोबरच व्यापारी नौकांकडून जकात वसूलीसाठी (आजच्या टोल नाक्यांप्रमाणे) केला जात असावा.
गडावर पोहोचण्याच्या वाटा
पश्चिम रेल्वेवरील केळवे स्थानकात उतरुन, बस अथवा रिक्षाने (८ किमी) केळवे गावातील चौकात यावे. या चौकातून डाव्या हाताचा रस्ता दांडा खाडीमार्गे भवानगडाकडे जातो.. या रस्त्यावर चौकापासून ५ मिनिटावर कस्टमची इमारत व कस्टमचा किल्ला आहे. या इमारतीकडून उजव्या हाताचा रस्ता केळवे कोळीवाड्याकडे जातो. कोळीवाड्यातून ओहोटीच्यावेळी चालत किल्ल्यापर्यंत जाता येते. किल्ल्याचे प्रवेशद्वार जमिनीपासून ८ फूट उंचीवर आहे. लाटांच्या घर्षणामुळे अंदाजे ५ फूटावर तटबंदीत खाच तयार झालेली आहे. या खाचेत चढून किल्ल्यात प्रवेश करता येतो.
राहाण्याची सोय
किल्ल्यावर रहाण्याची सोय नाही. पण केळवे गावात होऊ शकते.
जेवणाची सोय
किल्ल्यावर जेवणाची सोय नाही, पण केळवे गावात होऊ शकते.
पाण्याची सोय
किल्ल्यावर पाण्याची सोय नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ
केळवे गावातून चालत १५ मिनीटात पाणकोटा पर्यंत जाता येते.
सूचना:
१) भवानगड(१५ किमी), दांडा किल्ला, फुटका बुरुज, कस्टम किल्ला (१५किमी), केळवे पाणकोट (१५ किमी) केळवे भुईकोट (३ किमी) माहिमचा किल्ला व (५ किमी) शिरगावचा किल्ला हे सर्व किल्ले एका दिवसात पाहून होतात. परंतु यासाठी समुद्राच्या भरती ओहोटीची वेळ माहित असणे फार महत्वाचे आहे. कारण केळवे पाणकोट केवळ ओहोटीच्या वेळी पहाता येतो. ओहोटीची वेळ पाहून व्यवस्थित नियोजन केल्यास सर्व किल्ले एका दिवसात आरामात पहाता येतात. पालघर किंवा केळवेहून दिवसभरासाठी ६ आसनी रिक्षा मिळू शकते.
२) केळवे माहिम परिसरातील ६ किल्ले स्वत:च्या वाहनाने किंवा रिक्षाने एका दिवसात पहाता येतात. त्यासाठी प्रथम भरती ओहोटीचे वेळापत्रक पहावे, कारण केळवे पाणकोट केवळ ओहोटीच्या वेळी पहाता येतो.
जर ओहोटी सकाळी असेल तर प्रथम केळवे पाणकोट पहावा. नंतर दांडा किल्ला, भवानगड पाहून परत केळवेत यावे. जेवण करुन केळवे भूईकोट, माहिमचा किल्ला, शिरगावचा किल्ला पाहून पालघरला जावे.
ओहोटी संध्याकाळी असल्यास पालघर स्थानकात उतरुन रिक्षा करुन ५ किमी वरील शिरगाव (५ किमी) वरील माहिमचा किल्ला, महकावती देवीचे मंदीर (४ किमी वरील) केळवे भूईकोट (३ कि मी) वरील भवानगड पाहून शेवटी परत केळवे गावात येऊन ओहोटीला केळवे पाणकोट पहावा व ८ किमी वरील केळवे स्थानक गाठावे.