उंदेरी या जलदुर्गावर करडी नजर ठेवून असलेला किल्ला थळ गावाच्या समुद्रकिनार्‍यावर होता. हा किल्ला म्हणजे थळचा किल्ला किंवा खुबलढा किल्ला होय. खांदेरी किल्ल्याच्या उभारणीच्यावेळी व उभारणी नंतरही या किल्ल्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

Khubladha Fort, Khubladha Fort Trek, Khubladha Fort Trekking, Raigad

इतिहास

थळच्या किनार्‍यावर असणार्‍या नैसर्गिक उंचवट्यावर खुबलढा किल्ला उभा होता. इ.स १६५९ मध्ये शिवाजी महाराजांनी खांदेरी किल्ला बांधण्यास सुरुवात केल्यावर या किल्ल्याला महत्व आले. खांदेरी किल्ल्यातील सैनिक व मजूरांना रसद, बांधकामाची इतर सामुग्री पुरवण्याची जबाबदारी थळच्या किल्ल्यावर होती. तसेच इंग्रज व सिद्दी यांच्यापासून नवीन तयार होणार्‍या किल्ल्याचे जमिनीकडील बाजूकडून संरक्षण करण्याची जबाबदारी थळ किल्ल्यावर होती. इ.स १७४९ मध्ये सिद्दीने हा किल्ला जिंकला. पुढे १७५० मध्ये मानाजी आंग्रे याने हा किल्ला परत जिंकून घेतला. या युध्दात सिद्दीची २०० माणसे मारली गेली. पुढे - पुढे मराठ्यांना थळच्या किल्ल्याचे रक्षण करणे जिकरीचे झाले. त्यामुळे त्यांनी किल्ला मोडून त्यावरील तोफा कुलाबा किल्ल्यावर पाठवल्या.

गडावरील पहाण्याची ठिकाणे

थळ गावाच्या समुद्रकिनार्‍या वरील उंचवट्यावर हा किल्ला होता. आता किल्ल्याच्या भिंतीचे काही अवशेष आहेत. बाकी पहाण्यासारखे काही उरलेले नाही.

गडावर पोहोचण्याच्या वाटा

अलिबागहून ५ कि.मी वरील थळ गावाच्या समुद्रकिनार्‍यावरील उंचवट्यावर हा किल्ला होता. आता किल्ल्याच्या भिंतीचे काही अवशेष आहेत. बाकी पहाण्यासारखे काही उरलेले नाही. खांदेरी - उंदेरी किल्ले पहाण्यासाठी थळला जावेच लागते, तेव्हा या इतिहासात लुप्त झालेल्या किल्ल्याची मोक्याची जागा पाहाता येते.