मदनगड किल्ला Madangad Fort – ४९०० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.

सह्याद्री मधील कठीण अशा गडकिल्ल्यांमध्ये एक गड म्हणजे मदनगड. किल्ला तसा बराच प्राचीन आहे. आणि तेवढाच दुर्गम सुद्धा. या परिसरातील भटकंती करायाची असेल तर सर्वात योग्य असा कालावधी म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी.

Madangad Fort, Madangad Fort Trek, Madangad Fort Trekking, Nashik

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

गडमाथा तसा लहानच आहे. गडावर पाण्याची दोन टाकी आहेत. मात्र यात फेब्रुवारी महिन्यापर्यंतच पाणी असते. गडावर २० ते ३० जणांना राहता येईल एवढी गुहा सुद्धा आहे. गडावरून सभोवतालचा परिसर फारच छान दिसतो. अलंग, कुलंग, छोटा कुलंग, रतनगड, आजोबा गड, कात्राबाई, डांग्या सुळका, हरिहर, त्रिंबकगड हे किल्ले दिसतात. गडफेरीस अर्धातास पुरतो.

गडावर जाण्याच्या वाटा

गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. दोन्ही मार्ग अलंग आणि मदनच्या खिंडीतूनच जातात.

आंबेवाडी मार्गे: मदनगडावर जाण्यासाठी इगतपुरी कसारा गाठावे. इगतपुरी / रा-घोटी-पिंपळनेरमोर या मार्गे आंबेवाडी गाठावी. घोटी ते आंबेवाडी अशी एस.टी. सेवा देखील उपलब्ध आहे. घोटी ते आंबेवाडी हे साधारन ३२ कि.मी. चे अंतर आहे. घोटीवरून पहाटे आंबेवाडी ला ६ वाजताची बस आहे. आंबेवाडीतून समोरच अलंग, मदन आणि कुलंग हे तीन किल्ले दिसतात. गावातूनच अलंग आणि मदनच्या खिंडी पर्यंत जाण्यासाठी वाट आहे. वाट फारच दमछाक करणारी आहे. खिंड गाठण्यास ३ तास लागतात. खिंडीत पोहचल्यावर डावीकडचा अलंग किल्ला तर उजवीकडचा मदन किल्ला. येथून अलंगवर जाण्यासाठी दोन वाटा आहेत. उजवीकडे वळल्यावर थोड्याच वेळात पायऱ्या लागतात. पायऱ्या चढून गेल्यावर एक सरळसोट ५० फूट उंचीचा सुळका कडा लागतो.

घोटी – भंडारदरा मार्गे घाटघर

किल्ल्यावर येण्यासाठी दुसरी वाट घाटघर वरून आहे. घोटी-भंडारदरा मार्गे घाटघर गाठावे. घाटघरहून चार तासात आपण अलंग आणि मदन यांच्या खिंडीपाशी पोहचतो.

गडावर राहण्यासाठी एक गुहा आहे यात साधारण ३० जण राहू शकतात. जेवणाची सोय आपण स्वतः करावी. किल्ल्यावर फक्त फेब्रुवारी पर्यंत पिण्यासाठी पाणी उपलब्ध असते. इतर वेळी स्वतः सोय करावी लागते. गडावर जाण्यासाठी आंबेवाडीतून ७ ते ८ तास लागतात.

सूचना: किल्ल्यावर जाण्याची वाट अतिकठिण असल्यामुळे प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असणे आवश्यक आहे.