ठाणे जिल्ह्यात शहापूर-आसनगावाजवळ एक दुर्गत्रिकुट आहे. माहुली-भंडारगड आणि पळसगड मिळून हे बळकट ठाणे तयार झाले आहे. मुद्दाम जाऊन पहावे असे हे ठिकाण कोणाही निसर्गप्रेमी माणसाला आपल्या निसर्गसौंदर्याने वेड लावते. अनेक सुळके असलेला लांबलचक असा हा डोंगर माहुली नावाने ओळखला जातो. माहुलीचे दोन खोगिरामुळे तीन भाग पडले आहेत. उत्तरेचा पळसगड, मधला माहुलीगड आणि दक्षिणेचा भंडारगड.

Mahuli Fort, Mahuli Fort Trek, Mahuli Fort Trekking, Thane

इतिहास

इतर अनेक किल्ल्यांप्रमाणे याही किल्ल्याची मूळ उभारणी कोणी केलीम हे ज्ञात नाही. पण १४८५ च्या सुमारास हे ठिकाण नगरच्या निजाम शाहीच्या संस्थापक असलेल्या मलिक अहमद याच्याकडे आले. पुढे शहाजीराजे निजामशाहीचे संचालक बनल्यावर दिल्लीच्या मोगल फौजा व आदिलशाही सेना संयुक्तपणे निजामशाही बुडवण्यासाठी प्रयत्न करू लागल्या. १६३५-३६ च्या सुमारास शहाजींनी कठीण परिस्थितीत बळकट आश्रयस्थान म्हणून जुन्नर- शिवनेरीहून जिजाबाई व बाळ शिवाजीसह माहुलीला मुक्काम हलवला. खानजमान आहे म्हणजे महाबतखानाच्या मुलाने माहुलीला वेढा दिला. शहाजीराजांनी पोर्तुगीजांकडे मदत मागितली. पण त्यांनी नकार दिला असता शहाजींनी शरणागती पत्करली. पुढे १६५८ मध्ये जानेवारी रोजी शिवरायांनी हा किल्ला मोगलांकडून परत मिळवला. पण १६६१ मध्ये तो मोगलांना परत द्यावा लागला. लगेसच तो परत जिंकून घेतला गेला. १६६५ च्या पुरंदरच्या तहात हे दुर्गत्रिकुट परत गमवावे लागले. त्यानंतर मोगलांचा मनोहरदास गौड हा धोरणी कर्तबगार सरदार माहुलीवर कारभार पाहू लागला. त्याने गडावर बरेच बांधकाम करून घेतले. फेब्रुवारी १६७० मध्ये खुद्द शिवाजीराजांच्या नेतृत्त्वाखाली माहुलीवर केलेला हल्ला अयशस्वी ठरला. दीड हजार मराठी मावळ्यांपैकी तब्बल हजार मावळे मोगलांनी कापून काढले. मराठ्यांचा दणदणीत पराभव झाला. या यशानंतरही मनोहरदास गौडने किल्लेदारी सोडली. त्याच्या जागी अलाविर्दी बेग हा किल्लेदार रुजू झाल. नंतर १६ जून १६७० रोजी दोन महिन्यांच्या वेढ्या नंतर दोनशे मोगल सैनिकांचे रक्त सांडले. मोरोपंत पिंगळ्यांनी माहुली. पळसगड व भंडारगडा हे त्रिकूट स्वराज्यात सामील करून घेतले.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

आसनगावमार्गे माहुली गावातून शिडीच्या वाटेने किल्ल्यावर आल्यावर समोरच पाण्याची दोन टाकी आहेत. पाच मिनिटांवर आणखी एक पाण्याचे टाके आहे. उजवीकडे गेल्यावर खाली पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. समोरच ढासळलेल्या अवस्थेतला महादरवाजा आहे. इथून भातसा राशी, अलंग, मदन, कुलंग व कळसूबाई पर्वतरांग दिसते. तर पूर्वेला हरिश्चंद्रगड, आजोबा, दक्षिणेपूर्वेला माथेरान रांग, दक्षिणपश्चिमेला तानसा खोरे. तुंगारेश्वर रांग असलेला प्रचंड मुलुख दिसतो. शिडीच्या वाटेने दोन मिनिटे पुढे गेल्यावर डावीकडे जंगलात एक वाट जाते. वाटेतच छप्परवजा असणारे महादेवाचे मंदिर आहे. पुढे वाड्याचे काही अवशेष आढळतात. समोरच पाण्याचा फार मोठा तलाव आहे. पुढे गेल्यावर जांभळाचे रान लागते. ही वाट खिंडीत जाऊन पोहोचते. ही खिंड म्हणजे माहुली आणि भंडारगड दरम्यानची खिंड आहे. खिंडीच्या थोडे वर गेल्यावर उजव्या बाजूस अ५०० ते ६०० फुट खाली उतरल्यावर कड्यालगतच कल्याण दरवाजा आहे. या दरवाज्यातून गडावर यायचे झाल्यास प्रस्तरारोहणाची गरज पडते. खिंडीतून वाटेने वर चढत गेल्यावर झाडीमध्ये बारमही पाण्याचे भुयारी टाके आहे. येथून पुढे जाणारी वाट गडाच्या दक्षिण टोकापाशी म्हणजेच भंडारगडावर घेऊन जाते. भंडारगडावरून समोरच उभे असणारे भटोबा, नवरा व नवरीचे सुळके दिसतात. समोरच उजवीकडे असणाऱ्या डोंगररांगेवर वजीरचा सुळका दिसतो. सभोवतालच्या परिसराचे दृश्य अतिशय रमणीय असते.

गडावर जाण्याच्या वाटा

१) आसनगाव मार्गे: मुंबई-नाशिक लोहमार्गावरील आसनगाव गाठावे. इथून ५ कि.मी. अंतरावरील गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या माहुली या गावी पायी अथवा रिक्षाने जाता येते. गडाच्या पायथ्याशी महादेवाचे सुंदर मंदिर आहे. रात्रीतेथे राहण्याची सोय होते. इथून उजवीकडे एक ओढा पार करून ३ कि.मी. चा खडा चढ चढून जावे. वाटेत एक लोखंडी शिडी आहे. ती पार करून वर गेल्यावर समोरच पाण्यची दोन टाकी दिस्तात. या वाटेने गडावर जाण्यास २ तास लागतात.

२) वाशिंदमार्गे: लोकलने किंवा एस.टी. ने वाशिंदला उतरावे. उत्तरेला दहागाव आणि पुढे चाप्याचा पाडा गाठावा. चंदेरीचा डोंगर उजवीकडे ठेवून माहुलीच्या दक्षिण टोकापासून निघालेल्या व पश्चिमेला पसरलेल्या सोंडेवर चढावे. सोंडेवरून नवरा-नवरी सुळके उजवीकडे ठेवत. अवघड श्रेणीचा कातळटप्पा चढून कल्याण दरवाजाने भंडारगडावर प्रवेश करावा. कल्याण दरवाजावर एक शिलालेख आढळतो. ही वाटा खूप अवघड असल्याने प्रस्तरारोहणाचे साहित्य जवळ असणे आवश्यक आहे.

भंडारगडावर रहाण्याची कोणतीही सोय नाही. किल्ले माहुलीवर रहाण्यासाठी पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत, पण शक्यतो. हा ट्रेक एक दिवसाचाच करावा. किल्ल्यावर जेवणाची सोय आपणच करावी लागते.किल्ले माहुलीवर पहारेकऱ्यांच्या देवड्यासमोर पाण्याचे टाके आहे. येथील पाणी पिण्यासाठी उपयुक्त आहे. भंडारगडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही. त्यामुळे तेथे असताना पाण्याचा साठा जवळ ठेवावा. किल्ल्यावर जाण्यासाठी आसनगाव मार्गे दोन तास कल्याण दरवाजा मार्गे ६ ते ८ तास लागतात.

सूचना: वाट आसनगाव मार्गे सोपी कल्याण दरवाजा मार्गे अवघड.