मलंगगड कल्याणपासून दक्षिणेस १६ किमी अंतरावर एका उंच डोंगरावर बांधलेला आहे. हाजीमलंग या नावाने हा डोंगर ओळखला जातो. आज हाजीमलंगला अनेक हिंदु- मुस्लिम भाविक जातात. त्यापैकी फारच थोडेजण किल्ल्याच्या दुसर्या माची पर्यंत जातात. तर गडाच्या बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी कराव्या लागणार्या साहसामुळे (प्रस्तरारोहणामुळे) केवळ गिर्यारोहकच गडाच्या सर्वोच्च माथ्यावर जातात. मुंबई शहारापासून अगदी जवळ असूनही दुर्लक्षित असलेल्या या पूरातन किल्ल्याला दैदिप्यमान इतिहास आहे. किल्ल्यावर पूरातन अवषेश आजही तग भरुन उभे आहेत. तसेच किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावर जाण्या करीता कराव्या लागणार्या साहसामुळे किल्ल्याची चढाई थरारक होते.
Malanggad Fort, Malanggad Fort Trek, Malanggad Fort Trekking, Thane
मलंगगडाच्या दुसर्या टप्प्यापर्यंत (माची पर्यंत) चढण्यासाठी गिर्यारोहण साहित्याची गरज लागत नाही. पण यापुढील टप्पा सर करण्यासाठी मात्र गिर्यारोहणाचे साहित्य बरोबर असणे व तंत्र माहित असणे आवश्यक आहे.
इतिहास
इसवी सनाच्या सहाव्या शतकात नलदेव मौर्य नावाचा राजा या ठिकाणी राज्य करत होता.
सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात या किल्ल्यावर मराठे व इंग्रज यांच्यात एक रोमहर्षक लढाई झाली. दोनही बाजूंनी शह - काट्शह दिले गेले. त्या लढाईचा तपशिल पुढील प्रमाणे आहे.
ऑबिंग्डन ह्या इंग्रजी अधिकार्याने १७८० मध्ये मंलगगडाला वेढा घातला. पावसाळ्यात मराठे युद्ध टाळतात हे लक्षात घेऊन बेसावध मराठ्यांवर भर पावसातच हल्ला करण्याचे त्याने ठरवले. लढाई सुरू होताच नैऋत्य व उत्तरेकडच्या वाटा बंद करून टाकल्या. त्याने प्रथम पीर माची घेण्याचे ठरवले. तेथे पांडुरंग केतकर यास ३०० माणसांनिशी नेमलेले हाते. अचानक हल्ला झाल्यामुळे मराठ्यांनी प्रतिकार केला नाही. १२५ जण सोने माचीकडे धावले, तर बाकी गडावर जागा नव्हती म्हणून कल्याणच्या मामलेदाराकडे धावले. अॅबिंग्डनने गडावर पोहचण्यासाठी गडाच्या पायथ्यापासून पीर माचीपर्यंत वाट शोधून काढली. नाना फडणविसाने वेढा उठवण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी झाला नाही. ऑबिंग्डनने पीर माचीच्या पठारावर तीन तोफा चढवल्या व सोने माचीवर गोळीबार चालू केला. पण प्रवेशद्वार मोठ्या खुबीने बांधले असल्यामुळे तेथवर गोळे पोहचेनात. मराठ्यांना जंगलातल्या अनेक चोरवाटा माहीत असल्यामुळे त्यांचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटण्याचा संभव नव्हता. किल्लेदाराने आनंदराव धुळप व काशीपंत यांच्याकडे मदत मागितली, पण त्यांनी प्रत्यक्ष न येता ७०० शिपाई पाठवले जे तेथवर पोहचू शकले नाहीत.
कॅप्टन ऑबिंग्डनने शिड्या लावून २५० माणसे सोने माचीवर चढवली, पण मराठ्यांनी गडावरून दगडधोंड्यांचा वर्षाव करून त्यांना परत पाठवले. अॅबिग्डनने पीर माचीवरून तोफा काढून घेतल्या. गंगाधररावानने संधी साधून दाणापाणी व दारूगोळा भरून धेतला. नाना फडणीसांनी बाळाजी विश्वनाथ पाठक व राधोविश्वनाथ गोडबोले यांना सैन्य देऊन वेढा उठवण्यास पाठवले. त्यांच्या फौजा शिरवळ या मलंगच्या उत्तरेला असलेल्या गावी पोहोचल्या. मराठ्यांची फौज तीन हजारावर होती त्यांनी शत्रूला हुसकावून लावण्याचे प्रयत्न केले पण ते अयशस्वी झाले. १६ सप्टेंबरला गारद्यांची एक पलटण पीर माचीवर चाल करून गेली. त्यांनी तोफांवर हल्ले केल्यामुळे ब्रिटिशांनी घाईघाईने तोफा काढून घेतल्या. मेजर वेस्टफॉलने अॅबिंग्डनच्या मदतीसाठी जादा कुमक धाडली.
या सेनेने रसद घेऊन येणार्या मराठ्यांच्या तुकडीला उध्वस्त केले. त्यामुळे मलंगगडावर अन्नधान्याचा तुटवडा भासू लागला. काही धान्य पावसाने नासले, खजिना संपत आला. मराठ्यानी इंग्रजांचेही दळणवळण तोडून टाकले होते. तेंव्हा कर्नल हार्टलेने बेलापूर, पनवेल, तळोजे मार्ग सुरक्षित केला. शिरवळच्या मराठ्यांच्या तळावर हल्ला करून त्यांना हुसकावून लावले. आता ब्रिटिशांनी कॅप्टन कारपेंटरच्या हुकमतीत मलंगगडावर दुसरा हल्ला चढवला. तोफांचा गोळीबार सुरू केला. तटाला भगदाड पडले की आत घुसायला ३५० सैनिक तयार ठेवले होते, पण केतकरांनी किल्ला शौर्याने लढवेला. इंग्रजांचे बरेच सैनिक कामी आले. तेंव्हा इंग्रजांनी हल्ले थांबवले, पण वेढा मात्र उठवला नाही. पीर माचीवरून तोफा काढून घेतल्या. मराठ्यांची नाकेबंदी करून त्यांची उपासमार केली. त्यांना शरण यायला लावावे असे इंग्रजांनी ठरवले.
ऑक्टोबर नंतर किल्ल्यावर उपासमार होऊ लागली. बाहेरून गंगाधर कार्लेकर काही मदत पाठवू शकले नाहीत. शेवटी नाना फडणविसाने काही सरदारांना हाताशी घेऊन मोठी फौज जमा केली आणि मलंगगड व वसई वर धाडली. स्वत: नाना व हरीपंत फडके दहा हजार फौजेसह खंडाळ्याला आले व त्यांनी राजमाची घाट उतरून कल्याणकडे जायचे ठरवले. त्यामुळे हार्टलेला प्रतिशह दिला जाणार होता. ताबडतोब हार्टलेने मलंगगडावरून सैन्य काढून घेतले व लगेच मराठ्यांनी मलंगगडाकडे जादा कुमक व रसद धाडली. अशाप्रकारे मराठ्यांनी अखेरपर्यंत मलंगगड शर्थीने लढवला.
गडावरील पहाण्याची ठिकाणे
मलंगगड तीन टप्प्यात विभागलेला आहे. पहिल्या टप्प्यावर मलंगगडावरील समाधी मंदिर (हाजी मलंग) आहे. पूर्वी ही किल्ल्याची माची होती. या माचीला " पीर माची " या नावाने ओळखले जाते. दुसर्या टप्प्यावर "सोन माची" व पूरातन अवशेष आहेत. तर तिसरा कठीण टप्पा म्हणजे "बालेकिल्ला’ यावरही प्राचीन अवशेष आहेत.
मलंगगडावरील समाधी मंदिरापर्यंत जाण्यासाठी व्यवस्थित पायर्यांचा मार्ग आहे. या मार्गाने आपण गडाच्या समाधी मंदिरापर्यंत आल्यावर, समाधी मंदिराच्या अलिकडे (मंदिराकडे तोंड करून उभे राहिल्यावर) उजव्या बाजूच्या दोन दुकानांच्या मधील बोळातून एक पायवाट डोंगरावर जाते. या पायवाटेने वर चढत गेल्यावर एक छोटीशी सपाटी येते. येथून दोन वाटा फूटतात. एक पायर्यांची वाट वर चढत दुसर्या माचीवर जाते. तर उजव्या बाजूची वाट डोंगरच्या कडेकडेने कातळभिंती खालील एका गुहे पाशी जाते. या ठिकाणी एक पाण्याचे टाक आहे. ही गुहा पाहून परत सपाटीवर येऊन पायर्यांची वाट पकडून चढायला सुरुवात करावी. या कमी अधिक उंचीच्या बांधीव पायर्यांचा मार्गाने साधारण २० मिनिटात आपण दोन बुरुज शाबूत असलेल्या उध्वस्त प्रवेशव्दारातून गडाच्या दुसर्या माचीवर पोहोचतो. या माचीला ’सोने माची" म्हणतात. येथे येण्यासाठी असलेल्या पायर्या अनेक ठिकाणी तुटलेल्या आहेत. तसेच चढ उभा व दमछाक करणारा आहे. या दुसर्या टप्प्यापर्यंत (माची पर्यंत) चढण्यासाठी गिर्यारोहण साहित्याची गरज लागत नाही. पण यापुढील टप्पा सर करण्यासाठी मात्र गिर्यारोहणाचे साहित्य बरोबर असणे व तंत्र माहित असणे आवश्यक आहे.
सोने माचीवर आल्यावर आपल्याला उजव्या बाजूला मलंगगडाचे कातळसुळके दिसतात तर डाव्या बाजूला लांबवर पसरलेली माची दिसते. या माचीची रुंदी कमी आहे. माचीला सर्व बाजूंनी तुटलेली तटबंदी असून त्यामध्ये बुरुज आहेत. प्रवेशव्दारातून आत आल्यावर समोरच जमिनीवर कातळात कोरलेले एक दार दिसते. त्यातून खाली उतरण्यासाठी कातळात पायर्या कोरलेल्या आहेत. या पायर्यांच्या शेवटी चोर दरवाजा आहे. माचीवर सुळक्याच्या विरुध्द दिशेला वाड्याचे चौथरे आहेत. त्यापुढे पाण्याची दोन कोरडी टाकी आहेत. माचीच्या शेवटी असलेल्या बुरुजावर झेंडा लावण्याची जागा आहे. आता शाबूत असलेल्या तटबंदीत एके ठिकाणी पायर्या व जंगी पहायला मिळते. हा माचीचा भाग पाहून कातळ सुळक्याच्या दिशेने जावे. या ठिकाणी कातळ सुळक्याच्या डाव्या बाजूने (कड्याला उजवीकडे ठेवत) एक पायवाट जाते. या वाटेने थोड चालत गेल्यावर बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी कातळ कड्यात कोरलेल्या पायर्या दिसतात. प्रथम तिकडे न जाता त्या पायर्यांच्या बाजूने सरळ पुढे चालत जावे, तेथे एक गुहा दिसते. या गुहेत दोन पाण्याची टाक आहेत. त्यापैकी एका टाक्यात मे- जून पर्यंत पाणी असते. सध्या या टाक्यांना "कुराण टाक" म्हणून ओळखतात. ही टाकी पाहून परत फिरून पायर्यांपाशी यावे. पन्नास - साठ पायर्या चढून गेल्यावर नंतरच्या पायर्या तुटलेल्या आहेत. तो भाग चढण्यासाठी दहा बारा फूटांचे दोन पाईप जोडून आडवे टाकलेले आहेत. या ठिकाणी पाईप व कातळकडा यात अंतर जास्त असल्यामुळे हाताच्या आधारासाठी दोर लावावा लागतो. (या ठिकाणी बर्याच वेळा एक माणूस बसलेला असतो व तो हा टप्पा पार करून देण्यासाठी दोर लाऊन देतो व प्रत्येक माणसाचे पैसे घेतो.) हा अवघड टप्पा पार केल्यावर कातळात कोरलेली एक छोटी गुहा लागते. येथून थोड्या पायर्या चढून पुढे एक वळसा घेऊन ( ट्रॅव्हर्स) गेल्यावर आपण दोन सुळक्यांमधील खिंडीत येतो.
खिंडीतून समोरच्या सुळक्यावर चढण्यासाठी कमी जास्त उंचीच्या पायर्या आहेत. या दोन्ही बाजूंनी कुठलाही आडोसा/ आधार नसलेल्या या पायर्या चढण्यासाठी मध्ये - मध्ये लोखंडी कांब्या बसवलेल्या आहेत. तर दोन ठिकाणी लोखंडाच्या साखळ्या बसवलेल्या आहेत. याच्या आधाराने किंवा दोर लाऊन दहा ते वीस मिनिटांत गड माथ्यावर पोहोचता येते. गड माथ्यावर छप्पर उडालेले पण भिंती शाबूत असलेला एक मोठा वाडा दिसतो. याला नल राजाचा वाडा म्हणतात. त्याच्या मागे कातळात खोदलेली दहा टाकी आहेत. या टाक्यांमधून पाईप लाईन टाकून खालच्या वस्तीला पाणी पुरवठा केला जातो. या टाक्यांमध्ये मे- जून पर्यंत पाणी असते. बालेकिल्याच्या मध्यभागी औदुंबराच झाड आहे आणि काही ठिकाणी तटबंदीही आहे. बालेकिल्याच्या दुसर्या टोकाला गेल्यावर समोरच देवणीचा सुळका आहे. येथे येणारे भाविक या समोरच्या देवणीवर एक दगड फेकून मारण्याचा सोपस्कार करतात. दगड जर देवणीवर पोहोचला तर मनातली गोष्ट साध्य होते असे म्हणतात. मलंगगडावरुन गोरखगड, चंदेरी, पेब, ईरशाळ, प्रबळगड हे किल्ले ताहूली, म्हैसमाळ, माथेरान, हे डोंगर गणपती व कार्तिक हे सुळके आणि पनवेल,बेलापूर पर्यंतचा परिसर दिसतो.
गडावर पोहोचण्याच्या वाटा
कल्याणहून सकाळी अर्ध्या तासात बसने गडाच्या पायथ्याशी पोहचता येते.(कल्याणहून शेवटची एसटी रात्री १२.०० वाजता आहे.) गडाच्या निम्म्या उंचीवर तेथील सुप्रसिध्द हाजीमलंग दर्गा आहे. तिथपर्यंत पायर्या आहेत. वाटेत दुकाने आहेत. एक देवीचं मोठे मंदिर आणि शंकराच लहान देऊळ आहे. वरच्या या दर्ग्यापर्यंत भविकांची भरपूर वर्दळ असते. या मार्गाने आपण गडाच्या समाधी मंदिरापर्यंत आल्यावर, समाधी मंदिराच्या अलिकडे (मंदिराकडे तोंड करून उभे राहिल्यावर) उजव्या बाजूच्या दोन दुकानांच्या मधील बोळातून एक पायवाट डोंगरावर जाते. या पायवाटेने वर चढत गेल्यावर एक छोटीशी सपाटी येते. येथून दोन वाटा फूटतात. एक पायर्यांची वाट वर चढत दुसर्या माचीवर जाते.
राहाण्याची सोय
मलंग गडावरील हॉटेलात राहण्याची सोय आहे. तसेच सोने माचीवर किंवा बालेकिल्ल्यावर तंबू लाऊन रहाता येते.
जेवणाची सोय
मलंग गडावरील दुकानांमध्ये जेवणाची सोय होऊ शकते.
पाण्याची सोय
सोने माची वरील टाक्यात व बालेकिल्ल्यावरील टाक्यांम्ध्ये मे अखेरीसही पाणी असते.यातील पाणी पिण्यासाठी वापरता येऊ शकते.
जाण्यासाठी लागणारा वेळ
पायथ्यापासून समाधी मंदिरा (हाजीमलंग दर्गा) पर्यंत १ तास लागतो. समाधी मंदिरा (हाजीमलंग दर्गा) पासून सोने माची अर्धा तास लागतो. सोने माची ते बालेकिल् जाण्यासाठी.