नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहर अनेक गोष्टींमुळे नेहमीच चर्चेत असते. या दाट लोकवस्तीच्या प्राचीन शहरात गिरणा (गिरीपर्णा) आणि मोसम (मोक्षिणी) नद्यांच्या संगमावर मालेगावचा (माहुलीग्राम) भुईकोट किल्ला आहे. १८ व्या शतकात बांधलेल्या या किल्ल्यात आता शाळा भरते त्यामुळे हा किल्ला आजही बर्‍यापैकी तग धरुन आहे. मालेगाव परिसरात गेल्यास खास वाट वाकडी करुन बघावा असा हा किल्ला आहे.

Malegaon Fort, Malegaon Fort Trek, Malegaon Fort Trekking, Nashik

इतिहास

नारोशंकर यांनी अठराव्या शतकात मालेगावचा भुईकोट बांधला. सातार छत्रपंती दुसरे शाहू यांचा धाकटा भाऊ चतुरसिंह याने पेशव्यां विरुध्द उठाव केला. त्याने मालेगावच्या किल्ल्याचा आसरा घेतला होता. पेशव्यांचा सेनापती त्र्यंबकजी डेंगळे याने त्याला १० फ़्रेब्रुवारी १८१० रोजी कपट करुन मालेगावच्या किल्ल्यात कैद केले होते. पेशवाईच्या पाडावानंतर या किल्ल्यावर अरबांची सत्ता होती. १६ मे १८१८ रोजी इंग्रजांनी मालेगावच्या किल्ल्याला वेढा घातला . जवळजवळ एक महिना ३००-३५० अरबांनी मालेगावच्या किल्ल्याच्या मदतीने इंग्रजांशी लढा दिला. १०जुम १८१८ ला इंग्रजांच्या तोफ़ांच्या मार्‍य़ात किल्ल्यातील दारुकोठाराचा स्फ़ोट झाल्याने १३ जून रोजी किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

भुईकोट किल्ल्याला संरक्षणासाठी खंदकाची नितांत गरज असते. मालेगावच्या भुईकोटालाही चारी बाजूंनी खंदक होता. बाजूच्या नदीत भिंत उभारुन नदीचे पाणी या खंदकात वळवलेले होते. खंदकावर काढता घालता येण्यासारखा पुल होता. आज आपण किल्ल्यात प्रवेश करतो त्या बाजूचाच खंदक अस्तित्वात आहे. बाकीच्या सर्व बाजूंनी दाट वस्ती असल्याने त्या वस्तीने तो खंदक गिळंकृत केला आहे. किल्ल्याला तिहेरी तटबंदी होती त्यातील बाहेरची तटबंदी वस्तीत लुप्त झाली आहे. त्यातील नदीच्या बाजूचा एकच बुरुज शाबूत आहे तो किल्ल्यावरुन दिसतो. सध्या किल्ल्यात कांकणी विद्यालय आहे. त्यांच्या सोईसाठी पश्चिमेची तटबंदी फ़ोडून दरवाजा बनवलेला आहे. या दरवाजातूनच आपला प्रवेश होतो. किल्ल्यात प्रवेश केल्यावर आपल्याला विद्यालयाची नवीन बांधलेली इमारत आणि त्याच्या समोर ठेवलेल्या ३ तोफ़ा दिसतात. विद्यालयाच्या इमारतीकडे तोंड करुन उभे राहीले असता उजव्या बाजूला असलेल्या दोन तटाबंदीतील प्रशस्त जागेतून गडफ़ेरीला सुरुवात करावी. किल्ल्याची आतील तटबंदीत ९ बुरुज आहेत तटबंदीची उंची २० फ़ूट आहे. तटबंदीवर चर्या बांधलेल्या आहेत. तटबंदीत ठिकठिकाणी जंग्या आहेत. बाहेरील म्हणजे दुसर्‍या तटबंदीत बुरुज नाहीत. या तटबंदीची उंची साधारणपणे १५ फ़ुट आहे. तटबंदीत ठिकठिकाणी जंग्या आहेत. तटबंदीला फ़ांजी मात्र नाही आहे. तटबंदीच्या खालच्या भागात ३ फ़ूट उंच, २ फ़ुट रुंद आणि २ फ़ूट खोल अशा छोट्या चौकोनी खोल्या आहेत. त्यांचा उद्देश कळत नाही. दोन तटबंदींच्या मधून किल्ल्याला प्रदक्षिणा घालण्यासाठी १५ मिनिटे लागतात. या प्रदक्षिणेत आतील तटबंदीतील बुरुजांची भव्यता लक्षात येते. पुन्हा विद्यालयाच्या समोर आल्यावर विद्यालयाच्या इमारतीसाठी दोन बुरुजांमधील तटबंदी पाडलेली दिसते. यातील डाव्या बाजूचा बुरुज आणि विद्यालयाची इमारत यांच्या मधून जाणार्‍या वाटेने पुढे जावे. तेथे एक भव्य प्रवेशव्दार आपले स्वागत करते. प्रवेशव्दाराचा लाकडी दरवाजा अजून शाबूत आहे. या ठिकाणी उतराभिमुख दुहेरी दरवाजा आहे. हा दरवाजा बाहेरुन बंद असल्याने आपण किल्ल्याच्या आतून दरवाजात प्रवेश केलेला असतो. दरवाजातून बाहेर पडल्यावर प्रवेशव्दारची भव्यता आपल्याला कळते. २० फ़ुटी उंच प्रवेशव्दाराच्या बाजूला दोन भक्कम बुरुज आहेत. प्रवेशव्दारच्या कमानीच्या बाजूला दगडात कोरलेली कमळे आहेत. प्रवेशव्दारावर आणि बुरुजांच्यावर वीटांनी केलेले १० फ़ुटी बांधकाम आहे. यात प्रवेशव्दारावर तीन आणि बाजूच्या बुरुजांवर प्रत्येकी ३ कमादार खिडक्या कोरलेल्या आहेत. प्रवेशव्दाराच्या उजव्या बाजूला दोन मजली दालन होते. त्यातील वरच्या मजल्यावर रंगमहाल होता. आता तळ मजल्यावर शाळेचा वर्ग भरतो आणि दोन मजल्यांनधील स्लॅब नष्ट झाल्याने रंगमहालात जाता येत नाही. पण रंगमहालाच्या भिंतीत कोरलेले कमानदार कोनाडे पाहायला मिळतात. आतील दरवाजाच्या काटकोनात बाहेरचा दरवाजा आहे. हा भव्य दरवाजा पूर्ण दगडी बांधणीचा असून त्याच्या बाजूच्या दोन्ही बुरुजांवर सुंदर मनोरे आहेत. दरवाजाचे संरक्षण करण्यासाठी समोर भिंत बांधलेली आहे. या दरवाजाच्या काटकोनात एक छोटा दरवाजा होता, पण आता तो बुजवून त्याठिकाणी शाळेची मुतारी बांधलेली आहे. दरवाजाच्या वर जाण्यासाठी तटबंदीत जीना आहे. जीन्याने तटबंदीवर जाऊन फ़ांजीवरुन किल्ल्याच्या आतल्या तटबंदीवरुन फ़िरता येते. दरवाजाच्या वरच्या बाजूस किल्ल्याच्या आत आणि बाहेर लक्ष ठेवण्यासाठी खोल्या आणि झरोके बनवलेले आहेत. दरवाजाच्या बाजूच्या बुरुजांवर असलेले मनोरे सुंदर आहेत. ८ दगडी खांबांवर या मनोर्‍यांचे छत तोललेले आहे. घुमटाकार छत वीटांनी बनवलेले असून त्याच्या छतावर आतल्या बाजूने चुन्यात फ़ुल कोरलेले आहे. दोन खांबांच्या मध्ये दगडी कमानी असून कमानीवर दोन बाजूला कमळ कोरलेले आहेत. मनोर्‍याला वाळ्याचे पडदे लावण्यासाठी बसवलेल्या कड्या आजही तेथे आहेत. मनोरे पाहून पुढे गेल्यावर ध्वजस्तंभ असलेला भव्य बुरुज आहे. फ़ांजी वरुन फ़िरतांना एके ठिकाणी तटबंदीत उतरण्यासाठी जीना आहे. तो तटबंदीतच दुसर्‍या बाजूने बाहेर पडतो. फ़ांजीवरुन फ़िरुन परत प्रवेशव्दाराशी आल्यावर आपली गडफ़ेरी पूर्ण होते. किल्ला पाहाण्यासाठी अर्धा तास लागतो.

गडावर पोहोचण्याच्या वाटा

मालेगाव शहर रस्त्याने सर्व शहरांशी जोडलेले आहे. नाशिकहून मालेगावला जाण्यासाठी भरपूर एसटी बसेस आहेत. एसटी स्थानकापासून १५ मिनिटावर शहरातच किल्ला आहे.

राहाण्याची सोय

मालेगावात राहाण्याची सोय आहे

जेवणाची सोय

मालेगावात जेवण्याची सोय आहे

पाण्याची सोय

मालेगावात पाण्याची सोय आहे.