प्राचिनकाळी छोट्या गलबतांमधून व्यापार चालत असे. अशी गलबते नदीतून खोलवर आत आणता येत. समुद्राच्या तुलनेत नदीचे पाणी स्थिर असल्यामुळे नदीच्या काठावरुन मालाची चढ उतार करणे सोपे जात असे. सावित्री नदी बाणकोट जवळ समुद्राला मिळते. या भागात नदीचे पात्र रुंद आहे. त्यामुळे प्राचिन काळी या नदीतून परदेशांशी व्यापार चालत असे. या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी बाणकोट व मंडणगड या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली होती.

Mandangad Fort, Mandangad Fort Trek, Mandangad Fort Trekking, ratnagiri

इतिहास

मंडणगड किल्ला राजा भोज याने बांधला असे म्हटले जाते. १६६१ साली हा किल्ला जसवंतराव दळवी या आदिलशहा सरदारच्या ताब्यात होता. शिवाजी राजे पन्हाळ्यात अडकुन पडले होते, तेव्हा याच दळवींनी विशाळगडाला वेढा दिला होता. उंबरखिंडीत कारतलबखानाचा पराभव केल्यावर महाराज दाभोळकडे निघाले. वाटेत मंडणगड किल्ला होता. शिवाजी महाराज येत आहेत हे समजताच जसवंतराव दळवींची तारांबळ उडाली व मंडणगड व आपली जहागिरी सोडून तो शृंगारपूरला पळून गेला. महाराजांना न लढताच हा किल्ला मिळाला. काही काळ हा किल्ला सिध्दी व नंतर आंग्य्रांकडे होता. १८१८ साली इंग्रजांनी तो जिंकला.

गडावरील पहाण्याची ठिकाणे

मंडणगड किल्ला दोन शिखरांचा आहे. उजव्याबाजूकडील थोड्याश्या उंच शिखरावर फक्त एक पाण्याच टाक पहाता येते. बाकी रान माजलेले आहे. डाव्या बाजूकडील काहीशा सपाट शिखरावर किल्ला आहे. किल्ल्याचे प्रवेशद्वार अस्तित्वात नाही, पण त्याच्या बाजूचे बुरुज अजून उभे आहेत. गडावर दोन पाण्याचे तलाव आहेत. गडाची तटबंदी काही ठिकाणी शाबूत आहे. गडावर गणेशाचे जिर्णोध्दारीत मंदिर आहे. गडावरुन सावित्री नदीचे पात्र, रायगड, व वरंधा घाट स्वच्छ वातावरणात दिसू शकतात.

गडावर पोहोचण्याच्या वाटा

मंडणगड हे तालुक्याचे ठिकाण किल्ल्यापासून २ किमी वर आहे. मुंबई - गोवा महामार्गावर महाडच्या अलिकडील "टोल" नावाचा फाटा आहे.(टोल नाका नव्हे.) या फाट्यावरुन आंबेत - म्हाप्रळ मार्गे मंडणगडला जाता येते. मंडणगड गावातून २ किमी वर किल्ल्याच्या पायथ्याशी धनगरवाडी आहे, तेथपर्यंत गाडी जाते. धनगरवाडीतून २० मिनीटात गडावर जाता येते.

राहाण्याची सोय

गडावर गणेश मंदिरात रहाण्याची सोय आहे.

जेवणाची सोय

जेवणाची सोय नाही, स्वत: करावी.

पाण्याची सोय

गडावर पाण्याची सोय आहे.

जाण्यासाठी लागणारा वेळ

धनगरवाडीतून २० मिनीटात गडावर जाता येते.

सूचना: मंडणगड पाहून १२ किमी वरील बाणकोट किल्ला एका दिवसात पाहून ‘‘कासवाच्या गावात’’ वेळासला मुक्कामाला जाता येते.