सह्याद्रीतल्या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी अनेक किल्ले बांधले गेले. त्यापैकी मंगळगड उर्फ कांगोरी गड जावळीच्या खोर्‍यातील एका उंच पहाडावर बांधण्यात आला. महाबळेश्वर, मकरंदगड, मंगळगड, चंद्रगड, प्रतापगड, कावळा किल्ला व पारघाटाचे प्रचंड पहाड यांच्या दाटीत जावळीच खोर वसलेल आहे. हा भाग उंच पहाड, घनदाट जंगल व खोल दर्‍यांनी नटलेला आहे. या जावळीच्या खोर्‍यावर मोरे घराण्याने पिढ्यान पिढ्या राज्य केल त्यांना ‘‘चंद्रराव’’ हा किताब मिळाला होता.

Mangalgad Fort, Mangalgad Fort Trek, Mangalgad Fort Trekking, Raigad

सावित्री नदीकाठी वसलेल्या महाड शहरातून परदेशांशी व्यापार चालत असे. महाडात उतरलेला माल अनेक घाटमार्गांनी घाटमाथ्यावरील बाजारपेठांत जात असे. ह्या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी घाटमार्गाच्या पश्चिमेस कोकण किनारपट्टीवर व घाटमाथ्यावर अनेक किल्ले बांधण्यात आले. कांगोरी उर्फ मंगळगड हा किल्ला जावळीच्या खोर्‍यातील भोप घाट, वरंध घाट व अस्वल खिंड यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी व व्यापारी मार्गाचे संरक्षण करण्यासाठी बांधण्यात आला.

इतिहास

कांगोरी गड चंद्रराव मोर्‍यांनी जावळीच्या खोर्‍यात बांधला. त्याचा उपयोग घाटमार्गाच्या संरक्षणासाठी व टेहाळणीसाठी केला गेला. १५ जानेवारी १६५६ रोजी शिवाजी महाराजांनी जय्यत तयारीनीशी जावळीवर हल्ला केला व जावळी ताब्यात घेतली. त्याबरोबर कांगोरी गड, ढवळगड, रायरी इत्यादी किल्लेही महाराजांच्या ताब्यात आले. मुरारबाजी सारखा कसलेला योध्दा मिळाला. कांगोरीगडाची डागडूजी करुन त्याचे नाव बदलून ‘‘मंगळगड’’ ठेवले. स्वराज्यांची राजधानी रायगडच्या जवळ असल्यामुळे याचा उपयोग राजकीय गुन्हेगारांना तुरुंगवासात ठेवण्यासाठी केला गेला. संभाजी महाराजांचा वध केल्यावर औरंगजेबाने इतकादरखान उर्फ जुल्फीकारखानास रायगड घेण्यास सांगितले. रायगडची नाकेबंदी करण्यासाठी मार्च १६८९ मध्ये खानाने आजूबाजूचे किल्ले व प्रदेश ताब्यात घेतला. त्यावेळी मंगळगड मोघलांच्या ताब्यात गेला. इ.स १६९० मध्ये छ. राजाराम महाराजांचे अमात्य रामचंद्रपंत यांनी ‘मंगळगड’ जिंकून घेतला. इ.स १८१७ मध्ये सरदार बापू गोखल्यांनी मद्रास रेजीमेंट मधील कर्नल हंटर व मॉरीसन या इंग्रज अधिकार्‍यांना अटक करुन मंगळगडावर तुरुंगवासात ठेवले होते. इ.स १८१८ मध्ये कनेल पॉथर या इंग्रजाने हा किल्ला जिंकला.

गडावरील पहाण्याची ठिकाणे

पूर्वपश्चिम लांबी १४८५ फूट व दक्षिण-उत्तर रुंदी २६४ फूट असलेल्या मंगळगडाचे प्रवेशद्वार अस्तित्वात नाही. प्रवेशद्वाराबाजूचे भग्न बुरुज आणि तटबंदी मात्र अजुन शाबूत आहेत. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर उजव्या बाजूची वाट बालेकिल्ल्याकडे जाते व डाव्या बाजूची वाट पूर्वपश्चिम पसरलेल्या माचीवर जाते. माचीवर कांगोरी देवीचे मंदीर आहे. मंदीराकडे जाताना उजव्या हाताला दगडात खोदून काढलेल पाण्याच टाक लागत. या टाक्यात उतरण्यासाठी दगडात खोदून काढलेल्या पायर्‍या आहेत.

डाव्या हाताला दगडात कोरलेल पण आता बुजलेले टाक दिसत. या टाक्याजवळ किल्ल्यावर सापडलेल्या अनेक मुर्ती ठेवलेल्या आहेत. कांगोरी देवीचे मंदिर दगडी जोत्यावर बांधलेले आहे. १० पायर्‍या चढून मंदिरात गेल्यावर प्रवेशद्वाराची विटांनी बनवलेली अर्धवर्तुळाकार कमान दिसते. देवळावरील मुळ छत काळाच्या ओघात नष्ट झालेल आहे. गाभार्‍यात भैरवाची व कांगोरी देवीची अशा दोन दगडी मूर्त्या आहेत. मंदीराच्या गाभार्‍याबाहेर भिंतीला टेकून दगडी भग्न मूर्त्या ठेवलेल्या आहेत.

मंदिराच्या मागील बाजूस गेल्यावर आपण अरुंद होत जाणार्‍या माचीच्या टोकावर पोहचतो. या माचीला दोनही बाजूंनी तटबंदी बांधून काढलेली आहे. माचीच्या टोकावर विस्तिर्ण अर्धगोलाकार बुरुज व ध्वजस्तंभ आहे. माचीच्या या टोकावरुन विस्तिर्ण प्रदेश दृष्टीक्षेपात येतो.

माचीवरुन बालेकिल्ल्याकडे जाताना कड्याच्या टोकाला एक अरुंद पाण्याचे टाक दिसत. बालेकिल्ल्यावर पाण्याच विस्तिर्ण टाक आहे. तेथून वर चढून गेल्यावर दोन वाड्यांचे अवशेष दिसतात. त्यातील एका वाड्याच दगडी जोत फक्त शिल्लक आहे, दुसर्‍या वाड्याच्या पडक्या भिंतीही शाबूत आहेत. वाड्याच्या मागील वाट आपल्याला पश्चिम टोकावरील बुरुजावर घेऊन जाते. किल्ला चढताना किल्ल्याचे नाक सतत दिसत असते. त्या नाकावर आपण पोहचलेलो असतो. बालेकिल्ल्याला फेरी मारतांना अजून दोन पाण्याची टाक दिसतात. यात बारमाही रुचकर पाणी असते. बालेकिल्ला उतरुन माचीवरील प्रवेशद्वारापाशी आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते.

गडावर पोहोचण्याच्या वाटा

१) ठाण्याहून रात्री सुटणार्‍या पिंपळवाडी बसने दुधाणेवाडी/कांगोरीगड या बस थांब्यावर उतरावे. बस थांब्यावरच कांगोरी सिध्देश्वराचे मंदिर आहे. मंदिराला लागूनच टेकडी आहे. मंदिरामागून शेताच्या बांधावरुन जाणारी वाट आपल्याला टेकडीच्या माथ्यावर अर्धा/पाऊण तासात घेऊन जाते. (टेकडीवर जाताना जेथे वाटेला २ फाटे फुटतात तेथे उजव्याबाजूची वाट पकडून टेकडीच्या माथ्यावर जावे. (डाव्या बाजूला जाणारी वाट मोठी (ठळक) आहे. परंतू ती डाव्या हाताला दूर दिसणार्‍या घराकडे जाते.) टेकडीच्या माथ्यावर विस्तिर्ण पठार आहे. हा झाला पहिला टप्पा. इथून डाव्या हाताला गडावर कांगोरी देवीचे मंदीर व समोर पश्चिम टोकावरील बुरुज दिसतो. त्या बुरुजाकडे तोंड करुन सरळ चढत जाणार्‍या वाटेने चालत गेल्यावर मध्ये छोटासा दगडांचा टप्पा(रॉक पॅच) पार करावा लागतो. तो चढून गेल्यावर आपण दुसर्‍या टप्प्यावर येतो. इथून डावीकडे जाणारी वाट आपल्याला गडाच्या प्रवेशद्वारापर्यंत घेऊन जाते. या टप्प्यावर उभा चढ चढावा लागतो.

२) दुधाणेवाडीतील कांगोरीसिध्देश्वराच्या मंदिरा समोरुन एक वाट पायर्‍या पायर्‍यांनी बनवलेल्या शेतातून टेकडीवर जाते. टेकडीच्या माथ्यावर कमी वेळात या वाटेने जाता येते. परंतु या या वाटेने टेकडीवर जाताना उभा चढ चढावा लागतो. त्यामुळे पहिल्या टप्प्यातच खुप दमछाक होते या वाटेचा उपयोग टेकडी उतरताना करावा.

मुंबई, ठाण्याहून पिंपळवाडीला जाण्यासाठी थेट बस न मिळाल्यास महाड बस स्थानकातून बीरवाडीला जावे. तेथून बीरवाडी -पिंपळवाडी बस दर दोन तासांनी आहे. तसेच बीरवाडीतून माणशी रुपये २०/- दराने जीप किंवा १० आसनी रिक्षा दुधाणेवाडीत जाण्यासाठी मिळतात.

राहाण्याची सोय

पावसाळा सोडून इतर ऋतुत १० जणांची देवळात रहाण्याची सोय होऊ शकते.

जेवणाची सोय

जेवणाची सोय गडावर नाही, स्वत: करावी.

पाण्याची सोय

बारामाही पाण्याची सोय आहे.

जाण्यासाठी लागणारा वेळ

किल्ल्यावर जाण्यास दुधाणेवाडीतून २ तास लागतात.