चिपळूण तालुक्यातील मांडकी गावाच्या मागील डोंगरावर असलेला माणिकदूर्ग लोकांच्या विस्मृतीत गेला होता. पुण्याचे इतिहास संशोधक सचिन जोशी यांनी केलेल्या संशोधनामुळे हा गड प्रकाशात आला. प्राचिन काळी पालशेत बंदरात उतरलेला माल घाटमार्गांनी कर्‍हाडच्या बाजारपेठेत जात असे. या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी माणिकदूर्गाची योजना करण्यात आली होती. माणिकगडाला दुर्गेचा डोंगर या नावानेही ओळखले जाते.

Manikdurg Fort, Manikdurg Fort Trek, Manikdurg Fort Trekking, Ratnagiri

इतिहास

विजयनगर साम्राज्यात माणिकदूर्ग किल्ला होता. पवार नामक व्यक्तीच्या ताब्यात हा किल्ला होता. पालशेत बंदरात उतरलेला माल विविध घाटमार्गाने कर्‍हाडच्या बाजारपेठेत जात असे. या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी नवतेदूर्ग, कासारदूर्ग, माणिकदूर्ग, भैरवगड इ. किल्ल्यांची मालिका होती. आदिलशहाने विजयनगरचे साम्राज्य जिंकल्यावर हे किल्ले त्याच्या ताब्यात गेले. हे किल्ले त्याने पाडले; यामुळे आज हे किल्ले इतिहासात जमा झाले आहेत.

गडावरील पहाण्याची ठिकाणे

मांडकी गावामागील गर्द झाडी असलेल्या डोंगरावर माणिकदूर्गचे अवशेष विखुरलेले आहेत. किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजवीकडे गेल्यावर किल्ल्याच्या टोकावर सुकाई देवीचे मंदिर आहे. या मंदिराकडे जाताना ठिकठिकाणी झाडांच्या बुंध्यात अडकलेले व गवतात लपलेले किल्ल्याच्या तटबंदीचे अवशेष दिसतात. सुकाई देवी मंदिराच्या मागिल बाजूस एक गोलाकार उंचवटा दिसतो. तेथे गाडला गेलेला बुरुज असण्याची शक्यता आहे. या बुरुजाला वळसा घालून किल्ला उजवीकडे ठेवत अवघड वाटेने काही अंतर गेल्यावर ५ लेणी पाहायला मिळतात. तिथून परत किल्ल्यात प्रवेश केला त्या ठिकाणी येऊन डावीकडे गेल्यावर (किल्ल्यावरील सुकाई देवीचे मंदिराच्या विरूध्द बाजूच्या) टोकावर पाण्याची २ टाक आहेत. त्यापैकी एका टाक्यावर यक्ष प्रतिमा कोरलेल्या आहेत. याशिवाय गडावरच्या गर्द झाडीत विविध प्रकारचे पक्षी व फुलपाखर पाहायला मिळतात.

गडावर पोहोचण्याच्या वाटा

चिपळूण - सावर्डे - मांडकी - माणिकदूर्ग हे अंतर २७ किमी आहे. मुंबई - गोवा मार्गावरील सावर्डे गावातून उजव्या हाताचा रस्ता सावर्डे रेल्वे स्टेशनला व मांडकी गावाकडे जातो. सावर्डे - मांडकी अंतर ७ किमी आहे. तर सावर्डे रेल्वे स्टेशन - मांडकी हे अंतर २ किमी आहे. मांडकी गावाच्या आंबा स्टॉपवरुन डाव्या हाताचा रस्ता मांडकी दूर्गवाडीतून माणिकदूर्ग गडाच्या पायथ्याशी जातो. माणिकदूर्गच्या पायथ्याशी असलेला पहिला चढाचा टप्पा उजाड आहे. हा पार केला की, वाट दाट झाडीत शिरते. उजव्याबाजूची वाट पकडून अर्ध्यातासात गडाच्या माथ्यावर जाता येते. गडाच्या माथ्यावरील सपाटीवर आल्यावर, परत उजव्याबाजूची वाट पकडून सुकाई देवी मंदिराकडे जाता येते.

राहाण्याची सोय

गडावर रहाण्याची सोय नाही.

जेवणाची सोय

गडावर जेवणाची सोय नाही.

पाण्याची सोय

गडावर पाण्याची सोय नाही.

जाण्यासाठी लागणारा वेळ

मांडकी दूर्गवाडीतून गडावर जाण्यासाठी १ तास लागतो.

सूचना: गडावर गर्द झाडी व गवत माजलेले असल्यामुळे गावातून वाटाड्या घेऊन गेल्यास किल्ला लवकर पाहून होतो.