खंडाळा - लोणावळा घाट परिसर प्रसिध्द आहे तेथील वातावरणामुळे, पावसाळ्यात येथे पर्यटकांची झुंबड उडालेली असते. भुशी डॅम हा येथील सर्वात प्रसिध्द स्थळ. या भुशी धरणाकडे जातांना उजवीकडे एक दरी लागते, याला ‘टायगर व्हॅली’ असे म्हणतात. या ‘टायगर व्हॅली’ मध्ये एक अनोखे दुर्गरत्न आहे. त्याचे नाव ‘मृगगड.’ पण इथे जाण्यासाठी ‘बोरघाटा’ च्या अलीकडे असलेल्या खोपोलीच्या जवळून वाट आहे.
Mrugagad Fort, Mrugagad Fort Trek, Mrugagad Fort Trekking, Raigad
पहाण्याची ठिकाणे
किल्ल्यावर जातांना खोबण्यांच्या बाजूला एक छोटीशी गुहा आहे. तिथ पर्यंत जरा सांभाळून जावे लागते. मृगगडाचा माथा फारच लहान आहे. चढून गेल्यावर समोरच सपाटी सारखा भाग आहे. यावर पाण्याची टाकी आहेत. एक छोटेसे तळे ही आहे. एक दोन टाकी मातीच्या ढिगार्यामुळे गाडली गेलेली आहेत. समोरच टेकाडासारखा भाग दिसतो. यावर चढून गेल्यावर पाण्याची टाकी दिसतात. काही वाड्यांचे अवशेष दिसतात. या गडाचा उपयोग केवळ चौकी पहार्यासाठी होत असावा. स्थान एकदम मोक्याचे याच्या एका बाजूला उंबरखिंड तर एका बाजूला वाघदरी, असा सर्व परिसर येथून दिसतो. संपूर्ण किल्ला फिरायला १ तास लागतो.
पोहोचण्याच्या वाटा
मृगगडावर जाण्यासाठी खोपोलीला जायचे. पाली - खोपोली रस्त्यावर खोपोली पासून २० किमी वर परळी नावाचे गाव आहे. या ‘परळी’ गावातून सहा आसनी रिक्षेने ‘भेलिव’ नावाच्या गावात जायचे. भेलीव हेच पायथ्याचे गाव आहे. स्थानिक लोक या किल्ल्याला ‘भेलिवचा किल्ला’ असेही म्हणतात. भेलीव गावाच्याच मागे तीन सुळक्यांसारखे डोंगर दिसतात. त्यापैकी मधला डोंगर म्हणजे मृगगड. गावाच्या मागून एक वाट किल्ल्यावर जाते. जाण्याची वाट जंगला मधून असल्याने उन्हाचा त्रास बिलकूल होत नाही. किल्ला आणि त्याच्या पुढे असणारा तिसरा डोंगर यांच्या मध्ये एक खिंड आहे. त्या खिंडी मधूनच वाट किल्ल्यावर जाते. वरती थोडी कातळचढाई असल्यामुळे जरा जपूनच चढावे लागते. भेलिवमधून किल्ल्यावर जाण्यास १ तास पुरतो.
राहाण्याची सोय
मृगगडावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय
जेवणाची सोय आपणं स्वत: करावी.
पाण्याची सोय
पिण्याच्या पाण्याची टाकी आहेत, मात्र गडावर उन्ह्याळ्यात पाणी नसते.
जाण्यासाठी लागणारा वेळ
भेलिवमार्गे १ तास लागतो.