महाराष्ट्राला मोठी सागर किनारपट्टी लाभलेली आहे. त्यामुळे या किनारपट्टीचे पूर्वी अनेक जलदुर्ग बांधले गेले. अश्या अनेक जलदुर्गांपैकी एक आहे जंजिरा. हा दुर्ग raigad जिल्ह्यातील मुरुड या गावी आहे. अतिशय सुंदर किनारपट्टीवर वसलेला हा मुरुड-जंजिरा किल्ला अभेद्य मानला जातो.

रायगड जिल्ह्याच्या पश्चिम किनाऱ्याला अरबी समुद्र ला लागून मुरुड नावाचे एक गाव आहे. मुरुडपासून सुमारे चार पाच किलोमीटर अंतरावर राजापुरी हे गाव आहे. या गावाच्या पश्चिमेला समुद्रातील एका बेटावर मुरुड-जंजिरा हा किल्ला आहे. या किल्ल्यावर जाण्यासाठी राजापुरीहून शिडाच्या होड्या सुटतात. गडावर मात्र राहण्याची किंवा खाण्या-पिण्याची सोय नाही.

Murud-Janjira Fort, Murud-Janjira Fort Trek, Murud-Janjira Fort Trekking, Raigad

इतिहास

जंजिरा या शब्दाचा अर्थ मुळी समुद्राने वेढलेला असा होतो. याचे बांधकाम ई.स. १५६७ ते १५७१ या काळात बुऱ्हाणखानणे केले होते. भक्कम बांधकाम, समुद्राने वेढलेला, किल्ल्याच्या तटावरील उत्तम प्रतीच्या तोफा यामुळे हा किल्ला सदैव अजिंक्य राहीला.

या तोफांमध्ये कलाल बांगडी नावाची एक विशेष मोठी आणि लांब पल्ल्याची तोफ होती. शिवाजीच्या काळात महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी हा जंजिरा शेवटपर्यंत अजेय राहिला.

जंजिरा हा शब्द अरबी भाषेतील जझीरा या शब्दावरुन आलेला आहे. जझीराचा अर्थ बेट असा होतो. पूर्वी राजपुरीला कोळी लोकांची वस्ती होती. त्यांना लुटारू आणि चाचे लोकांचा फार उपद्रव होई. त्यांना प्रतिबंध करण्यासाठी लाकडाचे ओंडके जमिनीत रोवून तटबंदी (मेढेकोट) तयार करण्यात आली होती. परंतु पिरमखान या निजामी सरदाराने दारूच्या व्यापाऱ्याचे सोंग करून तटबंदीच्या आत शिरला आणि आपल्या सैन्याच्या मदतीने सर्वांची कत्तल करून मेढेकोट ताब्यात घेतला. पिरमखानाच्या जागी नंतर बुर्हाणखानाची नेमणूक झाली ज्याने जंजिरा हा किल्ला उभारला.

त्यानंतर ई.स. १६१७ मध्ये सिद्धी अंबर याने बादशहाकडून जंजिरा किल्ल्याची जहागिरी प्राप्त केली. ह्यालाच जंजिरा संस्थानचा मूळ पुरुष मानतात. जंजिर्याचे सिद्धी यांचे मूळ अबिसीनियामध्ये असून, ते अतिशय शूर व दणकट होते. त्यांनी अखेरपर्यंत जंजिरा कोणाच्या हाती जाऊ दिला नाही. अनेक राजांनी जंजिरा जिंकण्याचे अविरत प्रयत्न केले परंतु कोणालाही त्यात यश मिळाले नाही.

रचना

मुरुड समुद्रकिनाऱ्यापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर हा किल्ला बांधण्यात आला आहे. त्याची तटबंदी ४० फुट उंच आहे व किल्ला बावीस एकर जमिनीवर पसरला आहे. किल्ल्याचे बुरुज गोलाकार असून अजूनही बुलंद स्थितीत आहेत. जंजिर्याचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेकडे आहे. त्याच्या आतील बाजूला एका वाघाने चारही पायात एक एक हत्ती पकडला आहे, तसेच शेपटीत व तोंडातही हत्ती पकडून ठेवले आहेत. किल्ल्यामध्ये प्रवेश करताच दरवाजावरील नगारखाना दिसतो. तिथे संगमरवरी दगडांवर अरबी भाषेत शिलालेख कोरलेले आहेत. पुढे पीर पंचायतन हे एक धार्मिक स्थळ आहे. किल्ल्याला सागराच्या दिशेनेही एक दरवाजा आहे. एकूण एकोणीस बुरूज किल्ल्याला आहेत आणि दोन बुरुजांमधील अंतर ९० फुटांपेक्षाही जास्त आहे. तटबंदीवर जाण्यासाठी थोड्या थोड्या अंतरावर पायर्या बांधलेल्या आहेत. तटबंदीतील प्रत्येक कमानी मध्ये तोफा ठेवलेल्या आहेत.

जंजिर्यावर जवळपास ५१४ तोफा असल्याचा उल्लेख सापडतो. प्रसिध्द अशा कलालबांगडी, लांडाकासम व चावरी या तोफा आजही जंजीऱ्यावर पाहायला मिळतात. उत्तरेकडील बुरुजांच्या दिशेला एक चोर दरवाजाही आहे.

प्रेक्षणीय स्थळे

किल्ल्याच्या मध्यभागी पाच माजली भव्य वाडा आहे. आज मात्र तो पडक्या अवस्थेत उभा आहे. परंतु आजही बघण्यालायक आहे. किल्ल्यामधील लोकांना पाणी पुरविण्यासाठी गोड्या पाण्याचे दोन मोठे तलाव बांधले होते ज्यांना आजही पाणी आहे.

किल्ल्यामध्यील लोकांसाठी तीन मोहल्ले वसविले होते ज्यातील दोन मोहल्ले मुसलमानांचे व एक इतरांसाठी होते. पूर्वी किल्ल्यामध्ये मोठी वस्ती होती जी राजाश्रय संपल्यानंतर तेथून उठून गेली.

जंजिर्याच्या तटबंदीवरुन विस्तृत पसरलेला अरबी समुद्र आणि कोकण किनारपट्टीचा मनोरम्य प्रदेश दिसतो. समुद्रात बांधलेला कांसा उर्फ पद्मदुर्ग व किनार्यावरील सामराजगड हेही आपण किल्ल्याच्या तटबंदीवरून पाहू शकतो. पद्मदुर्ग हा किल्ला संभाजी राजे यांनी जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी बांधला होता. परंतु शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज दोघांनाही हा किल्ला जिंकण्यात अपयश आले.

असा हा अजिंक्य किल्ला ३ एप्रिल, १९४८ रोजी ते राज्य भारतीय संघराज्यात विलीन झाला.