सह्याद्री पर्वताच्या उत्तर-दक्षिण रांगेची सुरुवात नाशिक जिल्ह्यातील बागलाणातून होते. उत्तरेकडून सुरू होणाऱ्या या सह्याद्रीच्या रांगेला सेलबारी किंवा डोलबारी रांग असे म्हणतात. सेलबारी रांगेवर मांगी-तुंगी सुळके, न्हावीगड, असे गड आहेत तर दुसऱ्या डोलबारी रांगेवर मुल्हेर, मोरागड, साल्हेर, हरगड, सालोटा हे गडकिल्ले आहेत. पश्चिमेकडील गुजरात मधील घनदाट जंगल असलेला डांगचा प्रदेश आणि महाराष्ट्रातील बागलाण विभाग यांच्या सीमेवर हे किल्ले वसलेले आहेत.

Nhavigad Fort, Nhavigad Fort Trek, Nhavigad Fort Trekking, Nashik

गडावरील पहाण्याची ठिकाणे

पाताळवाडीतून न्हावीगड दक्षिणोत्तर पसरलेला दिसतो. गडावर जाण्याची वाट गडाच्या उत्तर सोंडेवरून आहे. सोंडेच्या पायथ्याशी वाघदेवाच ठाण आहे. एका लाकडी पट्टीवर सूर्य,चंद्र,वाघ,नाग कोरलेले आहेत. बाजूला काही शीळा पडलेल्या आहेत.येथे काही भगवे झेंडे लावलेले आहेत. वाघदेवाच दर्शन घेउन उत्तरेच्या सोंडेवरून (दांडावरुन) चढायला सुरुवात केल्यावर साधारणत:१५ मिनिटात डावीकडे एकमेव झाडावर भगवा झेंडा लावलेला दिसतो. झाडा समोरील कातळावरसप्तश्रृंगीच देवीचे शिल्प कोरलेले आहे. या मंदिराच्या दोनही बाजूला बुजलेली पाण्याची टाकी आहेत. देवीचे मंदिर पाहून परत डोंगराच्या सोंडेवर येऊन चढायला सुरुवात केल्यावर आपण एका बुरुजाच्या खाली येतो. येथे वाट परत डावीकडे वळ्ते. या वाटेवर कातळात कोरलेली ४ पाण्याची टाकी आहेत.त्यापैकी एक खांब टाक आहे. पुढे ही वाट दोन उध्वस्त बुरुजांच्या मधील पायर्‍यांवरुन वर जाते. या ठिकाणी एकेकाळी दरवाजा असावा.आज तो अस्तित्वात नाही. बुरुजां मधून वर चढून आल्यावर वाट उजवी कडे वळ्ते. या वाटेवर पाण्याच २ खांबी टाक आहे , त्याच्या पुढे अजुन एक टाक आहे. ही वाट मघाशी आपण ज्या बुरुजा खालून आलो त्या बुरुजावर येते. बुरुजावरुन परत डोंगर सोंडेने थोडे चढून गेल्यावर गडावर जाणार्‍या पायर्‍या लागतात. या पायर्‍यांवर माती पडलेली असल्याने इथे जपून चढावे लागते. गडमाथ्यावर दरवाज्याचा मागमूसही नाही. किल्ल्याचा माथ्यावर प्रथम एक मोठे चौकोनी टाक लागत. त्याच्या पुढे उध्वस्त वाड्याचे अवशेष दिसतात. वाड्याच्या मागे पाण्याच अजून एक टाक आणि पुन्हा उध्वस्त घराचे काही अवशेष दिसतात. गडाच्या दक्षिणेला त्याचा सर्वोच्च माथा म्हणजे एक सुळका आहे. तो चढून जाण्यासाठी प्रस्तरारोहण आवश्यक आहे. या सुळक्यात एक नेढ आहे. या नेढ्या खाली एक पाण्याच कोरड टाक आहे. गडमाथा फिरण्यास अर्धा तास लागतो. गडावरुन पूर्वेला तांबोळ्या, मांगीतुंगी तर दक्षिणेला मुल्हेर, मोरागड, हरगड, साल्हेर आणि सालोटा हा परिसर दिसतो.

सूचना:
१) गडावर जाणासाठी शेवटच्या टप्प्यात असलेल्या पायर्‍या जपून चढाव्या लागतात.
२) पायर्‍यांवर माती साचल्याने घसरण्याची शक्यता आहे. बरोबर ३० फ़ुटी दोर बाळगल्यास उत्तम.

गडावर जाण्याच्या वाटा

वडाखेल मार्गे: न्हावीगडावर जाण्यासाठी ताहाराबाद मार्गे मांगीतुंगी गाव गाठावे. मांगीतुंगी गावातून १ तासाच्या चालीने वडाखेल गावात यावे. वडाखेलपर्यंत डांबरि रस्ता नाही. त्यामुळे पायीच त्रेधातिरपीट करावी लागते. वडालेखमधून पाताळवाडीकडे कूच करावे. पाताळवाडी हे पायथ्याचे गाव आहे. वडाखेल ते पाताळवाडी हे अंतर अर्ध्या तासाचे आहे. पाताळवाडीतून एक सरळ वाट किल्ल्याच्या पठारावर गेलेली आहे. या पठारावरून दोन वाटा फुटतात . एक वाट समोर नाकाडावरून वर चढते. ही वाट थोडी कठीण आहे. वाटेने वर चढताना सोप प्रस्तरारोहण करावे लागते. वाटेने वर चढल्यावर आपण पायऱ्यांशी पोहोचतो दुसरी वाट पठारावरून डावीकडे वळसा घालून पायऱ्यापाशी जाते. या वाटेला पाण्याची दोन-तीन टाकी लागतात. गडावर जाणाऱ्या पायऱ्या मात्र जपूनच चढाव्या लागतात. पायऱ्यावर माती साचल्याने घसरण्याची शक्यता फार आहे. पाताळवाडीपासून गडावर दीड तासात पोहोचता येते.

राहाण्याची सोय

किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.

जेवणाची सोय

जेवणाची सोय आपण स्वत: करावी. पातळवाडी गावात जेवणाची सोय होते.

पाण्याची सोय

किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याचे टाके आहे.

जाण्यासाठी लागणारा वेळ

पाताळवाडी गावातून न्हावीगडावर जाण्यासाठी दीड तास लागतो.