नगर जिल्ह्यातील किल्ले म्हणजे रांगडे सौंदर्य . या किल्ल्र्यांची उंची खूप, चढायला कठीण आणि जाण्याचे मार्गही जरा कठीणच आहेत. इगतपुरीच्या जवळ असणारे अलंग, मलंग, कुलंग, कळसुबाई खुप प्रसिध्द किल्ले आहेत. पण याच डोंगररांगेत घोटी - संगमेश्वर मार्गावर एक छोटासा किल्ला आहे. त्याचे नाव ‘ पाबरगड’ आहे. हा किल्ला छोटासाच पण रांगडागडी, आपले दंड थोपटून उभा आहे. पाबरगडाच्या समोर भंडारदर्याचा अथांग जलाशय पसरलेला आहे.
Pabargad Fort, Pabargad Fort Trek, Pabargad Fort Trekking, Ahamadnagar
गडावरील पहाण्याची ठिकाणे
किल्ल्याच्या माचीवर जाणार्या वाटेने १५ मिनिटे चढल्यावर एक कातळकडा लागतो. येथून वर किल्ल्याच्या माथ्यावर जाणारी एक वाट आहे, तर दुसरी वाट कड्या लगतच पुढे सरकते. इथेच कड्यात खोदलेली गुहा आहे. या गुहेत १५ लोकांची रहाण्याची व्यवस्था होते. याच्या पुढील एका गुहेत पिण्याच्या पाण्याचे टाकं आहे. यातील पाणी वरवर खराब दिसले तरी पाण्याचा वरचा थर बाजूला केला की, आत सुंदर, सुमधुर पाणी आहे. हे सर्व पाहून कड्याच्यावर जाणार्या वाटेपाशी परतायचे आणि किल्ल्याच्या पठारावर पोहोचायचे. पठारावर तीन पाण्याची टाकं आहेत. त्र्यांच्या समोर शिवलींग आहे टाक्यातील पाणी खराब आहे. पठारावरुन बालेकिल्ला डावीकडे ठेवत, एक वाट किल्ल्याच्या माचीसारख्या दिसणार्या दुसर्या भागावर जाते. इथे जाताना वाटेत एक मोठे पाण्याचे टाकं आहे. या टाक्याच्या कड्यात हनुमानाची मोठी मूर्ती कोरलेली आहे. ती पाहून पूढे गेल्यावर थोड्या वेळात पून्हा एक खिंड लागते, पण या खिंडीमधून पलिकडे उतरायची वाट नाही आहे. समोरच्या ङोंगरावर एक दोन पडक्या घरांचे अवशेष दिसतात आणि एक पिण्याच्या पाण्याचे भले मोठे टाक आहे; पण या टाक्यात पाणी मात्र नाही आहे. किल्ल्याच्या माथ्यावर चढण्यासाठी कातळात खोदलेल्या पायर्या आहेत. त्या पायर्र्यांनी गडमाथ्यावर पोहोचताच एक उंचवटा दिसतो. त्याच्या पायाशी पाण्याची ४ खोदीव टाकी आहेत. त्यात पिण्यायोग्य पाणी आहे. टाक्र्यांना लागून भैरोबाचे मंदीर आहे. त्यात भैरोबाचा तांदळा व गणेशाची मूर्ती आहे. किल्ल्यावरुन पट्टा, रतनगड, अलंग, मदन, कुलंग हे किल्ले आणि कळसुबाईचा डोंगर दिसतो.
गडावर पोहोचण्याच्या वाटा
भंडारदरा - संगमनेर मार्गावर ‘ पाबरगड’ आहे. त्यामुळे इगतपूरी किंवा घोटीहून संगमनेर, अकोले किंवा पुणे अशी कोणतीही बस पकडून पाबरगडाच्या पाठच्या गुहीरे गावात उतरता येते. पण या गडाचे वैशिष्ट्ये म्हणजे गावातून गड दिसत नाही. किल्ल्याच्या समोर मोठा डोंगर असल्यामुळे गुहीरे गावाच्या वर असणार्या पठारावर पोहोचल्यावरच गडाचे दर्शन होते. गुहीरे गावातील हनुमान मंदीराच्या मागून एक वाट गडावर जाते. वाटेतच एका पाण्याची आधुनिक टाकी लागते. तिच्या जवळून वाट डोंगरावर चढते. पुढे आपण एका कातळ कड्यापाशी येतो, त्याला उजवीकडे ठेऊन वर जाता येते. कातळकड्याच्या वर पोहोचल्यावर थोडी सपाटी लागते. या सपाटीवर बरीच झाडे आहेत. पावसाळ्यात येथील वातावरण मंत्रमुग्ध करुन टाकणारे असते. या पठारावरुन किल्ल्याचे लपलेले टोक दिसते. किल्ल्याच्या समोर असणार्या डोंगराची एक सोंड या पठारावर आलेली दिसते. या सोंडेवरुन चढायला सुरुवात केल्यावर अर्ध्या तासात वाट उजवीकडे वळते आणि कडा डावीकडे ठेऊन किल्ल्याच्या दिशेने सरळ पुढे जाते. वीस मिनिटात आपण किल्ला आणि समोरच्या डोंगराची खिंड यामध्ये येऊन पोहोचतो. येथेच वर असलेला छोटासा कातळकडा चढून गेल्यावर आपण किल्ल्याच्या माचीवर (पठारावर) पोहचतो.
राहाण्याची सोय
किल्ल्यावरील गुहेत रहाण्याची सोय होऊ शकते.
जेवणाची सोय
जेवणाची सोय आपण करावी.
पाण्याची सोय
किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याचे बारामही टाक आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ
गुहीरे गावातून ३ तास लागतात.