मुरूडच्या सागर किना-यावरून पश्चिमेला समुद्रात एक किल्ला दिसतो तोच पद्मदुर्ग उर्फ कासा किल्ला. मुरुड जंजिरा पहाण्यासाठी आलेले पर्यटक सहसा पद्मदुर्ग पहाण्यासाठी जात नाहीत, कारण जंजी-याला जाण्यासाठी ज्याप्रमाणे बोटी सहज उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे पद्मदुर्ग ला जाण्यासाठी बोटी सहज मिळत नाहीत. त्यासाठी मुरुडहून खाजगी होडी करून या किल्ल्यावर जावे लागते.

Padmadurga-Casa Fort, Padmadurga-Casa Fort Trek, Padmadurga-Casa Fort Trekking, Raigad

छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला आजही सुस्थितीत उभा आहे. शिवरायांच्या शब्दात सांगायचे तर ” पद्मदुर्ग वसवून राजापूरीच्या (जंजिरा) उरावरी दुसरी राजापूरी किली आहे”. असा हा सुंदर किल्ला एकदा तरी वाकडी वाट करून पहावा असा आहे.

इतिहास

जंजी-याच्या सिद्धीचा कोकण पट्टीला उपद्रव होत होता. त्याला आळा घालणे आवश्यक होते. त्यासाठी शिवरायांनी मुरुडजवळ सामराजगड बांधून सिद्धीच्या जमिनीवरील हालचालींवर नियंत्रण आणले. तर सिद्दीच्या समुद्रावरील हालचालींना जरब बसविण्यासाठी महाराजांनी मुरुडजवळ समुद्रात असलेल्या कासा बेटावर किल्ला बांधायचा निर्णय घेतला. त्याचबरोबर पाथरवट, गवंडी, लोहार, सुतार यांची रवानगी कासा बेटावर करण्यात आली.

हि बातमी कळल्यावर तो अस्वस्थ झाला, कारण या किल्यामुळे त्याच्या समुद्रातील हालचालींवर मर्यादा येणार होत्या. त्याने आरमार घेऊन चढाईची तयारी केली होती. परंतु महाराजांनी सिद्धीचा बंदोबस्त करण्यासाठी दर्यासारंग दौलतखानची आधीच नेमणूक केली होती. किल्याची रसद पुरविण्याचे काम प्रभावळीचे सुभेदार जिवाजी विनायक यांच्यावर सोपवली होती. या कामात हयगय झाल्याचे कळताच महाराजांनी १८ जानेवारी १६५७ ला जिवाजी विनायक यांना खरमरीत पत्र लिहून त्यांची कान उघडणी केली होती. शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी रात्र दिवस एक करून सिद्धीशी लढत लढत किल्ल्याची उभारणी केली. पद्मदुर्ग चे पहिले हवालदार म्हणून शिवरायांनी सुभानजी मोहिते यांची निवड केली. इ.स. १६७६ मध्ये मोरोपंत पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली फौज देऊन महाराजांनी जंजी-याची मोहीम काढली या मोहिमेत मचव्यावरून तोफांचा मारा जंजी-या वर केला पण अपेक्षित परिणाम साधला नाही. मग मोरोपंत यांनी जंजी-याला शिड्या लावण्याची धाडसी योजना आखली. पद्म्दुर्गावर काम करणा-या अष्टगारातील सोनकोळ्याच्या प्रमुखाने लाय पाटलाने हे जबरदस्त आव्हान स्वीकारले. एका रात्री लाय पाटील आपल्या ८-१० सहका-यांसह पद्मदुर्ग मधून बाहेर पडले. अंधाराचा फायदा घेत जंजी-याच्या पिछाडीला जाऊन तटाला दोरखंडाच्या शिड्या लावल्या व मोरोपंतांच्या धारक-याची वाट पाहीत राहिला. पहाट फुटायची वेळ झाली तरी सैन्य आले नाही हा पाहून निराश मनाने लाय पाटलाने पद्मदुर्ग गाठला.

लाय पाटलांचे हे धाडस पाहून शिवाजी महाराजांनी त्यांना पालखीचा मान दिला. पण दर्यात फिरणार्‍या सोनकोळ्यांना पालखीचा काय उपयोग म्हणून लाय पाटलाने नम्रपणे पालखी नाकारली. यावरून महाराज काय ते समजले. त्यांनी मोरोपंताना एक नावे गलबत बांधून त्याचे नाव “पालखी” ठेवून लाय पाटलांच्या स्वाधीन करण्यास सांगितले. याशिवाय राजांनी लाय पाटलास छत्री, वस्त्रे, निशाण व दर्या किनारीची “सरपाटीलकी” दिली.

संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत पद्मदुर्ग स्वराज्यात होता. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही १६८० मध्ये हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात असल्याचा उल्लेख इंग्रजांच्या पत्रात आहे. त्यानंतर पद्मदुर्ग सिद्धीच्या ताब्यात गेला. मराठयांनी पेशवे काळात परत तो जिंकून घेतला.

पोहोचण्याच्या वाटा

मुरुड गाव संपल्यावर खाडी लागते. त्या खाडीत असलेल्या होडीवाल्र्‍यांशी बोलून पद्‌मदूर्गावर जाण्यासाठी खाजगी होडी ठरवावी लागते. मुरुडला जाऊन लगेच होडी मिळणे अशक्य आहे. त्यामुळे आदल्या दिवशी होडी ठरवून ठेवावी व सकाळीच बोटीचा २० मिनीटांचा प्रवास करुन पद्‌मदूर्गावर जावे.

अनेक लोकांचा असा गैरसमज आहे की, पद्‌मदूर्गाला जाण्यासाठी जंजिर्‍याला जाणार्‍याच होड्या जातात. पण येथे एक गोष्ट लक्षात ठेवावी, दंडाराजापूरीहून मुसलमान लोक आपल्या शिडांच्या होड्या घेऊन जंजिर्‍याला जातात, तर पद्‌मदूर्गावर मुरुडमधील हिंदू कोळी लोक इंजिनाच्या बोटीतून पद्‌मदूर्गावर घेऊन जातात. मुरुड मधील कोळी लोकांचा मुख्य व्यवसाय मासेमारी असल्यामुळे फावल्या वेळातच ते पद्‌मदूर्गला येण्यास तयार होतात व त्यासाठी भरपूर पैसेही घेतात. एका होडीतून साधारणत: २० माणसे जाऊ शकतात.

राहाण्याची सोय

गडावर रहाण्याची सोय नाही, मुरुडमध्ये आहे.

जेवणाची सोय

गडावर जेवणाची सोय नाही, मुरुडमध्ये आहे.

पाण्याची सोय

गडावर पाण्याची सोय नाही, मुरुडमध्ये आहे.

जाण्यासाठी लागणारा वेळ

मुरुडहून बोटीने अर्ध्यातासात पद्‌मदूर्गजवळ पोहचता येते.