अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात पळशी नदीच्या काठी पळशीचा भुईकोट किल्ला आहे. या किल्ल्यात असलेल्या होळकरांच्या वाड्यात लाकडावर केलेले अप्रतिम कोरीवकाम पहाण्यासारखे आहे. पळशी किल्ल्याबाहेर असलेले विठ्ठल मंदिरही अप्रतिम कोरीवकामाचा नमुना आहे.

Palashi Fort, Palashi Fort Trek, Palashi Fort Trekking, Ahamadnagar

खाजगी वहानाने एका दिवसात पळशीचा किल्ला, विठ्ठल मंदिर, त्याच बरोबर २५ किलोमीटर वरील टाळकी ढोकेश्वरची हिंदु (ब्राम्हणी) लेणी पाहाता येतात. टाकळी ढोकेश्वर पासून ३३ किमीवर असलेला जामगावचा किल्ला आणि तेथुन १२ किलोमीटरवर असलेले पारनेर येथील सिध्देश्वर मंदिर आणि तेथील निसर्गरम्य परिसर पाहाता येतो.

गडावरील पहाण्याची ठिकाणे

पळशीच्या भुईकोटाला १६ बुरुज आणि ४ दरवाजे आहेत. त्यातील २ दरवाजे मोठे असून दोन दरवाजे लहान आहेत. किल्ल्याच्या उत्तरेला आणि पूर्वेला असलेल्या मोठ्या दरवाजातून थेट गाडी घेऊन किल्ल्यात जाता येते. किल्ल्यात गाव वसलेले असल्याने किल्ल्याच्या उत्तर भागात पक्के रस्त बनवलेले आहेत. किल्ल्याचा उत्तर दरवाजा आणि त्याच्या बाजूचे भक्कम बुरुज आजही दिमाखाने उभे आहेत, गावकर्‍यांनी याला रंग लावून शोभा घालवलेली आहे. दरवाच्या दोन्ही बाजूला दोन शिलालेख कोरलेले आहेत. दरवाजातून किल्ल्यात जाता येते. किल्ल्यात शिरल्यावर चौफ़ेर वस्ती दिसते. या वस्तीतून महादेव मंदिराकडे चालत जाण्यास ५ मिनिटे लागतात. या मंदिराचे दगडी बांधकाम वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिराच्या मागच्या भिंतीवर हनुमान कोरलेला आहे. गाभार्‍या समोर मोठे कासव आहे. मंदिरासमोर एक वीरगळ आहे. मंदिर पाहून पुढे गेल्यावर उजव्या बाजूस एक गल्ली जाते या गल्लीत एक मोठा तोफ़गोळा पडलेला आहे. तेथेच दोन पुरातन दिपमाळा आहेत. तेथून पुढे गेल्यावर पळशीकरांचा वाडा आहे. पळशीकरांचे वंशज रामराव कृष्णराव पळशीकर यांच्या ताब्यात सध्या हा वाडा आहे. या वाड्याचा दरवाजा आणि त्याची चौकट यावर सुंदर कोरीवकाम केलेले आहे. या दरवाजातून आत शिरल्यावर एक बोळ लागतो. तो पार केल्यावर डाव्या बाजूला वाड्याचे दुसरे दार आहे. त्यातून आत गेल्यावर आपण वाड्याच्या चौकात प्रवेश करतो. वाड्यात सध्या दोन भाडेकरु राहातात. वाडा बांधला तेंव्हा दुमजली होता पण आज केवळ एकच मजला शिल्लक आहे. चौकात शिरल्यावर वाड्याच्या खांबांवर , हस्तांवर केलेले अप्रतिम नक्षीकाम पाहायला मिळते. वाड्याला तळघर आहे पण ते सध्या बंद केलेले आहे. चौकात मोरी असून त्यात एक दगडी पाट आहे. वाड्यात शिरल्यावर उजव्या बाजूला देवघर आहे. त्यात जुने टाक आणि मुर्ती आहेत. देवघरच्या बाजूला असलेल्या खोलीच्या चौकटीवर कोरीवकाम केलेले आहे. याच खोलीत वाड्यातील आड आहे. वाड्याच्या पहिल्या मजल्यावरील खांब पाम वृक्षा सारखे कोरलेले आहेत. वाड्याचा दुसरा मजला कोसळलेला असल्याने त्यावर पत्रे घातलेले आहेत. वाड्याची कुठल्यही प्रकारचे निगा न राखल्याने त्याची दुरावस्था झालेली आहे. वाडा पाहून बाहेर आल्यावर समोर एका दुमजली इमारतीचे अवषेश दिसतात. याठिकाणी दुसरा वाडा होता. या वाड्याच्या दोन भिंती कशाबशा उभ्या आहेत. त्या भिंतीतले कोनाडे पाहाण्यासारखे आहेत. या दोन वाड्यांच्या मधून एक वाट देवीच्या मंदिराकडे जाते. मंदिरात डोक्यावर नागाचा फ़णा असलेली, हातात चक्र, गदा घेतलेली आणि पायाशी हत्ती असलेली देवीची मुर्ती आहे.

देवीचे मंदिर पाहून पुन्हा महादेव मंदिराच्या चौकात येऊन मंदिराकडे पाठ करुन सरळ चालत जावे. याठिकाणी कच्चा रस्ता आहे. या रस्त्याने ५ मिनिटात आपण पूर्व दरवाजापाशी पोहोचतो. दरवाजाच्या दोन्ही बाजूस भक्कम बुरुज आहेत. दरवाजाच्या बाहेर थोड्या अंतरावर पळशी नदीचे अरुंद पात्र आहे. दरवाजावर चढून जाण्यासाठी पायर्‍या आहेत. दरवाजा वरून संपूर्ण किल्ला आणि आजूबाजूचा परीसर दिसतो.

पूर्व दरवाजातून बाहेर पडून नदीचे पात्र ओलांडून गेल्यावर आपण विठ्ठल मंदिरापाशी येते. मंदिराच्या बाहेर नदीपात्राला लागून पुष्कर्णी आहे. मंदिर तटबंदीच्या आत वसलेले आहे. मंदिराचे प्रवेशव्दार भव्य आहे. प्रवेशव्दारावर नगारखाना आहे. मंदिर नागर शैलीतले आहे. नदीच्या पात्राच्या पलिकडे शंकराचे मंदिर आहे.

किल्ला आणि मंदिर पाहाण्यासाठी एक तास लागतो.

गडावर पोहोचण्याच्या वाटा

कल्याण नगर रस्त्यावर टाकळी ढोकेश्वर गावातून एक रस्ता (अंतर २५ किमी) अंतरावरील पळशी गावाकडे जातो. कल्याण ते पळशीचा किल्ला हे अंतर १९१ किमी आहे. पळशीचा किल्ला रस्त्याला लागून आहे. पुणे - शिरुर - पारनेर - टाकळी ढोकेश्वर - पळशीचा किल्ला हे अंतर १३३ किलोमीटर आहे.

राहाण्याची सोय

किल्ल्यात राहाण्याची व्यवस्था नाही.

जेवणाची सोय

टाकळी ढोकेश्वरला जेवणाची व्यवस्था होते.

पाण्याची सोय

किल्ल्यात पाण्याची व्यवस्था नाही.