अर्जुना नदीच्या काठी वसलेले राजापूर हे प्राचीन काळापासून बंदर म्हणून प्रसिद्ध होते. घाटावरील बाजारपेठां मधून आलेला माल अणुस्कुरा घाटाने राजापूर बंदरात येत असे. तेथून बोटीने तो माल अरबस्त्तानात आणि भारतातील इतर बंदरात जात असे. इसवीसन १६४८ मध्ये आदिशहाच्या ताब्यात हा भाग होता. त्यावेळी इंग्रजांनी या ठिकाणी फॅक्टरी म्हणजेच वखार बांधली. या वखारीत असलेल्या मालाचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी याठिकाणी भरभक्कम किल्लाच बांधला. किल्ल्याप्रमाणे तटबंदी, बुरुज, खंदक बांधून, तोफानी वखार संरक्षणाच्या दृष्टीने सुसज्ज करण्यात आली होती. राजापूर शहरात आज या वखारीचे थोडेसेच अवशेष शिल्लक आहेत. वखारीत पोलिस वसाहत आहे.
Rajapur Fort, Rajapur Fort Trek, Rajapur Fort Trekking, Ratnagiri
गडावरील पहाण्याची ठिकाणे
राजापूरच्या जवाहर चौकात एसटीच्या गाड्या येतात. या चौकातून एक रस्ता धुतपापेश्वर मंदिराकडे जातो. या रस्त्यावर प्रथम अर्जुना नदीवर बांधलेला शिवकालीन पुल लागतो. पुल ओलांडल्यावर रस्ता नदीला समांतर जाउन चढायला लागतो. याच चढावर डाव्या बाजूला राजापूरच्या वखारीचे अवशेष आहेत. या परिसरात शिरल्यावर समोरच चिर्यात बांधलेल्या पडक्या वास्तूंचे अवशेष दिसतात. डाव्या बाजूला एक मजली इमारत आहे. पडक्या वास्तू आणि इमारती मधून एक पायऱ्याचा मार्ग नदीकडे उतरतो. या मार्गाने खाली उतरुन उजवीकडे चालत गेल्यावर किल्ल्याचा उजव्या टोकाचा बुरुज बाहेरुन पाहात येतो.पायऱ्या चढून परत वखारीत येउन इमारतीच्या उजव्या बाजूला गेल्यावर एक आयताकृती विहीर आहे. या विहिरीच्या बाजूला किल्ल्याचा दुसरा बुरुज आहे. वखारीच्या इतर भागात पोलिस वसाहत वसलेली असल्याने वखारीचे अवशेष नामशेष झालेले आहेत. राजापूरच्या वखारी बरोबर पुरातन धुतपापेश्वर मंदिर पाहाता येते.
गडावर पोहोचण्याच्या वाटा
राजापूर शहर रस्त्याने आणि रेल्वेने इतर शहरांशी जोडलेले आहे. राजापूर शहरातील जवाहर चौकातून एक रस्ता धुतपापेश्वर मंदिराकडे जातो. या रस्त्यावर प्रथम अर्जुना नदीवर बांधलेला शिवकालीन पुल लागतो. पुल ओलांडल्यावर रस्ता नदीला समांतर जाउन चढायला लागतो. याच चढावर डाव्या बाजूला राजापूरच्या वखारीचे अवशेष आहेत.
राहाण्याची सोय
राजापूर गावात राहाण्यासाठी हॉटेल्स आहेत.
जेवणाची सोय
राजापूर गावात जेवण्यासाठी हॉटेल्स आहेत.
पाण्याची सोय
किल्ल्यात पिण्याचे पाणी नाही.