राजधेर किल्ला Rajdher Fort – ३५५५ फुट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.

नाशिक जिल्ह्यात सह्याद्रीची एक रांग सुरगणा पासून चालू होते आणि चांदवडपर्यंत येऊन संपते. पुढे तीच मनमाडच्या जवळ असणाऱ्या अंकाईच्या पर्यंत जाते. याच रांगेला अजंठा-सातमाळ रांग म्हणतात. चांदवड तालुक्यात ४ किल्ले येतात. राजधोर, कोळधेर, इंद्राई आणि चांदवड.

Rajdher Fort, Rajdher Fort Trek, Rajdher Fort Trekking, Nashik

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

राजधेर किल्ल्यावर प्रवेश करतांना पहिल्या प्रवेशद्वाराच्या डावीकडच्या कमानीवर एक फारसीतील शिलालेख आहे. येथून गडमाथ्यावर जाण्यासाठी कातळात खोदलेल्या पायऱ्या लागतात. गडमाथ्यावर पोहचल्यावर समोरच दोन वाटा फुटतात एक डावीकडे जाणारी तर दुसरी उजवीकडे जाणारी. आपण उजवीकडची वाट पकडायची, थोडे पुढे गेल्यावर एक वाडा लागतो. आजही वाडा चांगल्या स्थितित उभा आहे. या वाड्याशिवाय येथे बघण्यासारखे काही नाही. परत फिरून आता डावीकडची वाट पकडायची. या वाटेवरून थोडे पुढे गेल्यावर एक कातळात खोदलेली गुहा लागते. या गुहेत उतरण्यासाठी एक शिडी लावलेली आहे. येथे सध्या एका बाबांचे वास्तव्य असते. गुहेच्या वरच्या भागावर एक घुमटाकार कमान असलेली विहिर आहे. येथून परत थोडे पुढे गेल्यावर आणखी एक गुहा लागते. या गुहे समोरून पुढे जाणारी वाट तलावापाशी घेऊन जाते. तलावाच्या काठावर एका गुहेत महादेवाचे मंदिर आहे. तलावाच्या कडेकडेने जाणाऱ्या वाटेने आपण डोंगरमाथ्यावर पोहोचतो. वाटेत अनेक भुयारी टाकी आढळतात. गडाच्या सर्वोच्च माथ्यावर एक तलाव आहे. गडमाथ्यावरून मांगी तुंगी, न्हावीगड, कोळधेर, इंद्राई, धोडप असा सर्व परिसर दिसतो. गडमाथा फिरण्यास २ तास पुरतात.

गडावर जाण्याच्या वाटा

राजधेरवाडी मार्गे: राजधेरवर जाण्यासाठी एकच मार्ग आहे. नाशिक किंवा मनमाड मार्गे चांदवड गाठावे. नाशिक पासून चांदवड ६४ कि.मी. वर आहे तर मनमाड पासून चांदवड २४ कि.मी. वर आहे. चांदवड मधून एस.टी. ने राजधेरवाडी गाठावी. राजधेरवाडी हे पायथ्याचे गाव आहे. राजधेरवाडीतून गडावर जाण्यास ठळक वाट आहे. गावातून किल्ल्यावर जातांना आपण एका कातळकड्यापाशी पोहचतो. येथून वर जाण्याच्या पायऱ्या तुटलेल्या आहेत. पण सध्या तिथे एक शिडी लावली असल्यामुळे आपण गडाच्या प्रवेशद्वारात पोहचू शकतो. अन्यथा प्रवेशद्वारा पर्यंत पोहचण्यासाठी प्रस्तरारोहण करावे लागते. राजधेरवाडीतून इथपर्यंत पोहचण्यास दीड तास लागतो.

किल्ल्यावर राहण्यासाठी गुहा आहे. यात १० लोकांची सोय होते. जेवणाची सोय आपण स्वतः करावी. किल्ल्यावर बारामही पिण्याचे पाण्याचे टाके आहे. गडावर जाण्यासाठी गावातून दीड तास लागतात.