छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदूर्ग किल्ला बांधल्यावर त्याचे रक्षण करण्यासाठी पद्मगड, राजकोट, सर्जेकोट हे किल्ले बांधले. मालवणच्या किनार्‍यावर उत्तरेकडे खडकाळ व काहीसा उंच भाग आहे. या मोकळ्या जागी राजकोटचा किल्ला बांधण्यात आला. राजकोट किल्ल्यामुळे सिंधुदूर्ग किल्ल्याचे जमिनीवरील हल्ल्यापासून संरक्षण करणे तसेच नैसर्गिक उंचवट्यामुळे सिंधुदूर्गाच्या उत्तरेकडील समुद्रावर लक्ष ठेवणे सहज शक्य झाले.

Rajkot Fort, Rajkot Fort Trek, Rajkot Fort Trekking, Sindhudurg

इतिहास

राजकोट किल्ल्याची उभारणी शिवाजी महाराजांनी इ.स १६६४ ते १६६७ च्या दरम्यान केली. सन १७६६ मध्ये इंग्रज व करवीरकर यांच्यात झालेल्या तहानुसार राजकोट किल्ल्यात इंग्रजांनी वखारीसाठी व मोठ्या जहाजांना उभे रहाण्यासाठी परवानगी मागितली होती. १८६२ मध्ये किल्ल्यात काही इमारतींचे अवशेष, तुटलेली तटबंदी व एक तोफ असल्याचा उल्लेख आहे.

गडावरील पहाण्याची ठिकाणे

तीन बाजूंनी पाणी(समुद्र) व एका बाजूला जमिन असलेल्या ह्या किल्ल्यावर एक बुरुज सोडल्यास कोणतेही अवशेष नाहीत. ह्या बुरुजावरुन सिंधुदूर्ग किल्ला व अजुबाजुचा परिसर दिसतो या बुरुजावर सध्या धोक्याची सुचना दाखवणारा बावट्याचा स्तंभ आहे.

रॉक गार्डन: राजकोटच्या आसपास असलेल्या खडकाळ भागात रॉक गार्डन बनवण्यात आले आहे. येथील खडकावर आपटून फूटणार्‍या लाटा पहातांना वेळेचे भान राहत नाही. येथून समुद्रात होणारा सूर्यास्त अप्रतिम दिसतो.

गणेश मंदिर: राजकोटहून मालवणला जाताना वाटेत सुवर्ण(सोन्याच्या) गणेशाचे मंदिर आहे.

मौनी महाराज मंदिर: शिवाजी महाराजांनी उभारलेले जांभ्या दगडातील मौनी महाराजांचे मंदिर मेढा राजकोट या भागात आहे.

गडावर पोहोचण्याच्या वाटा

१) मालवण जेट्टीवरुन किनार्‍याने उत्तरेकडे चालत गेल्यास राजकोटला जाता येते.

२) मालवण एस टी स्टँडवरुन सुटणार्‍या सर्व बसेस बाजारातून फिरुन जातात या बसेसनी वडाच्या पारावर उतरुन राजकोटला १० मिनीटात चालत जाता येते. सुवर्ण(सोन्याच्या) गणपती मंदिरापासून फुटणार्‍या डाव्या हाताचा रस्ता राजकोटला व उजव्या हाताचा रस्ता रॉक गार्डनला जातो.

राहाण्याची सोय

गडावर नाही, मालवणात रहायची सोय आहे.

जेवणाची सोय

गडावर नाही, मालवणात जेवणाची सोय आहे.

पाण्याची सोय

गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.