रवळ्या जवळ्या हे दोन जुळे किल्ले सातमाळ रांगेत आहेत. एका मोठ्या पठारावर असलेल्या या दोन डोंगरांना रवळ्या आणि जवळ्या ही नावे देण्यात आली.हे दोन्हीही किल्ले असून यातील रावळ्या किल्ला चढण्यास कठीण आहे. मुंबई - नाशिकहुन एका दिवसाच्या मुक्कामात हे दोन्ही किल्ले पाहून होतात.
Rawlya Fort, Rawlya Fort Trek, Rawlya Fort Trekking, Nashik
इतिहास
ऐतिहासिक कागद पत्रात रावळ्या जाबळ्याचा उल्लेख "रोला-जोला" म्हणुन येतो.१६३६ मध्ये हा किल्ला अलवर्दीखानाने बादशहा शहाजहानसाठी जिंकून घेतला.१६७० मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला. १६७१ मध्ये दिलेरखानाने या किल्ल्यांना वेढा घातला होता. तो मराठ्यांनी उधळून लावला. त्यानंतर महाबत खानाने हा किल्ला जिंकून घेतला. पेशवे काळात हा किल्ला पुन्हा स्वराज्यात आला.इसवी सन १८१८ मध्ये हा किल्ला ब्रिटीशांच्या ताब्यात गेला. कॅप्टन ब्रिग्जने १८१९ मध्ये रवळ्या किल्ल्याच्या पायर्या आणि तटबंदी तोफ़ा लावून उध्वस्त केल्या.
गडावरील पहाण्याची ठिकाणे
रवळ्या आणि जवळ्या हे किल्ले ज्या पठारावर आहेत. त्या पठारावर एक वस्ती आहे. तिला तिवारी वस्ती या नावाने ओळखले जाते. वस्ती मध्ये शिरण्यापूर्वीच एक वाट जंगलामधून डावीकडे रवळ्यावर जाते. वाट सहजच सापडणारी नाही. थोडीशी शोधावी लागते. पण एकदा सापडल्यावर १५ मिनिटांतच आपण एका घळी पाशी पोहोचतो. वाटेत उजवीकडे कड्यामध्ये एक गुहा आहे. या घळीतून "चिमणी क्लाईंब" करुन वरच्या झाडापाशी जायचे. या झाडाच्या समोरच रवळ्याचा तुटलेला कडा आहे. या कड्यावरुनच किल्ल्यावर जाण्याची वाट आहे. हा कडा चढण्यासाठी दोर असणे आवश्यक आहे. ज्याला गिर्यारोहणाचे तंत्र अवगत असेल तो सहजपणे रोप न लावता सुध्दा येथून चढू शकतो. वर गेल्यावर समोरच एक भगवा झेंडा आहे. रवळ्याच्या माथ्यावर काही अवशेष नाहीत. दुसर्या टोकाला पाण्याची सुकलेली टाकी आहेत. माथ्यावरुन मार्कंड्याचे सुंदर दर्शन होते. आभाळ स्वच्छ असल्यास अचला आणि अहिवंत सुध्दा दिसतो.
गडावर पोहोचण्याच्या वाटा
नाशिक वरुन वणी ४० किमी अंतरावर आहे. वणीहून एक रस्ता बाबापूर - मुळाणे मार्गे कळवणला जातो. या रस्त्यावर बाबापूर सोडले की ३ किमी अंतरावर एक खिंड लागते. या खिंडीत उतरायंच. येथून उजवीकडे जाणारा रस्ता रवळ्या - जवळ्याला घेऊन जातो. तर डावीकडचा रस्ता मार्कंड्यावर जातो. वणीहून खिंडीत एसटीने येण्यास अर्धा तास लागतो. खिंडीत उतरल्यावर उजवीकडच्या डोंगरसोंडेवरची वाट धरायची. वाट चांगली मळलेली असल्याने चुकण्याचा फारसा संभव नाही. अर्धातास चढून गेल्यावर वाट डावीकडे वळते आणि परत उजवीकडे वळून पठारावर जाते. खिंडीपासून पठारावर पोहोचण्यास १ तास लागतो. पठारावर पो्होचल्यावर समोरच रवळ्या किल्ला दिसतो. पण आपल्याला प्रथम रवळ्या आणि जवळ्याच्या खिंडी मध्ये जायचे आहे. पठारावरुन जवळ्याच्या पायथ्याला जाण्यास पाऊण तास लागतो. वाट थोडी पठारावरुन मग जंगलातून अशी जाते. पठारावर अनेक वाटा असल्यामुळे वाटा चुकण्याचा संभव आहे. लक्षात ठेवण्याची खूण म्हणजे रवळ्याचा डोंगर नेहमी आपल्या डाव्या हाताला असतो. मध्ये जंगल लागते ते पार केल्यावर आपण वस्ती पाशी येऊन पोहोचतो. पठारावर खिंडीमध्येच ही वस्ती आहे.
राहाण्याची सोय
पठारावरील वस्तीमधील घरात ४ ते ५ लोकांना रहाता येते किंवा उघड्यावर सुध्दा मुक्काम करता येतो.
जेवणाची सोय
गडावर जेवणाची सोय नाही, स्वत: करावी.
पाण्याची सोय
गडावर पाण्याची सोय आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ
बाबापूर मार्गे पठार २ तास, मुळाणे बारी मार्गे पठार २ तास लागतात.