सह्याद्रीच्या डोंगररांगेत भोर ते महाबळेश्वर असा एक सुरेख डोंगरमार्ग आहे. या डोंगररांगेत ३ ते ४ किल्ले आहेत. यापैकी एक रोहीड खोऱ्यात वसलेला किल्ला म्हणजेच ‘किल्ले रोहीड खोरे हे नीरा नदीच्या खोऱ्यात काही भागात वसलेले आहे. या खोऱ्यात ४२ गावे होती. त्यापैकी ४१ गावे सध्याच्या पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यात मोडतात. रोहीड किल्ला हे रोहीडा खोऱ्याचे प्रमुख ठिकाण होते. पुणे सातारा जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने, सहकारी दुधयोजना यामुळे येथील परिसरातील बहुतेक सर्व गावापर्यंत बस, वीज आदी सुविधा पोहचल्या आहेत. त्यामुळे येथील जीवन सुखी झालेले आहे. रोहीडा किल्ला भोरच्या दक्षिणेस सुमारे ६ मैलांवर आहे. रोहीडा किल्ल्याला विचित्रगड किंवा बिनीचा किल्ला असे देखील संबोधले जाते.
Rohida Fort, Rohida Fort Trek, Rohida Fort Trekking, Pune
इतिहास
या किल्ल्याची निर्मिती ही यादवकालीन आहे. या किल्ल्यावरील तीसऱ्या दरवाजावर असणाऱ्या शिलालेखावरून मुहम्मद आदिलशहाने ह्या गडाची दुरुस्ती केली असे अनुमान निघते. या शिलालेखावरून मे १६५६ नंतर हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांदल देशमुखांकडून घेतला असे समजते. किल्ला घेण्यासाठी राजांना बांदल देशमुखांशी हातघाईची लढाई करावी लागली. यात कृष्णाजी बांदल मारला गेला. बाजीप्रभू देशपांडे बांदलाचे मुख्य कारभारी होते. लढाईतर बाजीप्रभू देशपांडे व इतर सहकाऱ्यांना स्वराज्यात सामील करून घेतले गेले. इ.स. १६६६ च्या पुरंदरच्या तहानुसार हा किल्ला मोघलांच्या स्वाधीन केला गेला. २४ जून१६७० रोजी शिवरायांनी किल्ला परत घेतला. कान्होजी यांच्याकडे भोरची पूर्ण तर रोहीडा किल्ल्याची निम्मी देशमुखी व जमिनीचे काही तुकडे इनाम होते. रोहीड्याचे गडकरी त्यांचेकडून ३० होन घेत होते. शिवाजी महाराजांच्या अधिकाऱ्यांनी शिवाजी महाराजांकडे विचारणा केली की ३० च होन का, शिवाजी महाराजांनी निर्णय दिला की, जेथे आपले चाकर असल्यामुळे पूर्वापार चालत आलेले द्रव्यच घ्यावे. पुढे किल्ला मोघलांनी जिंकला, मात्र भोरच्या पंत सचिवांनी औरंगजेबाशी झुंजून किल्ला स्वराज्यात पुन्हा दाखल केला. संस्थाने विलीन होईपर्यंत राजगड, तोरणा, तुंग आणि तिकोना किल्ल्याप्रमाणे हाही किल्ला भोरकरांकडे होता.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
पहिल्या दरवाज्याच्या चौकटीवर गणेशपट्टी आणि वर मिहराब आहे. पुढे १५ ते २० पायऱ्या पार केल्यावर दुसरा दरवाजा लागतो. येथून आत गेल्यावर समोरच पाण्याचे भुयारी टाके आहे. याचे पाणी बाराही महिने पुरते. येथून ५-७ पायऱ्या चढून गेल्यावर तिसरा दरवाजा लागतो. हा दरवाजा अतिशय भक्कम आहे. यावर बऱ्याच प्रमाणात कोरीव काम आढळते. दोनही बाजूंस हत्तीचे शिर कोरण्यात आले आहे. तसेच डाव्या बाजूला मराठी उजव्या बाजूला फारसी शिलालेख आहे. आजुबाजूच्या तटबंदीची पडझड झाली आहे. ह्या सर्व दरवाजांची रचना एकमेकांना काटकोनात आहे. येथून आत शिरल्यावर समोरच २ वास्तू दिसतात. एक गडावरील सदर असावी तर दुसरे किल्लेदाराचे घर असावे. डाव्या बाजूला थोडे अंतर चालून गेल्यावर रोहिडमल्ल उर्फ भैराबाचे मंदिर लागते. मंदिरासमोर लहानसे टाके, दीपमाळ व चौकोनी थडगी आहेत. देवळात गणपती, भैरव व भैरवी यांच्या मूर्ती आहेत. रोहीड्याचा घेर तसा लहानच आहे. किल्ल्याच्या आग्नेयस शिरवले बुरूज, पश्चिमेस पाटणे बुरूज व दामगुडे बुरूज, उत्तरेस वाघजाईचा बुरूज व पूर्वेस फत्ते बुरूज व सदरेचा बुरूज असे एकूण ६ बुरूज आहेत. गडाची तटबंदी व बुरुजांचे बांधकाम अजूनही मजबूत आहेत. गडाच्या उत्तरेकडील भागात टाक्यांची सलग रांग आहे. येथेच एक भूमिगत पाण्याचे टाके आहे. तेथेच मानवी मूर्ती व शिवपिंडी आहे. संपूर्ण गड फिरण्यास दीड तास पुरतो.
गडावर जाण्याच्या वाटा
बाजारवाडी मार्गे:
दक्षिणेस ८-१० किमी अंतरावर बाजारवाडी नावाचे गाव आहे. बाजारवाडीपर्यंत जाण्यासाठी एसटी सेवा उपलब्ध आहे. बाजारवाडीपासून वळलेली वाट गडाच्या पहिल्या दरवाजापाशी घेऊन जाते. वाट अत्यंत सोपी असून दरवाजापर्यंत पोहचण्यास एक तास लागतो. अंबवडे मार्गे भोर ते अंबवडे अशी एसटी सेवा उपलब्ध आहे. पुणे-भोर-पानवळ-अंबवडे अशी बससेवा देखील उपलब्ध आहे. या गाडीने अंबवडे गावी उतरून गावाच्या पूर्वेकडील दांडावरून गड चढण्यास सुरुवात करावी. ही वाट लांबची आणि निसरडी आहे. या वाटेने गड गाठण्यास सुमारे अडीच तास पुरतात. शक्यतो गडावर जाताना बाजारवाडी मार्गे जावे आणि उतरताना नाझरे किंवा अंबवडे मार्गे उतरावे. म्हणजे रायरेश्वराकडे जाण्यास सोपे जाते.
रोहीडा ते रायरेश्वर वाटा:
१. भोर -कारी बसने कारी गावात उतरावे. तिथून लोहदरा मार्गे २ तासांत रायरेश्वर पठाराकडे पोहचतो व पठारावरील वस्ती पर्यंत जाण्यास दीड तास लागतो.
२. वडतुंबी मार्गे – दुपारची (२.४५) भोर-टिटेघर गाडी आंबवण्यास येते. तिने वडातुंबी फाट्यावर उतरावे. तिथून १५ मिनिटांत वडातुंबी गाव गाठणे. येथून साधारणतः २ तासात गणेशदरा मार्गे रायरेश्वर पठारावर पोहचता येते.
३. भोर- कोर्लेगाडीने कोर्लेगावात उतरावे. रात्री उशीर झाल्यास गावात मुक्काम करून पहाटे गायदरा मार्गाने ३ तासात रायरेश्वर पठारावरील देवळात जाता येते.
४. भोर-दाबेकेघर बसने दाबेकेघरला उतरायचं व तिथून धानवली पर्यंत चालत जायंच. पुढे वाघदरामार्गे ३ तासात रायरेश्वर गाठायचं.
रोहीडमल्लच्या मंदिरात ५ ते ७ जणांची रहाण्याची सोय होते. पावसाळ्यात मात्र मंदिरात रहाता येत नाही. जेवणाची सोय आपण स्वतःच करावी. गडावर पिण्याचे पाणी बारमाही उपलब्ध आहे. गडावर जाण्यासाठी बाजारवाडी मार्गे – १ तास लागतो.


Welcome to the Best Fort Trekkers Group in Maharashtra.



