प्रतापगडाच्या पायथ्यापासून सह्याद्रीची एक उपरांग शंभूमहादेव या नावाने पूर्वेकडे जाते. या रांगेचे तीन फाटे फुटतात. त्यापैकी एका रांगेवर सज्जनगड उर्फ परळीचा किल्ला वसलेला आहे. समरथ रामदासांच्या पदस्पर्शाने पावन झालेली इथली माती प्रत्येकाने भाळी लावावी. अनंत कवींनी या पावन भूमीचे अतिशय उत्तम वर्णन केले आहे. “सह्याद्रीगिरीचा विभाग विलसे, मांदार श्रुंगापरी । नामे सज्जन जो नृपे वसविला,श्री उर्वशीचे तिरी । साकेताधिपती कपी भगवती, हे देव ज्याचे शिरी। येथे जागृत रामदास विलसे, जो या जना उद्धरी ॥” सातारा शहराच्या नैऋत्येस अवघ्या दहा कि.मी. अंतरावर उरमोडी उर्फ उर्वशी नदीच्या खोऱ्यात हा दुर्ग उभा आहे.

Sajjangad Fort, Sajjangad Fort Trek, Sajjangad Fort Trekking, Satara

इतिहास

प्राचीन काली या डोंगरावर आश्वालायन ऋषींचे वास्तव्य होते, त्यामुळे या किल्ल्याला ‘आश्वलायनगड’ म्हणू लागले. या शब्दात अपभ्रंश म्हणजे अस्वलगड हे देखील नाव मिळाले. या किल्ल्याची उभारणी शिलाहार राजा भोज ह्याने ११ व्या शतकात केली. या गडाच्या पायथ्याशी परळी नावाचे गाव होते. म्हणूनच ह्याला परळीचा किल्ला असे देखील संबोधीले जायचे. चवथा बहमनी राजा महंमदशहा (१३५८- १३७५) याच्या कारकिर्दीत या किल्ल्याचा उल्लेख आढळतो. पुढे हा किल्ला बहमनी राज्याचे वारसदार आदिलशहा कडे गेला. इ.स. १६६२ पर्यंत फाजलखान ह्या किल्ल्याच किल्लेदार असल्याचा उल्लेख आढळतो. २ एप्रिल इ.स. १६७३ मध्ये शिवाजी राजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला. शिवरायांच्या विनंती वरून समर्थ रामदास गडावर कायमच्या वास्तव्यासाठी आले. किल्ल्याचे नामकरण करण्यात आले सज्जनगड. पुढे राज्याभिषेकानंतर शिवाजीराजे सज्ज्नगडावर समर्थांच्या दर्शनास आले.

पुढे ३-११-१६७८ रोजी शिवरायांनी संभाजी महाराजांना समर्थांकडे पाठवले. पण ३-१२-१६७८ रोजी संभाजी महाराज सज्ज्नगडावरून पळून जाऊन दिलेरखानाला मिळाले. शिवरायांच्या निधनानंतर १८ जानेवारी १६८२ रोजी श्री राममूर्तीचे गडावर स्थापना करण्यात आली. २२ जानेवारी १६८२ मध्ये समर्थांचे निधन झाले. समर्थांनी आपल्या पश्चात सर्व अधिकार दिवाकर गोसाव्याला दिले असले तरी गडाची व्यवस्था भानजी वरामजी गोसावी यांच्याकडे सोपवली होती. पुढे यांत भांडणतंटा सुरू झाला. ही गोष्ट संभाजी महाराजांच्या कानावर जाताच त्यांनी २-६-१६८२ रोजी सज्जनगडाचा मुद्राधारी जिजोती काटकर ह्याला पत्र लिहिले की. “श्री स्वामी अवतार पूर्ण करण्याअगोदरच आज्ञा केली होती…. ऐसे असता उद्धव गोसावी उगीच द्रव्य लोभास्तव भानजी व रामजी गोसावी यांसी कटकट करितात, तुम्ही उद्धव गोसावी यांसी पत्रे व वस्त्रे भानजी व रामजी यांजकडून देवविली म्हणून केलो आले. तरी तुम्हास ऐसे करावयाचे प्रयोजन काये व उद्धव गोसावी यांसी कटकट रावया गरज काये या उपरी जे जे वस्त्रभाव व द्रव्य उधव गोसावी यांचे आधीन करविले असेली ती मागते भानजी व रामजी याचे स्वाधीन करणे. उधव गोसावी यांसी कटकट करू न देणे. श्री स्वामींचे पहिलीच आज्ञा नाही. श्री स्वामींच्या समुदायांशी काडीइतके अंतर पडो न देणे… या पत्राप्रमाणे राहाटी करणे.” या नंतर पुढे २१ एप्रिल १७०० मध्ये फतेउल्लाखानाने सज्ज्नगडास वेढा घातला. ६ जून १७०० ला सज्जनगड मोगलांच्या ताब्यात गेला व त्याचे ‘नौरससातारा’ म्हणून नामकरण झाले. १७०९ मध्ये मराठ्यांनी पुन्हा किल्ला जिंकला. १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांच्या हाती पडला.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

गडावर शिरतांना लागणाऱ्या पहिल्या दरवाजाला ‘छत्रपती शिवाजी महाराजद्वार’ असे म्हणतात. हे द्वार अग्नेय दिशेस आहे. दुसरा दरवाजा पूर्वाभिमुख असून त्याला ‘समर्थद्वार’ असेही म्हणतात. आजही हे दरवाजे रात्री दहा नंतर बंद होतात. दुसऱ्या दारातून शिरतांना समोरच एक शिलालेख आढळतो. त्याचा मराठीअर्थ खालील प्रमाणे.

१) ऐश्वर्य तुझा दारातून तोंड दाखवत आहे.

२) हिंमत त्याच्या कामामुळे सर्व फुलांना प्रफुल्लित करत आहे.

३) तू विवंचना दूर होण्याचे स्थान आहेस. परंतु पुन्हा विवंचना मुक्त आहे.

४)तुझ्या पासून सर्व विवंचना दुर होतात.

५) परेली किल्ल्यावरील इमारतीच्या दरवाज्याचा पाया ३ जनादिलाखर या तारखेस तयार झाला. आदिलशहा रेहान याने काम केले. ज्या पायऱ्यांनी आपण गडावर प्रवेश करतो त्या पायऱ्या संपायच्या अगोदर एक झाड लागते. या झाडापासून एक वाटा उजवीकडे जाते. या वाटेने ५ मिनिटे पुढे गेल्यावर एक रामघळ लागते. ही रामघळ समर्थांची एकांतात बसण्याची जागा होती. गडावर प्रवेश केल्यावर डावीकडे वळावे. समोरच घोड्यांना पाणी पाजण्यासाठीचे घोडाळे तळे दिसते. घोडाळे तळ्याच्या माघच्या बाजूस एक मशिदवजा इमारत आहे तर समोरच आंग्लाई देवीचे मंदिर आहे. ही देवी समर्थांना चाफळच्या राममूर्ती बरोबरच अंगापूरच्या डोहात सापडली. मंदिरा समोरच ध्वजस्तंभ आहे. नंतर आल्यामार्गाने पुन्हा तळ्यापाशी यावे व सरळ पुढे चालत जावे वाटेतच उपहारगृह श्री समर्थ कार्यालय आणि धर्मशाळा लागतात. धर्मशाळेच्या समोरच सोनाळे तळे आहे. याच तळ्यातील पाणी पिण्यासाठी वापरतात. तळ्याच्या मागील बाजूस पुष्पवाटीका आहे. सोनाळे तळ्याच्या समोरून जाणारी वाट पकडावी आणि आपण मंदिराच्या आवारात येऊन पोहचतो. समोरच पेठेतल्या मारुतीचे मंदिर आहे तर बाजूला श्रीधर कुटी नावाचा आश्रम आहे. उजवीकडे श्रीरामाचे मंदिर, समर्थाचा मठ आणि शेजघर आहे. या ठिकाणी समर्थांच्या वापरातील सर्व वस्तू ठेवल्या आहेत. हे सर्व पाहून झाले की मंदिराच्या पुढच्या द्वारातून बाहेर पडायचे आणि डावीकडे वळावे. प्रथम ‘ब्रह्मपिसा’ मंदिर लागते आणि पुढे गेल्यावर धाब्याच्या मारुतीचे मंदिर आहे. समोरच किल्ल्याचा तट आहे येथून सभोवतालचा परिसर पारच सुंदर दिसतो. गडा फिरण्यास दोन तास पुरतात.

गडावर जाण्याच्या वाटा

गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. त्यांपैकी एक गाडीमार्ग आहे.

परळीपासून: सातारा ते परळी अंतर १० कि.मी. चे आहे. परळी पासून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. साधारण ७८० पायऱ्यांनंतर गडाचा दरवाजा लागतो. गडावर जाण्यास परळीपासून एक तास पुरतो.

गजवाडी पासून: सातारा परळी रस्त्यावर परळीच्या अलीकडे ३ कि.मी. वर गजवाडी गाव लागते. तेथून थेट गडाच्या कातळ माथ्यापर्यंत गाडीने जाता येते. येथून पुढे १०० पायऱ्यानंतर दरवाजा लागतो. रस्त्यापासून गडावर जाण्यास १५ मिनिटे पुरतात.

राहाण्याची सोय

गडावर राहण्यासाठी श्री समर्थ सेवा मंडळ कार्यालय तर्फे खोल्या उपलब्ध होतात. गडावर धर्मशाळा देखील आहेत. सज्ज्नगड (सेवा मंडळाच्या) खोल्याही राहण्यासाठी उपलब्ध होतात.

जेवणाची सोय

गडावर जेवण्याची सोय होते.

पाण्याची सोय

बारामही पिण्याचे पाणी आहे.